अन्न प्रक्रिया उद्योगांची व्याप्ती

भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगांची मूलभूत माहिती करुन घेऊन मग विश्लेषणात्मक भागाकदे वळायला हवे. यामध्ये अन्न प्रक्रियेमध्ये कोणत्या बाबी समाविष्ट होतात, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रांमधील प्रक्रिया कोणत्या, अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कोणते उद्योग समाविउष्ट होतात हे समजून घ्यावे.

अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जागतिक क्रमवारीतील भारताचा क्रमांक, जागतिक बाजारातील वाटा, भारतातील GDP, GVA मध्ये या उद्योगाचा वाटा आणि वार्षिक वाढ ही आकडेवारी दरवर्शीच्या आर्थिक पाहनी अहवालामधून अद्ययावत करुन घ्यायला हवी.

अन्न प्रक्रिया उद्योगांचे महत्व

अन्न प्रक्रिया या मूलभूत प्रक्रियेचे महत्व समजून घेणे परीणामकारक उत्तर लेखनासाठी महत्वाचे आहे. आर्थिक मुद्यांवर भर असला तरी याचे जीवशास्त्रीय आणि अन्य सामाजिक आयामही विचारात घ्यावेत. विषारी द्रव्ये हटविणे, अन्न सुसंगतता आणि पोषणमूल्य वाढविणे, कुपोषणास आळा घालणे, अन्न नाश कमी करणे, शेतक-यांचे उत्पन्न वाढविणे, रोजगार निर्मिती, पिक वैविध्यीकरण अशा सर्व बाजूंनी अन्न प्रक्रिया उद्योगांचे मह्त्व समजून घ्यायला हवे. यामध्ये केस स्ट्डीज माहित असतील तर उत्तरामध्ये उदाहरणांचा वापर करता येईल. केस स्ट्डीज चा उल्लेख करताना समाजमाध्यमांवरची माहिती वापरण्यापेक्षा अधिकृत स्त्रोतांवरची माहिती वापरावी.

अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थान निश्चिती

कोणत्याही उद्योगाची स्थान निश्चिती ही कच्च्या मालाची उपलब्धता, मनुष्यबळ, जमिन, पायाभूत सुविधा यांच्या उपलब्धतेवर आणि बाजारापासूनचे अंतर आणि वाहतूक व साठवण सुविधा यांच्या आधारे होत असते. वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगांची स्थान निश्चितीवर प्रभाव टाकणारे घटक वेगवेगळे असू शकतात. उदा. नाशवंत कृषी मालावरील प्रक्रिया उद्योग हे कच्च्या मालाच्या उत्पादनस्थळाच्या जवळ उभारले जातात. अशी लोजिक्स लक्षात घेऊन हा मुद्दा समजून घ्यायला हवा.

प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन

प्रतिवाह म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता व उत्पादनासाठी आवश्यक आदाने आणि अपवाह म्हणजे उत्पादीत मालाचा बाजारात प्रवेश व विक्री. या दोन्हींसाठी आवश्यक असलेले घटक समजून घेणे आवश्यक आहे. कच्चा माल, मनुष्यबळ, तंत्रज्ञान, या बाबी उत्पादनपूर्व आणि साठवण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था या उत्पादन पश्चात बाबींचा यामध्ये समावेश होतो. या सर्व बाबींची उपलब्धता, त्याम्चे महत्व, त्यांच्या विकासाकरीता होणारे प्रयत्न यांचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा.

प्रत्येक अन्न प्रक्रिया अथवा कृषीमाल आधार्त उद्योगासाठी स्वतंत्र नोट्स काढाव्यात. प्रतिवाह आणि अनुवाह आवश्यकतांचे व्यवस्थापन म्हणजेच पुरवठा साखळी व्यवस्थापन हे समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक उद्योगाचे स्वतंत्रपणे आणि एकूण औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापन अशा दोन्ही आयामांनी या मुद्याचा विचार करायला हवा.

अन्न प्रक्रिया उद्योगांसमोरील आव्हाने

हंगामी कामकाज, पारंपरिक पद्धतीने कृषी उत्पादन, प्रतवारी आणि प्रमाणीकरणाचा अभाव, तंत्रज्ञानाचा अपुरा वापर, महागडे तंत्रज्ञान, पुरवठा साखळीमधील त्रुटी आणि अडथळे, शीतगृहे, वखारी अशा सुविधांची कमतरता, हितसंबंधीयांमध्ये समन्वयाचा अभाव या आव्हानांचा स्वरुप, कारणे, परीणाम आणि उपाययोजना अशा मुद्यांच्याआधारे अभ्यास आवश्यक आहे. ग्राहकांच्या बाजूने उत्पादनाचे प्रमाणीकरण, गुणवत्ता, पोषण मूल्य, भेसळ याबाबतची जागरुकता हा महत्वाचा मुद्दा आहे.

अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी शासकीय उपक्रम

अन्न प्रक्रिया उद्योगांच्या विकासासाठी होणारे शासकीय उपक्रम उद्देश, उद्दीष्टे, स्वरुप, कालावधी, लाभार्थ्यांचे निकष, लाभाचे स्वरुप, मूल्यमापन या मुद्यांच्या आधारे अभ्यासावेत आणि त्यांच्याबाबतची आकडेवारी अद्ययावत ठेवावी.

या अभ्यासक्रमामध्ये Upstream and downstream requirements या इंग्रजी संज्ञांचा शब्दशः मराठी (खरेतर संस्कृत) अनुवाद करुन प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता असा मुद्दा दिलेला आहे. काही वेळा इंग्रजी शब्द जास्त सोप्या पद्धतीने समजतात पण उत्तर मराठीमध्ये लिहायचे असेल तर अशा अवघड संज्ञा लक्षात ठेवाव्या लागतील. इंग्रजीमधून तयारी आणि मराठी माध्यमातून उत्तरलेखन हा approach वैज्ञानिक विषयांसाठी फायदेशीर ठरतो.