scorecardresearch

Premium

एमपीएससी मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा- आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास

आद्योगिक क्रांतीच्या परिणामी स्थापन झालेल्या युरोपियन व्यापारी कंपन्या विशेषत: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचे स्वरूप समजून घ्यावे.

mpsc exam preparation tips,
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

फारुक नाईकवाडे

मागील लेखामध्ये राजकीय इतिहासाची तयारी कशी करावी ते पाहिले. या लेखामध्ये अ-राजकीय म्हणजे आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक मुद्दय़ांचा अभ्यास कशा प्रकारे करावा ते पाहू.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील सामाजिक व आर्थिक मुद्दय़ांचा तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सांस्कृतिक मुद्दय़ांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे. घटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

आर्थिक इतिहास

आद्योगिक क्रांतीच्या परिणामी स्थापन झालेल्या युरोपियन व्यापारी कंपन्या विशेषत: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचे स्वरूप समजून घ्यावे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीचा व्यापारीक टप्पा बारकाईने समजून घ्यावा. त्यामुळे भारतीय हस्तोद्योगांवर झालेला परिणाम, भारतामध्ये सुरू झालेले अनौद्योगीकरण या बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात. भारतीय शेतीमध्ये नगदी पिकांचे वाढते प्रमाण, मळय़ांची शेती अशा प्रकारे शेतीचे झालेले वाणिज्यिकरण अभ्यासावे. यामध्ये पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम असे पैलू लक्षात घ्यावेत.

भारताबाहेर झालेले संपत्तीचे वहन ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यावी. यामध्ये दादाभाई नौरोजींचा सिद्धांत अभ्यासायचा आहेच, पण त्याबरोबरच इतर भारतीय नेत्यांनी मांडलेले अंदाजही पहावेत.

ब्रिटिशांची आर्थिक नीती, महत्त्वाचे चार्टर कायदे, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ. चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची विधाने या गोष्टी राष्ट्रवादाचा उदय व संघर्ष अभ्यासण्याआधी समजून घ्यायला हव्यात.

रेल्वे, टपाल व इतर प्रशासनिक व आर्थिक सुधारणांचा अभ्यास विकासाचे टप्पे, प्रत्येक टप्प्याची पार्श्वभूमी, संबंधित राज्यकर्ते या मुद्दय़ांच्या आधारे करणे आवश्यक आहे. त्यांचे सामाजिक आर्थिक परिणाम हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.

आधुनिक उद्योगांचा उदय हा मुद्दा तयार करताना त्यामधील भारतीय व्यापाऱ्यांची भूमिका, भारतीय उद्योगपती, भारतीय उद्योगांची सुरुवात व त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचेबाबत ब्रिटिशांचे धोरण समजून घ्यायला हवे. त्याच बरोबर भारतामध्ये ब्रिटिश वित्तीय भांडवलाची गुंतवणूक झालेली क्षेत्रे, त्यांचा विकास, त्यांच्या वाढीचे स्वरूप, भारतीय उद्योगांवरील त्यांचा परिणाम, कामगारांबाबतचे नियम/ भूमिका असे मुद्दे पहावेत. भारतीय उद्योगांच्या विकासातील टिळक स्वराज्य निधी आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे योगदान समजून घ्यावे.

सामाजिक इतिहास

आधुनिक शिक्षणाचा अभ्यास करताना विविध समाजसुधारकांचे शिक्षणविषयक कार्य, शैक्षणिक संस्था, त्यांचे संस्थापक, देणगीदार, वैशिष्टय़ अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा. याबाबतीत नेमलेल्या समित्या व त्यांच्या शिफारसी यांचा अभ्यासही महत्त्वाचा ठरेल. महिला, मागासवर्गीयांच्या शिक्षणावर भर द्यावा, तसेच छत्रपती शाहू महाराजांची वसतिगृहे व इतर शैक्षणिक निर्णय यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.

इंग्रजी शिक्षणामुळे संपर्काचे सामायिक भाषा माध्यम उपलब्ध झाले आणि इतर सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास/तुलना शक्य झाली. त्यामुळे सामाजिक विचारधारा आणि राष्ट्रवाद या दोन्हींवर झालेले परिणाम समजून घ्यायला हवेत.

मुद्रणालयाचे आगमन झाल्यावर संपर्काचा कमी खर्चिक आणि वेळ वाचवणारा तसेच मोठय़ा प्रमाणावर संपर्काची क्षमता असलेला पर्याय भारतीयांकडे उपलब्ध झाला हे समजून घ्यावे. वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, असल्यास ब्रीदवाक्य, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रित माध्यमांचा अभ्यास करता येईल. यामध्ये काही संघटनांची मुखपत्रेसुद्धा महत्त्वाची आहेत. महत्त्वाच्या वृत्तपत्रांबाबत त्यांमधील महत्त्वाच्या लेखांची शीर्षके, जाहिराती, देणगीदार, मदतगार व्यक्ती यांचा आढावाही घ्यायला हवा.

रेल्वे, टपाल व तार या पायाभूत सुविधांमुळे समाजावर झालेला परिणाम समजून घ्यायला हवा. संपर्काचे माध्यम म्हणून त्याची राष्ट्रीय चळवळीस झालेली मदत आणि सामाजिक चालीरीतींवर झालेला परिणाम असे पैलू यामध्ये लक्षात घ्यावेत.

उद्योगधंदे व जमीन सुधारणा यांमुळे विविध सामाजिक घटकांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. हा मुद्दा वसाहतकालीन अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यासला तर नीट समजून घेता येईल.

अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७) आणि सामाजिक-धार्मिक सुधारणांचा समाजावरील परिणाम अभ्यासताना सामाजिक बदलांबाबतचे कायदे, त्यासाठी भारतीयांकडूनच होणारे प्रयत्न आणि कायद्यांबाबत समाजाच्या प्रतिक्रिया व एकूणच परिणाम असे मुद्दे विचारात घ्यावेत.

समाजसुधारकांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे महत्त्वाचे ठरतात – त्यांची ठळक वैयक्तिक माहिती – पूर्ण नाव, महत्त्वाचे नातेवाईक, शिक्षण, सोबती इ., स्थापन केलेल्या आणि महत्त्वाची भूमिका निभावलेल्या संस्था, असल्यास वृत्तपत्र / नियतकालिक, साहित्य, त्यातील काही महत्त्वाचे उद्गार, महत्त्वाच्या घटना, कार्ये (कालानुक्रमे), असल्यास लोकापवाद, इतर उल्लेखनीय माहिती

यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्वे यांचा समावेश असावा.

शीख, मुस्लीम व दलित सुधारणा चळवळींचा विशेषत: अभ्यासक्रमात नमूद केलेल्या संस्था, समाजसुधारक, स्वातंत्र्य लढय़ावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या चळवळींचा अभ्यास पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, प्रतिक्रिया व व्यक्तिमत्वे या मुद्दय़ांच्या आधारे करणे आवश्यक आहे.

ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे सामाजिक सुधारणांबाबतचे मूल्यमापन नोंदवल्यास बहुविधानी प्रश्नांची चांगली तयारी होईल.

सांस्कृतिक इतिहास

कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इ. बाबींचा अभ्यास आर्थिक भूगोलामध्ये होतोच. लोणार सरोवर वगळता या ठिकाणांचे कलात्मक पैलू, सामाजिक महत्त्व, आश्रयदाते/ प्रोत्साहन देणारे राजे/ सरदार, किल्ल्यांचे सामरिक महत्त्व हे मुद्दे तयार करायला हवेत.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशामध्ये दृश्य कलांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिक अशा क्रमाने करणे सोपे होईल. प्राचीन कला आढळणारी स्थाने, त्यांचा काळ व स्वरूप (आकृत्या, रंग, तंत्रज्ञान इ.) आश्रयदाते राज्यकर्ते अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबल फॉर्म मध्ये करता येईल. मध्ययुगीन दृश्यकलांचाही अशाच प्रकारे अभ्यास करता येईल. येथे समकालीन इतर स्थापत्य व चित्रकलांचा आढावा घेतला तर जास्त उपयोगी ठरेल.

वाङ्मय प्रकारातील ज्यांचा उल्लेख अभ्यासक्रमात केलेला आहे त्यांची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व अशा प्रकारे अभ्यास आवश्यक आहे.

प्रायोगिक कलांपैकी लोककलांचे स्वरूप, त्यांचे सांस्कृतिक-धार्मिक पैलू व त्यांचे विशिष्ट प्रदेश व असल्यास संबंधित महत्त्वाचे कलाकार, त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न असे मुद्दे अभ्यासावेत. इतर प्रायोगिक कलांमधील विकासाचे प्रमुख टप्पे, प्रसिद्ध/ पुरस्कारप्राप्त कलाकार इ. बाबी महत्त्वाच्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 06:04 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×