सामान्य अध्ययन पेपर- ३ मधील कृषी व पूरक क्षेत्रे या उपघटकामध्ये कृषी अर्थशास्त्रातील उत्पादन खर्च आणि विक्री किंमत या मूलभूत आयामांशी संबंधित बाबी अभ्यासक्रमामध्ये ‘प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्दे’ अशा प्रकारे नमूद केल्या आहेत. या लेखामध्ये कृषी अनुदान या मुद्द्याच्या तयारीबाबत या लेखामध्ये पाहू.
कृषी अनुदाने ही केवळ कृषी निविष्ठांसाठीच (आदाने) नाही तर कृषी माल विपणनासाठीही दिली जातात. या अनुदानांचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये ही वस्तुनिष्ठ माहिती आहे आणि पूर्व परीक्षेसाठी जास्त उपयुक्त आहे. पण या वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या आणि त्यांच्यावरील उपायांबाबतच्या विश्लेषणात्मक प्रश्नांची उत्तरे लिहिणे शक्य होणार आहे.
अनुदानांचे प्रकार
खते, बियाणे यांच्या खरेदीसाठी, पाणी, वीज यांच्या अखंडीत पुरवठ्यासाठी, कृषी अवजारे, यंत्रे खरेदीसाठी शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान देण्यात येते. यासाठीच्या योजनांची थोडक्यात माहिती करून घ्यायला हवी.
आवश्यकता
शेतकऱ्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी कृषी निविष्ठांमधील अनुदानांचा कसा उपयोग होतो, त्याचा शेतकऱ्यांच्या कुटुंबावरील सामाजिक, आर्थिक परिणाम नेमका समजून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी ही अनुदाने आवश्यक आहेत का असा विश्लेषणात्मक प्रश्न अपेक्षित यादीमध्ये अग्रक्रमावर असेल हे लक्षात घेऊन याबाबत विश्लेषण करणे गरजेचे आहे.
परिणामकारकता
अशा अनुदानाच्या योजनांमधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ़ होण्यास मदत होते का? असेल तर त्याची व्याप्ती किती आहे? नसेल तर त्यामागची कारणे काय आहेत हे सगळे चिंतनाचे मुद्दे आहेत.
समस्या
निविष्ठांमध्ये अनुदान मिळाल्याने उद्भवू शकणाऱ्या समस्या हा समजून घेणे आणि उत्तरामध्ये मांडणे यासाठी इंटरेस्टिंग मुद्दा आहे. योग्य तयारी केली तर या मुद्द्यावर खूप चांगले गुण मिळवता येतील. अनुदानाच्या खात्रीमुळे संसाधनांचा अवैज्ञानिक पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात वापर होऊ शकतो हे समजून घ्यावे लागेल. खतांचा आणि बियाण्यांचा योग्य सांगड न घालता वापर करणे, खतांचा प्रमाणशीर पद्धतीने वापर करण्याऐवजी अमाप वापर, पाण्याचा अतिरीक्त उपसा असे दृष्य परिणाम विचारात घ्यायलाच हवेत. याशिवाय अप्रत्यक्ष परिणामांमध्ये हरितगृह वायूंचे उत्सर्जन, पर्यावरणीय प्रदूषण, भूजल पातळीमधील घट, पीक उत्पादनामध्ये विविधता कमी होणे अशा बाबी समजून घ्यायला हव्यात.
अनुदान योजना
कृषी निविष्ठांचा खर्च कमी करणे, कृषी यांत्रिकीकरण आणि पायाभूत सुविधा विकास अशा मुख्य आयामांनुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक अनुदान योजनांचा आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये योजनेचे उद्दिष्ट आणि स्वरूप, लाभाचे स्वरूप, निकष आणि मूल्यमापन हे मुद्दे विचारात घ्यायला हवेत. पीएम किसान सारख्या शेती व्यवसायामधील कोणत्याही आयामाशी संबंधित नसलेल्या अनुदान योजनांचे मूल्यमापन करणे व आपली मते उत्तरामध्ये मांदता येणे आवश्यक आहे.
प्रमुख राष्ट्रीय कृषी अनुदान योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान):
पात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या साधनांना आधार देण्यासाठी वार्षिक ६ हजार रु.
प्रधानमंत्री पीक विमा योजना :
पेरणीपूर्व ते काढणीनंतरच्या काळातील जोखमींचा समावेश असलेली पीक अपयश किंवा नुकसानीसाठी कमी प्रीमियमची विमा योजना
किसान क्रेडिट कार्ड:
बियाणे आणि खते यांसारख्या कृषी निविष्ठांसाठी अल्प मुदतीचे, परवडणारे कर्ज
कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF):
काढणीनंतरच्या व्यवस्थापन पायाभूत सुविधांच्या स्थापनेसाठी आर्थिक सहाय्य आणि व्याज सवलत परंपरागत कृषी विकास योजना :
निविष्ठा, प्रमाणीकरण आणि विपणनासाठी आर्थिक सहाय्य देऊन सेंद्रिय शेतीला समर्थन
पर ड्रॉप मोअर क्रॉप (PDMC): पाण्याच्या वापराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन प्रणालींकरिता अनुदान प्रधानमंत्री किसान मान-धन योजना १८ ते ४० वयोगटातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक ऐच्छिक निवृत्तीवेतन योजना, ज्यामध्ये वयाच्या ६० वर्षांनंतर ₹३,००० मासिक निवृत्तीवेतन दिले.
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी अनुदान योजना:
स्मार्ट (महाराष्ट्र कृषी-व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प):
शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेची उपलब्धता वाढवणे आणि कृषी-व्यवसायांना पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना:
१६ बारमाही फळ पिकांना (आंबा, काजू, लिंबूवर्गीय इ.) प्रोत्साहन
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (मागेल त्याळा शेततळे):
वैयक्तिक शेततळे बांधकामासाठी १४,४३३ ते ७५,००० रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य.
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना:
कृषी यंत्रसामग्री/अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान (५०-८०%पर्यंत).
मिनी ट्रॅक्टर अनुदान:
लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीकरीता ९०% अनुदान
सौर फवारणी पंप अनुदान:
पर्यावरणपूरक आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपांना प्रोत्साहन.
मोफत बियाणे मिनी किट्स:
तेलबिया आणि कडधान्य उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी मोफत बियाणे वितरण
शेळीपालन युनिटसाठी अनुदान योजना (१० १):
शेळीपालन युनिट स्थापन करण्यासाठी अनुदान
कृषी अनुदानांचे महत्त्व
कृषी अनुदाने ही केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठीच नव्हे तर नागरिकांच्या अन्न सुरक्षेकरीताही महत्त्वाची आहेत हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांना मोफत वीज आणि पाणी, अनुदानित बियाणे आणि रासायनिक खते अशा स्वरूपात वेगवेगळी अनुदान पुरविते. वाहतूक सुविधा आणि किमान आधारभूत किंमती हे अनुदानांचे प्रकार शेतकऱ्याला योग्य विक्री किमतीची हमी देतातच, नागरिकांनाही महागाई नियंत्रित करून योग्य खरेदी किमतीची हमी देतात.
