मागील लेखांमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर चारमधील प्रशासकीय अभिवृत्ती घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या मुद्द्यावर केंद्रीय नागरी सेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तरलेखन
या लेखामध्ये पाहू.
* ‘‘बौद्धिक क्षमता आणि नैतिक गुणांव्यतिरिक्त, सहानुभूती आणि करुणा हे देखील नागरी सेवकांना महत्त्वपूर्ण प्रश्न हाताळताना किंवा निर्णायक निर्णय घेताना अधिक सक्षम बनविणारे महत्त्वपूर्ण गुण आहेत.’’
योग्य उदाहरणांसह स्पष्ट करा. (१० गुण, १५० शब्द मर्यादा)
उत्तरासाठी योग्य दृष्टिकोन
बौद्धिक क्षमतेमुळे अधिकारी समस्येचे स्वरूप, कारणे आणि संभाव्य उपाय यांचे शास्त्रीय विश्लेषण करू शकतो. पण सहानुभूती आणि करुणा नसेल तर तो समस्येचा मानवी संदर्भ दुर्लक्षित करून तांत्रिकदृष्ट्या योग्य पण सामाजिकदृष्ट्या अपुरा निर्णय घेऊ शकतो. हे उदाहरणांसह दाखवणे उत्तरामध्ये अपेक्षित आहे.

म्हणून प्रभावी नागरी सेवकासाठी बुद्धी समस्या समजून घेते; नैतिकता योग्य दिशा देते; सहानुभूती त्या दिशेला मानवी स्पर्श देते. सोबतच्या तक्त्यात अशा परिस्थिती दिल्या आहेत जिथे दोन्ही आवश्यक आहेत, पण सहानुभूतीमुळे निर्णयाला अतिरिक्त धार मिळते.
वरील चर्चेच्या आधारे उत्तर कशा प्रकारे लिहिता येईल ते पाहू.
उत्तर क्रमांक १
(१४२ शब्द) सहानुभूती म्हणजे दुसर्याच्या परिस्थितीचा त्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे, तर करुणा म्हणजे त्या जाणिवेतून मदतीची कृती करण्याची प्रेरणा.
नागरी सेवेत बौद्धिक क्षमता समस्या समजून घेण्यास व तर्कसंगत उपाय शोधण्यास, तर नैतिक गुण योग्य-अयोग्याची दिशा ठरविण्यास मदत करतात. मात्र, सहानुभूती व करुणा या गुणांमुळे निर्णयांना मानवी संदर्भ प्राप्त होतो आणि प्रशासन अधिक परिणामकारक बनते. त्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे:
* अतिक्रमण हटविताना बौद्धिक क्षमता कायदेशीर स्थिती निश्चित करते; सहानुभूतीमुळे प्रभावित कुटुंबांच्या उपजीविकेचा विचार करून कायदेशीर पुनर्वसनाचा पर्याय शोधला जातो.
* आपत्ती व्यवस्थापनात आकडेवारी व संसाधनांचे विश्लेषण आवश्यक असते; परंतु सहानुभूतीमुळे वृद्ध, महिला, बालके व अपंगांच्या विशिष्ट गरजा ओळखल्या जातात.
* सामुदायिक तणावात वस्तुनिष्ठ परिस्थितीचे विश्लेषण महत्त्वाचे असते; सहानुभूतीमुळे विविध समुदायांच्या भीती व गैरसमज समजून संवादातून विश्वास निर्माण करता येतो.
* कल्याणकारी योजनांमध्ये आकडेवारी लाभार्थी ओळखते; संवेदनशीलता प्रत्यक्ष अडथळे दूर करण्यास मदत करते.
या उदाहरणांवरून लक्षात येते की, बुद्धिमत्ता उपाय शोधते, नैतिकता दिशा देते आणि सहानुभूती त्या उपायाला मानवी स्पर्श देते. बौद्धिक क्षमता ‘‘योग्य उपाय शोधते’’, तर सहानुभूती ‘‘तो उपाय कोणत्या मानवी परिणामांसह लागू होईल’’ हे समजण्यास मदत करते.
उत्तर क्रमांक २ (१४४ शब्द) नागरी सेवेत बौद्धिक क्षमता योग्य निर्णय घेण्यास आणि नैतिक मूल्ये योग्य निर्णय घेण्यास दिशा देतात; परंतु सहानुभूती व करुणा या निर्णयांना मानवी संवेदनशीलता प्रदान करतात. विशेषत: दुर्बल घटकांशी संबंधित गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये ही मूल्ये प्रशासनाची गुणवत्ता वाढवतात. नागरी सेवेत या दोन मूल्यांची उपयुक्तता पुढीलप्रमाणे दिसते.
* दुर्बल घटक : अपंग, वृद्ध, महिला किंवा आदिवासी नागरिकांच्या विशिष्ट अडचणी समजून घेऊन सेवा अधिक सुलभ करणे.
* आपत्ती व्यवस्थापन :
पूर किंवा भूकंपग्रस्तांच्या केवळ भौतिक गरजा नव्हे, तर मानसिक व सामाजिक गरजांचाही विचार करणे.
* धोरणांची अंमलबजावणी : नियमांची अंमलबजावणी करताना लाभार्थ्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती समजून घेणे.
* संघर्षनिवारण : विविध समूहांच्या भावना समजून घेऊन संवाद व विश्वासाच्या माध्यमातून तणाव कमी करणे.
उदा., रस्ते रुंदीकरणात विस्थापित कुटुंबांचे पुनर्वसन करताना केवळ कायदेशीर भरपाईऐवजी उपजीविका आणि मुलांच्या शिक्षणाचाही विचार करणे हे संवेदनशील प्रशासनाचे उदाहरण आहे.
सहानुभूती व करुणा नागरी सेवकाच्या निर्णयक्षमतेला मानवी प्रतिष्ठा आणि लोकाभिमुखता प्रदान करतात. त्यामुळे त्या केवळ वैयक्तिक सद्गुण न राहता सुशासनाची आवश्यक प्रशासकीय मूल्ये ठरतात.
steelframe.india@gmail.com
