विज्ञान व तंत्रज्ञान घटकामध्ये जैव तंत्रज्ञान हे दैनंदीन जीवनावर सर्वाधिक परीणाम करणारे किंवा सर्वाधिक उपयोजित होणारे क्षेत्र आहे. तयारी करताना मुख्य फोकस चालू घडामोडींवर असला तरी त्यापूर्वी मूलभूत अभ्यास गरजेचा आहे. या घटकाच्या मूलभूत तयारीबाबत या लेखामध्ये पाहू.

जैवतंत्रज्ञानाची तत्त्वे:

जैवतंत्रज्ञान हे मुख्यतः जनुकीय अभियांत्रिकी आणि जैवप्रक्रिया अभियांत्रिकी या दोन तत्त्वांवर आधारित आहे. जनुकीय अभियांत्रिकीमध्ये सजीवांच्या DNA मध्ये बदल करून उपयुक्त गुणधर्म निर्माण केले जातात, तर जैवप्रक्रिया अभियांत्रिकीमध्ये सूक्ष्मजीव, वनस्पती किंवा प्राणी पेशींचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन करून इन्सुलिन, लसी, एन्झाइम्स यांसारखी उपयुक्त उत्पादने तयार केली जातात. या तवांचे उपयोजन समजून घेण्यापूर्वी त्यातील महत्वाच्या संकल्पना आणि प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

जैव तंत्रज्ञानाचे विविध क्षेत्रातील उपयोजन

कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, अन्न प्रक्रिया, पर्यावरण संरक्षण, पशुसंवर्धन, न्यायवैद्यक, ऊर्जा क्षेत्र, सागरी क्षेत्र, बौद्धिक संपदा व संशोधन, प्राणी संवर्धन अशा क्षेत्रांमध्ये जैव तंत्रज्ञानाच्या वापरातून होणारे फायदे समजून घ्यावेत. यासाठीची दैनंदीन जीवनातील उदाहरणे माहित असावीत. तयारीच्या काळात यापैकी एखाद्या क्षेत्रामध्ये काही उल्लेखनीय संशोधन किंवा जैव तंत्रज्ञानाच्या वापरातून प्राप्त झालेले यश याबाबतची चर्चा सुरु असेल तर त्यावर भर देणे गरजेचे आहे.

जैव तंत्रज्ञानाच्या मह्त्वाच्या शाखा

जैव तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या शाखांबाबत तयारी करताना पुढील मुद्यांच्या आधारे अभ्यास करायला हवाः

जनुक संपादन – संकल्पना, फायदे, मर्यादा आणि विविध क्षेत्रांतील उपयोग यांवर विशेष लक्ष द्यावे.

माइटोकॉन्ड्रियल जनुक उपचार – कार्यपद्धती, उपयोग आणि अनुवंशिक रोगांच्या उपचारांमधील भूमिका समजून घ्यावी.

जीनोम अनुक्रमण – महत्त्व तसेच भारतातील जीनोम इंडिया प्रकल्प आणि इंडीजेन कार्यक्रम यांची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये जाणून घ्यावीत.

क्रिस्पर-कॅस जनुक संपादन तंत्रज्ञान – त्याची कार्यपद्धती, उपयोग, फायदे आणि संशोधन क्षेत्रातील योगदान यांचा अभ्यास करावा.

क्लोनिंग – संकल्पना, प्रकार, पद्धती, उपयोग आणि नैतिक पैलू समजून घ्यावेत.

मूलपेशी – मूलपेशी व भ्रूणीय पेशी यांतील साम्ये व फरक, मूलपेशी उपचारांचे महत्त्व आणि भारतातील सद्यस्थिती यांचा सविस्तर अभ्यास करावा.

जनुकीय सुधारित पिके – संकल्पना, फायदे, मर्यादा तसेच भारतामध्ये अशा पिकांच्या लागवडी व वापरासाठी आवश्यक असलेल्या मंजुरी प्रक्रिया समजून घ्यावी.

जैवसदृश औषधे – जैवसदृश औषधे आणि सर्वसाधारण औषधे यांतील फरक, त्यांचे महत्त्व, भारतातील संधी, आव्हाने आणि नियामक या बाबी समजून घ्याव्यात.

जैवभौतिकी – संकल्पना, विविध प्रकार, त्यांचे उपयोग तसेच फायदे आणि मर्यादा यांचा अभ्यास करावा.

जैवइंधने – जैवइंधनांच्या विविध पिढ्या, त्यांची वैशिष्ट्ये तसेच जैवइंधन क्षेत्रासाठी भारत सरकारने राबविलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करावा.

भारताची जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी

वर उल्लेख केलेल्या सर्व शाखांमध्ये भारताचे संशोधन, तंत्रज्ञानातील नवोपक्रम, स्टार्ट अप्स, आणि केस स्ट्डीज माहित करुन घ्यायला हवेत. खरेतर यावर भर देऊन तयारी करायला हवी. जीनोम इंडिया प्रकल्प, इंडीजेन प्रकल्प, इंडियन जीनोमिक डेटा सेट या भारताच्या प्रकल्पांची सविस्तर माहिती करुन घ्यायला हवी. या प्रकल्पांचे योगदान आणि ठळक उपलब्धी समजून घ्याव्यात.

जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या शाखांसाठी केंद्र व राज्य शासनाकडूण स्वतंत्र उपक्रम, धोरणे राबविली जातात. या धोरणांचा अभ्यास आवश्यक आहे.

भारतातील बायोइन्फॉर्मेटिक्स आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख संशोधन संस्था:

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, जीनोमिक्स आणि एकात्मिक जीवशास्त्र संस्था, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, राष्ट्रीय रोगप्रतिकारशास्त्र संस्था, डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि निदान केंद्र, जैवमाहितीशास्त्र आणि उपयोजित जैवतंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था या संस्थांच्या संकेतस्थळांवरून त्यांच्या क्षेत्रातील महत्वाच्या बाबी, चालू घडामोडी आणि या संस्थांचे एकुणच योगदान समजून घेणे आवश्यक आहे.