प्रशासकीय वर्तनावर ऐतिहासिक, संस्थात्मक, सामाजिक-सांस्कृतिक घटकांचा परिणाम कसा अभ्यासावा, याबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये कायदेशीर, राजकीय आणि आर्थिक घटकांचा प्रशासकीय वर्तनावर होणारा परिणाम कसा अभ्यासावा ते पाहू.

प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कायदे, राजकीय व्यवस्था आणि व्यक्तीची आर्थिक परिस्थिती यांचा अधिकार्‍यांच्या नैतिक वर्तनावर कसा परिणाम होतो, हे समजून घेणे या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहे. हे तिन्ही आयाम अधिकार्‍यांच्या प्रशासकीय वर्तनावर आणि एकूणच प्रशासनावर प्रत्यक्ष परिणाम करतात. त्यामुळे या सर्व घटकांमधील संकल्पना समजून घेणे, या घटकांचा प्रशासकीय वर्तनावर होणारा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम, या संदर्भातील प्रसंगांची उदाहरणे आणि नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना अशा मुद्द्यांच्या आधारे तयारी करणे आवश्यक आहे.

कायदेशीर घटक

कायदे, नियम, न्यायालयीन निर्णय आणि कायद्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा हे प्रशासकीय वर्तनाला दिशा देणारे महत्त्वाचे घटक आहेत.

कायद्यांमुळे प्रशासकीय कामकाजाला निश्चित अशी चौकट मिळते. निर्णयप्रक्रियेमध्ये समानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात कायदे महत्त्वाची भूमिका बजावतात. नियमांचे केवळ यांत्रिक पालन केले आणि नागरिकांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले, तर प्रशासन असंवेदनशील बनू शकते. याउलट, कायद्यांची अंमलबजावणी निवडक दृष्टिकोनातून केली किंवा ती कमकुवत असेल, तर भ्रष्टाचार आणि पक्षपात यांना प्रोत्साहन मिळू शकते. विवेकाधिकाराचा गैरवापर हाही मुद्दा बारकाईने पहायला हवा.

कायदेशीर घटकांचा विचार करताना कायद्याचे राज्य, कायद्यापुढे समानता, नैसर्गिक न्याय आणि प्रशासकीय उत्तरदायित्व या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. या संदर्भात राज्यघटनेचे अनुच्छेद १४ आणि २१ हे विशेष महत्त्वाचे आहेत. या अनुच्छेदांच्या संदर्भाने वरील संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. कायद्याचे पालन आणि नैतिक विवेक यांच्यामधील संबंध स्पष्ट करता यायला हवा. कायद्याचे पालन अनिवार्य असले, तरी कायद्याच्या चौकटीत मानवी प्रतिष्ठा, न्याय आणि संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे, हे उदाहरणांच्या आधारे स्पष्ट करता यायला हवे.

राजकीय घटक

यासाठी राजकीय तटस्थता, वस्तुनिष्ठता, उत्तरदायित्व आणि सार्वजनिक हित या संकल्पना व्यवस्थित समजून घेऊन राजकीय नेतृत्व आणि एकूणच राजकीय व्यवस्था यांचा प्रशासकीय वर्तनावर होणारा परिणाम तसेच त्यांच्यातील परस्परसंबंध समजून घेणे गरजेचे आहे. या संदर्भात मॅक्स वेबर यांची नोकरशाहीविषयक संकल्पना विचारात घ्यायला हवी आणि व्यावसायिक व नियमाधारित प्रशासनाचे महत्त्व समजून घ्यायला हवे.

या घटकाचा विचार करताना राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यामधील संबंध समजून घेणे गरजेचे आहे. लोकनियुक्त सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार असतो; परंतु, हे निर्णय घेताना प्रशासकीय अधिकार्‍यांनी कायदा आणि नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे आवश्यक असते.

यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांनी कायदा आणि नियमांच्या आधारे योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. हा मुद्दा केस स्टडीज आणि मुलाखती या दोन्ही ठिकाणी उपयोगी पडेल.

आर्थिक घटक

आर्थिक परिस्थिती, उत्पन्नातील विषमता, आर्थिक असुरक्षितता आणि आर्थिक प्रलोभने यांचा प्रशासकीय वर्तनावर परिणाम होतो. मर्यादित आर्थिक संसाधनांमध्ये विविध योजनांसाठी निधीचे वाटप करताना अधिकार्‍यांना कार्यक्षमता, समानता आणि सार्वजनिक हित यांचा समतोल साधावा लागतो. आर्थिक असुरक्षितता किंवा वैयक्तिक लाभाची अपेक्षा भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देते; तर पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन आणि न्याय्य संसाधनवाटप नैतिक प्रशासनाला बळकटी देते.

संसाधनांचे न्याय्य वाटप, सार्वजनिक निधीचा योग्य वापर आणि आर्थिक उत्तरदायित्व या संकल्पना नीट समजून घ्याव्यात. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, विशेषत: सामाजिक व आर्थिक न्यायाशी संबंधित तरतुदी; तसेच सार्वजनिक खर्चातील पारदर्शकता आणि लेखापरीक्षणाची भूमिका हे मुद्दे पेपर दोन, पेपर तीन आणि मुलाखत असा सगळीकडे ‘ओव्हरलॅप’ होतो. त्यामुळे त्याचे आकलन महत्त्वाचे आहे.

तयारी करताना आर्थिक कार्यक्षमता आणि आर्थिक न्याय यांतील संबंध समजून घ्यायला हवा. सार्वजनिक निधीचा केवळ काटकसरीने वापर करणे पुरेसे नसून, त्याचा वापर समाजातील गरजू घटकांना योग्य लाभ मिळवून देण्यासाठी आणि सार्वजनिक हित साधण्यासाठी होणे आवश्यक आहे. आर्थिक अडचणी अनैतिक वर्तनाचे समर्थन ठरत नाहीत, हाही महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा.

सुधारात्मक उपायांमध्ये ई-निविदा प्रक्रिया, सामाजिक लेखापरीक्षण, नियमित आर्थिक लेखापरीक्षण, खर्चाची पारदर्शक नोंद आणि भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी या बाबी सविस्तरपणे समजून घ्याव्यात.

नोट्स तयार करताना प्रत्येक घटकातील महत्त्वाच्या संकल्पना, दोन सकारात्मक परिणाम, दोन नकारात्मक परिणाम, घटनात्मक संदर्भ, वैचारिक संदर्भ, दोन प्रशासकीय उदाहरणे आणि दोन सुधारात्मक उपाय लिहून ठेवावेत.

steelframe.india@gmail.com