राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर ४ मधील मानवी मूल्ये आणि नीतिमत्ता या घटकाच्या तयारीबाबत आपण मागील काही लेखांमध्ये पाहिले. या लेखामध्ये मानवी मूल्ये या मुद्द्यावर केंद्रीय नागरी सेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे विश्लेषण आणि आदर्श उत्तर कसे लिहिता येईल ते पाहू. 

 सामाजिक मूल्ये ही आर्थिक मूल्यांपेक्षा अधिक महत्त्वाची आहेत. राष्ट्राच्या समावेशक विकासाच्या संदर्भात वरील विधानाची उदाहरणांसह चर्चा करा. (१० गुण, १५० शब्द)

प्रश्नाचे विश्लेषण आणि उत्तर लेखनाची अपेक्षित दिशा

प्रश्नामध्ये सामाजिक मूल्ये आर्थिक मूल्यांपेक्षा का महत्त्वाची आहेत, हे समावेशक विकासाच्या संदर्भात स्पष्ट करायचे आहे. म्हणजेच, देशाचे  ॅऊढ वाढणे पुरेसे नाही; विकासाचा फायदा गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणेही आवश्यक आहे आणि त्यासाठी सामाजिक मूल्ये महत्त्वाची आहेत. हे उत्तरातून मांडणे अपेक्षित आहे.

उत्तराची सुरूवात समावेशक विकासासाठीच्या एखाद्या उद्धरणाने करता येईल. किंवा सरळ समावेशक विकासाची व्याख्या देऊन त्यातील आर्थिक आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व थोडक्यात मांडायला हवे.

विकासाचा लाभ सर्वांना मिळण्यासाठी समता व न्याय ही मूल्ये; व्यक्तीला केवळ आर्थिक घटक न मानता सन्मानाने जगण्याची संधी लाभावी यासाठी मानवी प्रतिष्ठेचे महत्त्व; मानवी क्षमता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शिक्षण व आरोग्य सुविधांची समान उपलब्धता; विषमता व असंतोष दूर होऊन आर्थिक व्यवहारांसाठी सुरक्षित वातावरणाकरीता सामाजिक एकता आणि भावी पिढ्यांचे हित सुरक्षित राहण्याकरीता पर्यावरणीय मूल्ये महत्वाची आहेत हे वेगवेगळी उदाहरणे नमूद करुन सिद्ध करणे अपेक्षित आहे.

उत्तर क्रमांक १   (१५६ शब्द)

समावेशक विकास साध्य करताना आर्थिक मूल्ये ही इंजिनाचे काम करतात, पण सामाजिक मूल्यांनी त्याचे सुकाणू सांभाळणे आवश्यक आहे. आर्थिक मूल्ये ही संपत्ती निर्माण करतात, आणि सामाजिक मूल्ये तिच्या न्याय्य वाटपाची खात्री देतात.

शिक्षण आणि आरोग्य सुविधा सर्वांना समानतेने उपलब्ध झाल्यास लोकसंख्येचे रूपांतर ‘मानवी भांडवलात’ होते. आरोग्य सुरक्षा कुटुंबांना गरिबीत ढकलले जाण्यापासून वाचवते याचा अनुभव ‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे येत आहे. 

‘मनरेगा’ योजना ही बाजारातील स्पर्धेचा वा मागणीचा विचार करुन नव्हे तर नागरीकांची प्रतिष्ठा राखत साधनसंपत्ती निर्मिती करण्याच्या उद्दीष्टाने राबविण्यात येते. ‘कामाचा अधिकार’ आणि मानवी प्रतिष्ठेच्या सामाजिक मूल्याला प्राधान्य देऊन पायाभूत सुविधा उभारण्यात येतात.

जागतिक असमानता अहवालानुसार, संपत्तीतील मोठी दरी सामाजिक असंतोषाला खतपाणी घालते. हे विचारात घेऊनच घटनेच्या अनुच्छेद ३८ आणि ३९ मधील मार्गदर्शक तत्वांमध्ये संपत्तीच्या समान वाटपाची तरतूद केलेली आहे.

सामाजिक जाणीव नसलेली आर्थिक मूल्ये ही ‘धनिकशाही’ निर्माण करतात, तर आर्थिक स्थिरतेशिवाय असलेली सामाजिक मूल्ये देशाला ‘कल्याणकारी योजनांच्या जाळ्यात’ अडकवतात. समावेशक विकासासाठी सामाजिक मूल्यांच्या अधीन राहून आर्थिक प्रगती साधणे ही कल्याणकारी राज्याची संकल्पना साकारणे आवश्यक आहे.

उत्तर क्रमांक २ (१७५ शब्द)

आर्थिक मूल्ये ही सामाजिक मूल्यांच्या अधीन असली तर सामाजिक समावेशन साध्य होऊ शकते. आर्थिक प्रगती देशाच्या आर्थिक उत्पन्नाचा हिस्सा वाढवते, परंतु सामाजिक मूल्ये त्याचे न्याय्य पद्धतीने वाटप व्हावे याची काळजी घेतात. घटनेच्या अनुच्छेद ३८ आणि ३९ मध्ये संपत्तीचे केंद्रीकरण रोखणे, साधसंपत्तीचे समन्यायी वाटप आणि आर्थिक व सामाजिक समानता रुजवण्याबाबत राज्यांना निर्देश दिले आहेत. यातून कल्याणकारी राज्याची संकल्पना साध्य होते.

आर्थिक फायद्यांचे रूपांतर मूलभूत हक्कांमध्ये करण्यामध्ये सामाजिक मूल्ये महत्त्वाची ठरतात. जसे की ‘शिक्षणाचा अधिकार’, ज्यामुळे विकास तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतो.

रोजगारविरहित वाढ किंवा तीव्र आर्थिक असमानता समाजात असंतोष निर्माण करते. निव्वळ नफा कमावण्याचा उद्देश हा स्पर्धाक्षम नसलेल्या मागास क्षेत्रांकडे दुर्लक्ष करतो. सामाजिक मूल्ये मात्र, केवळ नफ्याचा विचार न करता प्रादेशिक विषमता दूर करण्यासाठी ‘अकांक्षित जिल्हा कार्यक्रम’ सारख्या ल्ष्यियत योजनांना प्रोत्साहन देतात. ज्यातून आर्थिक आणि सामाजिक दरी कमी होत आहे. बेजबाबदार व्यावसायिक खाणकामापेक्षा आदिवासींचे हक्क आणि पर्यावरणीय न्यायाला प्राधान्य दिल्यास लोकांचे विस्थापन रोखता येते आणि नक्षलवादासारख्या अंतर्गत सुरक्षा आव्हानांना आळा घालता येतो. आर्थिक मूल्ये ही देशाला ‘वित्तीय बळ’ देतात, तर सामाजिक मूल्ये त्याला ‘नैतिक दृष्टी’ प्रदान करतात. कल्याणकारी व संवेदनशील अर्थशास्त्राचा अवलंब केल्यास खर्‍या अर्थाने समावेशक विकास साधता येईल.

स्पष्टीकरण

पहिल्या उत्तरामध्ये शब्दमर्यादेचे पालन झाले आहे तर दुसर्‍या उत्तरामध्ये किमान १० ते १५ शब्द जास्त आहेत. उत्तराची सुरुवात एखाद्या उद्धरणाने करता आली असती पण आकर्षक वाक्यांनी केली असल्याने उत्सुकता वाढते.

दोन्ही उत्तरांमध्ये घटनेच्या अनुच्छेदांचा उल्लेख परिणामकारक आहे. शिक्षाणाचा हक्क मांदताना मूलभूत हक्कविषयक अनुच्छेद लिहिला असता तर जास्त परिणाम साधता आला असता.

पहिल्या उत्तरामध्ये साहित्यिक भाषा आणि पारिभाषिक शब्दांचा वापर केला आहे. दुसर्‍या उत्तराची भाषा सोपी पण जास्त ओघवती आहे. दोन्ही उत्तरांची परिणामकारकता उत्तम आहे.