राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर चारमधील नैतिक विचारवंत व तत्ववेत्ते या मुद्यावर केंद्रीय नागरी सेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तरलेखन या लेखामध्ये पाहू.

* खालील विधानाचा तुमच्या मते काय अर्थ आहे? ‘‘मनुष्य हा केवळ त्याच्या विचारांचे फलित असतो. तो जसा विचार करतो, तसाच तो बनतो.’’ — महात्मा गांधी (१० गुण, १५० शब्द मर्यादा)

प्रश्न विश्लेषण आणि उत्तरलेखनासाठी दृष्टिकोन

प्रश्नाचे उत्तर लिहिण्यापूर्वी दिलेल्या विधानाचे प्रत्यक्ष विश्लेषण करणे गरजेचे आहे. या विधानाचा मुख्य केंद्रबिंदू व्यक्तीच्या विचारांचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर आणि चारित्र्यावर होणारा परिणाम हा आहे. त्यामुळे ‘‘व्यक्ती जसा विचार करते, तशीच ती घडत जाते’’ हे स्पष्ट करताना व्यक्तीचा विचार, त्यातून घडणारी वृत्ती, त्यातून साकारणारी कृती, त्या कृतीमुळे निर्माण होणारी सवय आणि या सवयीतून दिसणारे चारित्र्य असा संबंध मांडणे ह्या उत्तराची मागणी आहे.

यानंतर हा संपूर्ण विचार प्रशासनाशी आणि लोकसेवकाच्या भूमिकेशी जोडणे आवश्यक आहे. थोडक्यात, गांधीजींच्या या विधानाचा अर्थ व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील तसेच सामाजिक आयुष्यातील उदाहरणांमधून स्पष्ट करता येईल. त्याचबरोबर लोकसेवकाच्या मनातील विचार आणि मूल्ये त्याच्या नागरिकांशी असलेल्या वागणुकीत, निर्णयप्रक्रियेत आणि कामकाजाच्या दृष्टिकोनात कशी दिसून येतात, हे उदाहरणातून मांडता येईल.

उत्तर क्रमांक १

(१५९ शब्द)

गांधींच्या या विधानातून आपल्या विचारांचा आपल्या वागण्यावर होणारा परिणाम दिसून येतो. आपण एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार जसा विचार करतो, तशाच आपल्या धारणा आणि वृत्ती तयार होतात. पुढे या वृत्ती आपल्या निर्णयांवर आणि वर्तनावर परिणाम करतात. त्यामुळे विचारांचा परिणाम फक्त मनापुरता मर्यादित राहत नाही, तर

तो हळूहळू आपल्या व्यक्तिमत्त्वात दिसू लागतो.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला सतत आपण काही करू शकत नाही असे वाटत असेल, तर तिचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि ती आव्हानांपासून दूर राहू शकते. याउलट, स्वत:वर विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असल्यास तीच व्यक्ती अडचणींना अधिक आत्मविश्वासाने सामोरी जाऊ शकते. त्याचप्रमाणे, एखाद्या समूहाबद्दल मनात पूर्वग्रह असतील, तर त्याचा परिणाम त्या समूहातील व्यक्तींशी केलेल्या वागणुकीवर होऊ शकतो.

प्रशासनातही हे लागू होते. नागरिकांकडे केवळ काम घेऊन येणारे लोक म्हणून न पाहता, त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपली आहे असा विचार असलेला अधिकारी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याची शक्यता असते.

म्हणून गांधींच्या विधानाचा अर्थ फक्त ‘सकारात्मक विचार करा’ एवढाच नाही; आपले विचार आपल्या वृत्ती, वर्तन आणि शेवटी आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात, हा त्यामागचा रव्यापक संदेश आहे.

उत्तर क्रमांक २

(१२८ शब्द)

महात्मा गांधींच्या या विधानाचा साधा अर्थ असा आहे की आपण जसा विचार करतो, त्याचा परिणाम हळूहळू आपल्या स्वभावावर आणि वागण्यावर होतो. चांगले विचार आपल्याला चांगल्या कृती करण्यास प्रेरणा देतात आणि त्या कृतींची सवय झाली की त्यातून आपले चारित्र्य घडते. म्हणजेच आपल्या विचारांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव असतो.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने नेहमी प्रामाणिक राहण्याचा विचार केला आणि तो प्रत्यक्ष कृतीतही आणला, तर प्रामाणिकपणा तिच्या स्वभावाचा भाग बनतो. याउलट सतत लोभ, द्वेष किंवा दुसर्‍यांविषयी पूर्वग्रह ठेवले तर त्याचा परिणाम तिच्या वागण्यातही दिसून येतो.

याचा प्रशासनाशीही थेट संबंध आहे. एखादा अधिकारी नागरिकांकडे आदराने आणि मदत करण्याच्या भावनेने पाहत असेल, तर त्याच्या निर्णयांमध्येही हीच भावना दिसेल. उलट नागरिकांविषयी नकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम सेवाभावावर होऊ शकतो.

म्हणून गांधींच्या मते, चांगले व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या विचारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

उत्तर क्रमांक ३

(१४९ शब्द)

महात्मा गांधींच्या या विधानाचा मुख्य अर्थ असा आहे की आपल्या विचारांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि चारित्र्यावर मोठा परिणाम होतो. मनात असलेले विचार आपल्या वृत्तीला आकार देतात. त्यातून आपल्या कृती घडतात आणि त्या कृतींची सवय लागली की हळूहळू आपल्या स्वभावाचा आणि चारित्र्याचा भाग बनतात. त्यामुळे आपल्या बाह्य वागण्यात आपल्या विचारांचे प्रतिबिंब दिसते.

चांगले आणि सकारात्मक विचार व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, सहकार्य आणि इतरांविषयी संवेदनशीलता निर्माण करू शकतात. याउलट द्वेष, लोभ किंवा पूर्वग्रह यांसारख्या विचारांचा परिणाम चुकीच्या वर्तनावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, नागरिकांकडे केवळ आपले काम करून घेण्यासाठी आलेले लोक म्हणून न पाहता त्यांची सेवा करणे ही आपली जबाबदारी आहे, असा विचार असलेला लोकसेवक अधिक संवेदनशीलपणे काम करू शकतो.

याचा व्यापक अर्थ असा की चांगले प्रशासन आणि नैतिक समाज घडवण्याची सुरुवात व्यक्तीच्या विचारांपासून होते. त्यामुळे लोकसेवकाने केवळ नियमांचे पालन न करता आपल्या विचारांमध्ये निष्पक्षता, लोकहित, कर्तव्यभावना आणि संवेदनशीलता जपली पाहिजे.

म्हणूनच विचार ही केवळ मनातील गोष्ट नसून ते आपल्या कृती आणि चारित्र्याची बीजे असतात.

steelframe.india@gmail.com