’ मी एमपीएससी परीक्षेची तयारी करणारी एक विद्यार्थिनी आहे. मूळची उत्तर प्रदेशची आहे. एमपीएससी परीक्षा देऊन महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची माझी तीव्र इच्छा आहे. मात्र, ‘अधिवास’ प्रमाणपत्राच्या नियमांमुळे माझ्या मनात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. डोमिसाईलसाठी सामान्यत: १५ वर्षांच्या वास्तव्याचा पुरावा लागतो, पण माझ्याकडे सद्यस्थितीत ७-८ वर्षांचाच ठोस पुरावा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत मी एमपीएससीची परीक्षा खात्रीने देऊ शकते का? की ही अट सर्व पदांसाठी अनिवार्य आहे? – राखी राठोर
– तुम्ही पहिलीपासून बारावीपर्यंत म्हणजे १२ वर्षे महाराष्ट्रात आहात, तुम्ही पदवीधर होईपर्यंत अजून तीन वर्षे जातील, म्हणजे तुमचा महाराष्ट्रातील पंधरा वर्षांचा अधिवास पूर्ण झालेला असेल मग तुम्हाला डोमिसाईल मिळायला आणि एमपीएससी परीक्षा द्यायला काहीच अडचण नसेल कारण पदवी पूर्ण केल्यानंतरच एमपीएससी परीक्षा देता येणार आहे. अर्थात तोपर्यंत परीक्षेचा अभ्यास करायला तुम्हाला काहीच अडचण नाही.
’ मी २०२४ मध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग उत्तीर्ण केली. ७.५ सीजीपीए होता. गेल्या वर्षी आयटी हार्डवेअर आणि नेटवर्किंग मध्ये मी पेड इंटर्नशिप केली. जिथे इंटर्नशिप केली तिथून मला प्लेसमेंट तर मिळाले परंतु जॉब सिलेक्शन झाले नाही. सध्या माझा इंटरव्ह्यूसाठी अभ्यास सुरू आहे. काय करावे, मार्गदर्शन करा. -पूजा भैसारे
– जॉब सिलेक्शन का होत नाही याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आपण कम्युनिकेशन स्किल्स मध्ये कमी पडतोय की तांत्रिक ज्ञानात की दोन्ही मध्ये याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सिस्को सारखे या क्षेत्रात मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन्स करणे नक्कीच उपयोगी ठरेल.
