सार्वजनिक प्रशासनातील नीतिमत्ता कशी घडते ते आपण पाहिले. या लेखात तिचे वेगवेगळे पैलू पाहू. या मूल्यांचा संविधानातील समानता, न्याय आणि लोककल्याणाच्या तत्त्वांशी संबंध जोडून अभ्यास करायला हवा.
सार्वजनिक प्रशासनातील नीतिमत्तेतील प्रमुख मूल्ये सोबतच्या तक्त्यामध्ये दिलेली आहेत. प्रत्येक मूल्याचा अर्थ आणि प्रशासनातील महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. या मूल्यांचा भारतीय संविधानातील समानता, न्याय आणि लोककल्याणाच्या तत्त्वांशी संबंध जोडून अभ्यास करायला हवा. वेगवेगळ्या प्रशासकीय उदाहरणांच्या संदर्भात दुसर्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या
Ethics in Governance या अहवालाचा अभ्यास करून त्यातील शिफारशी, नैतिक तत्त्वे आणि प्रत्यक्ष प्रशासनातील त्यांचा उपयोग यांविषयीची समज विकसित करायला हवी.
नोलन समितीची सार्वजनिक जीवनातील सात तत्त्वे
ब्रिटनमध्ये सार्वजनिक जीवनातील नैतिक मानकांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेल्या नोलन समितीने सार्वजनिक जीवनातील पुढील सात मूलभूत तत्त्वे मांडली. त्यांचा अर्थ आणि प्रशासनातील उपयोग समजून घ्यावा.
’ नि:स्वार्थता : वैयक्तिक लाभापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य देणे.
’ सचोटी : अनुचित लाभ किंवा बाह्य दबावांपासून दूर राहणे.
’ वस्तुनिष्ठता : पुरावे, निकष आणि गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेणे.
’ उत्तरदायित्व : निर्णय आणि कृतींसाठी जबाबदार राहणे.
’ खुलेपणा : निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे.
’ प्रामाणिकपणा : सत्यनिष्ठ वर्तन करणे.
’ नेतृत्व : स्वत:च्या आचरणातून नैतिक मूल्यांचा आदर्श निर्माण करणे.
या तत्त्वांमधील सूक्ष्म फरक आणि या तत्त्वांची भारतीय प्रशासकीय मूल्यांशी तुलना करता यायला हवी. भारतीय प्रशासनात त्यांचा विचार संविधान आणि त्याच्या मूलभूत तत्त्वांच्या संदर्भात करावा.
प्राचीन भारतीय विचार
भारतीय प्रशासकीय विचारपरंपरेत राजधर्म, कर्तव्यपालन, न्याय, संयम, प्रजाहित आणि नैतिक नेतृत्व यांना महत्त्व दिले गेले आहे. या संदर्भात कौटिल्याचे अर्थशास्त्र, सम्राट अशोकाची धम्मनीती,
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासनविषयक कार्य आणि तिरुवल्लुवर यांच्या तिरुक्कुरळ ग्रंथाचा संदर्भ महत्वाचा आहे.
कौटिल्याचे अर्थशास्त्र
प्रशासकीय नियंत्रण, आर्थिक शिस्त, भ्रष्टाचार प्रतिबंध आणि प्रजाहित यांविषयीचे विचार समजून घ्यावेत. त्यांचा संबंध आधुनिक प्रशासनातील सार्वजनिक निधीचा योग्य वापर, लेखापरीक्षण आणि उत्तरदायित्वाशी जोडावा.
सम्राट अशोकाची धम्मनीती
अहिंसा, करुणा, धार्मिक सहिष्णुता, सामाजिक सलोखा आणि लोककल्याण यांचा अभ्यास करावा. या विचारांचा संबंध आधुनिक प्रशासनातील संवेदनशीलता, सर्वसमावेशकता आणि सामाजिक न्यायाशी जोडावा.
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासनविषयक कार्य
स्वराज्याची संकल्पना, प्रजेच्या हिताचे संरक्षण, शिस्तबद्ध प्रशासन, न्यायव्यवस्था, महसूल व्यवस्थापन आणि लष्करी प्रशासनातील शिस्त यांचा अभ्यास करावा. स्त्रियांचा सन्मान, धार्मिक स्थळांबाबत आदर आणि प्रजेच्या सुरक्षिततेला महत्त्व देणार्या त्यांच्या प्रशासनविषयक धोरणांचाही संदर्भ घ्यावा. या पैलूंचा संबंध आधुनिक प्रशासनातील कर्तव्यनिष्ठा, उत्तरदायित्व, लोककल्याण, सहिष्णुता आणि नैतिक नेतृत्वाशी जोडून पाहावा.
तिरुवल्लुवर यांचा तिरुक्कुरळ
या ग्रंथातील अरम (सदाचार), पोरुळ (संपत्ती, शासन व सार्वजनिक व्यवहार) आणि इन्बम (प्रेम व मानवी संबंध) या तीन विभागांची माहिती करून घ्यावी. न्याय्य शासन, सदाचारी नेतृत्व, योग्य सल्लागारांची निवड आणि विवेकपूर्ण निर्णय यांसंबंधीच्या विचारांचा अभ्यास करावा.
या सर्व ऐतिहासिक विचारांचा अभ्यास करताना त्यांच्या समकालीन संदर्भांची जाणीव ठेवावी आणि आधुनिक लोकशाही व घटनात्मक मूल्यांच्या अनुषंगाने त्यांचे महत्त्व आणि उपयोगिता समजून घ्यावे.
गांधीवादी दृष्टिकोन
गांधीवादी नीतिविचारांचा अभ्यास करताना सत्य, अहिंसा, साधनशुचिता, सर्वोदय, अंत्योदय आणि विश्वस्तत्व या संकल्पना समजून घ्याव्यात. गांधीजींच्या मते, साध्याइतकीच साधनांची शुद्धताही महत्त्वाची आहे. त्यामुळे सार्वजनिक उद्दिष्ट साध्य करताना अनैतिक मार्गांचा अवलंब करणे योग्य ठरत नाही.
सर्वोदयातून सर्वांच्या कल्याणाचा, तर अंत्योदयातून समाजातील शेवटच्या आणि वंचित व्यक्तीच्या हिताचा विचार करावा. विश्वस्तत्वाच्या संकल्पनेत संपत्ती आणि अधिकारांचा वापर व्यापक समाजहितासाठी करण्यावर भर आहे. या विचारांचा संबंध भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, दुर्बल घटकांविषयी संवेदनशीलता, नैतिक नेतृत्व, लोकसहभाग आणि सार्वजनिक संसाधनांच्या न्याय्य वापराशी जोडून अभ्यास करावा.
प्रत्येक तत्त्व प्रशासकीय निर्णय, नागरिकांशी वर्तन, सार्वजनिक निधीचा वापर आणि नैतिक द्वंद्व यांमध्ये कसे लागू होते, हे समजून घ्यावे. नोलन समितीची तत्त्वे, प्राचीन भारतीय विचार आणि गांधीवादी दृष्टिकोन यांची भारतीय राज्यघटनेतील मूल्यांशी सांगड घालता आली, तर या घटकावर आधारित संकल्पनात्मक प्रश्न, तुलनात्मक प्रश्न आणि केस स्टडीज परिणामकारकपणे लिहिता येतील.
प्रशासकीय नितीमत्तेचे मूल्य प्रशासनावर सचोटी प्िारणाम
– विचार, शब्द आणि कृती यांतील सुसंगती भ्रष्टाचार व पक्षपात टाळणे
प्रामाणिकपणा – सत्यनिष्ठ वर्तन अचूक माहिती देणे
निष्पक्षता – जात, धर्म, पक्ष किंवा वैयक्तिक न्याय्य सेवा वितरण
संबंधांवर आधारित भेदभाव टाळणे
वस्तुनिष्ठता – तथ्ये, पुरावे आणि नियमांच्या पारदर्शक निवड व लाभवाटप
आधारे निर्णय
उत्तरदायित्व – निर्णयांसाठी जबाबदारी स्वीकारणे निर्णयांचे स्पष्टीकरण व तपासणी
पारदर्शकता – निर्णयप्रक्रियेतील आवश्यक नागरिकांचा विश्वास वाढवणे
माहिती उपलब्ध करणे
करुणा व सहानुभूती – नागरिकांच्या परिस्थितीची संवेदनशील सेवा वितरण
जाणीव ठेवणे
लोकसेवेप्रती समर्पण – सार्वजनिक हिताला प्राधान्य वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सेवा
सहिष्णुता – भिन्न मते व विविधता स्वीकारणे समावेशक प्रशासन
गोपनीयता – संरक्षित माहितीचे योग्य जतन नागरिकांच्या माहितीचे संरक्षण
