सार्वजनिक जीवनात विशेषत: प्रशासनामध्ये अधिकार मिळाल्यावर त्यांचा वापर करताना वैयक्तिक नीतिमत्तेबरोबरच इतर अनेक घटक निर्णय प्रक्रियेवर परिणाम करतात. हेच घटक तिची लोकप्रशासनातील नीतिमत्ता घडवतात किंवा बिघडवतात.

लोक जीवनामध्ये नीतिमत्ता का महत्त्वाची असते हे आपण मागील लेखामध्ये पाहिले. वैयक्तिक नीतिमत्तेच्या निर्धारक घटकांबरोबरच प्रशासकीय नीतिमत्तेचे निर्धारण करणारे काही विशिष्ट घटक कार्यरत असतात. व्यक्तिमत्त्वाचा पैलू म्हणून मूल्ये व्यक्तिची मूलभूत नैतिकता, त्याचे आदर्श आणि हेतू यांना आकार देतात. सार्वजनिक जीवनात विशेषत: प्रशासनामध्ये अधिकार मिळाल्यावर त्यांचा वापर करताना या वैयक्तिक नीतिमत्तेबरोबरच इतर अनेक घटक व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करतात. हेच घटक तिची लोकप्रशासनातील नीतिमत्ता घडवतात किंवा बिघडवतात. या घटकांबाबत या लेखामध्ये पाहू. 

संकल्पना

प्रशासनामध्ये तसेच सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्तीच्या सारासार विवेकावर, योग्य-अयोग्य आणि न्याय-अन्याय यांविषयीच्या धारणांवर तसेच तिच्या प्रत्यक्ष वर्तनावर प्रभाव टाकणारे घटक म्हणजे लोकप्रशासनातील नीतिमत्तेचे निर्धारक घटक. लोक प्रशासनामध्ये हे घटक प्रशासकीय अधिकार्‍यांच्या निर्णय प्रक्रियेवर, अधिकारांच्या वापरावर, नागरिकांशी असलेल्या वर्तनावर आणि सार्वजनिक हितासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकतात. वैयक्तिक नीतिमत्तेबरोबरच प्रशासनातील अधिकारी अणि कर्मचार्‍यांच्या नीतिमत्तेचे निर्धारण करणारे घटक सोबतच्या तक्त्यामध्ये दिले आहेत. त्यांचा लोकप्रशासनावर होऊ शकणारा प्रत्यक्ष परिणाम पाहू.

नीतिमत्तेचे निर्धारण करणारे घटक

क्रघटकआयाम
1वैयक्तिक घटकमूल्ये, सद्सद्विवेकबुद्धी,   भावनिक बुद्धिमत्ता व नैतिक धैर्य
2ऐतिहासिक घटकप्रशासकीय वारसा व संस्थात्मक परंपरा
3सामाजिक-सांस्कृतिककुटुंब, शिक्षण, संस्कार व सामाजिक मूल्ये
4राजकीय घटक      नेतृत्व, राजकीय हस्तक्षेप व प्रशासकीय निष्पक्षता
5कायदेशीर-न्यायिक घटक   कायदे, नियम, न्यायव्यवस्था व अंमलबजावणी
6आर्थिक घटकआर्थिक असुरक्षितता, विषमता व आर्थिक प्रलोभने
7संस्थात्मक घटक                कार्यालयीन संस्कृती, नेतृत्व, प्रोत्साहन व उत्तरदायित्व

तक्त्यामध्ये दिलेल्या सगळ्या घटकांचे स्वतंत्रपणे आकलन होणे गरजेचे आहेच पण प्रशासनात ते एकत्रितपणे परिणाम करतात हे लक्षात घेऊन तयारी करायला हवी. हे सगळे घटक अधिकार्‍याच्या प्रशासकीय वर्तनावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने परिणाम साधतात. व्यक्तीच्या व्यक्तिगत नीतिमत्तेचा तिच्या सार्वजनिक जीवनावर होणारा परिणाम याबाबत मागील चर्चेमध्ये आपण सविस्तरपणे पाहिले आहे. इतर घटकांचे लोकप्रशासनातील घटक म्हणून व्यक्तिसाठी आवश्यक नितीमत्तेवर होणारे परिणाम पाहू:

ऐतिहासिक घटक                        

प्रशासकीय व्यवस्थेत वर्षानुवर्षे चालत आलेल्या कार्यपद्धतीमध्ये कर्तव्यनिष्ठा, शिस्त, नियमांचे पालन, व्यावसायिकता असेल तर ती परंपरा पुढे चालविण्याकडे पुढील पिढीचा कल असतो. या उलट जुन्या पद्धतीमध्ये वसाहतकालीन मानसिकता, लालफीतशाही, अधिकारकेंद्री दृष्टिकोन आणि स्थितीवादी दृष्टीकोन असेल तर बदलांना विरोध  करणे, नवोपक्रमांचा अभाव, कामामध्ये चालढकल अशा मानसिकतेने कामकाज चालविले जाते.    

सामाजिक – सांस्कृतिक घटक          

ज्या कार्यपद्धतीला समाजमान्यता असेल त्या स्वीकारुन व्यक्ती आपले सार्वजनिक जीवन सुलभ करण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ ज्या कामाचे वेतन दिले जाते त्या कामाकरीता अतिरिक्त टीप/बक्षिस घेणे हे जपानमध्ये अशोभनीय मानले जाते तर काही अन्य देशांत अशी टीप देणे हे सुसंस्कृततेचे लक्षण मानले जाते. त्या त्या समाज मान्यतेनुसार सार्वजनिक जीवनातील कृती साकारते.

अशाच प्रकारे जातीआधारित ओळख आरक्षणाकरीता आवश्यक असली तरी तिच्या आधारावर विशिष्ट प्रकारे वागणूक दिली जाणे अयोग्य आहे हे जातीगत ओळखीचे दोन्ही पैलू स्वीकारले तर प्रशासन संवेदनशील होईल.

कायदेशीर घटक

कायद्यांमध्ये पळवाटा जास्त असतील किंवा त्यांची अंमलबजावणी कमकुवतपणे होत असेल तर भ्रष्टाचार वाढू शकतो; नियमांचे केवळ शब्दश: पालन करण्याऐवजी त्यामागचा हेतू साध्य करणे आवश्यक आहे हे समजलेला अधिकारी जास्त परिणामकारक आणि व्यवहार्य काम करतो तर नियमांचा अतिरेकी किंवा तांत्रिक भागच विचारात घेणारा अधिकारी काही वेळा असंवेदनशील निर्णय घेऊ शकतो. किंवा त्याचा निर्णय कायद्याचा हेतू साध्य करण्यात अपुरा पडू शकतो.       

राजकीय घटक             

नैतिक नेतृत्वामुळे जनहित, कार्यक्षमता, धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकाभिमुख प्रशासनाला प्रोत्साहन मिळते. तर राजकीय दबाव, असुरक्षितता, पक्षपात, हेतूपुर:स्सर बदल्या अशा बाबींमुळे नियमबाह्य निर्णय, भ्रष्टाचार वाढू शकतात. यातून घटनात्मक नैतिकतेचा र्‍हास होऊ शकतो.                                         

आर्थिक घटक                 

न्याय्य वेतन, आर्थिक सुरक्षितता आणि पुरेशी संसाधने यांमुळे कार्यक्षमता व कामावरील एकाग्रता वाढू शकते. तथापि, अधिकारी/ कर्मचार्‍यांस काही कारणांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर       

लाचखोरी, कमिशनखोरी, सार्वजनिक निधीचा गैरवापर, आर्थिक प्रलोभनांना बळी पडणे आणि संसाधनांचे असमान वाटप अशा बाबींची शक्यता वाढते. मात्र, आर्थिक अडचणी या भ्रष्टाचार करण्यासाठीचे पर्याप्त कारण नाही हे मानणारा अधिकारी लोकप्रशासनामध्ये नैतिकष्ट्या योग्य निर्णय घेतो हे लक्षात घेतले पाहिजे.                      

संस्थात्मक घटक  

एखाद्या संघटनेच्या कार्य संस्कृतीमध्ये पारदर्शकता, संघभावना, जबाबदारीची जाणीव आणि गुणवत्तापूर्ण सेवा या मूल्यांचा आदर्श ठेवला जात असेल तर सर्व स्तरांमध्ये ही नैतिकता दिसून येते. ज्या ठिकाणी वरिष्ठांची मनमानी, गैरप्रकारांकडे दुर्लक्ष, जबाबदारी टाळणे अशा बाबी सर्वमान्य किंवा सर्वसाधारण मानल्या जातात तिथे नैतिकदृष्ट्या कमजोर कार्यसंस्कृती निर्माण होऊ शकते.

steelframe.india@gmail.com