राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर – ३ मधील विज्ञान-तंत्रज्ञान या घटकाच्या तयारीबाबत सध्या चर्चा सुरू आहे.अभ्यासक्रमामध्ये नमूद मुद्दे बारकाईने समजून घेतले तर विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रातील चालू घडामोडी आणि त्यांचा दैनंदिन जीवनावरील परिणाम हा या घटकाचा केंद्रबिंदू आहे हे लक्षात येते. त्यामुळे मागील लेखामध्ये दिलेल्या विस्तृत मुद्द्यांबाबतच्या चालू घडमोडी माहित करून घेऊन त्यांची तयारी करणे आवश्यक आहे. या लेखामध्ये या घटकावर नागरी सेवा मुख्य परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर -३ मधल्या प्रश्नाचे उत्तर लेखन कशा प्रकारे करता येईल ते पाहू.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence –  AI)  ही संकल्पना स्पष्ट करा. क्लिनिकल रोग निदानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे मदत करते? आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे व्यक्तीच्या गोपनीयतेला काही धोका निर्माण होतो असे तुम्हाला वाटते का?

उत्तर: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)म्हणजे संगणक किंवा यंत्रांना मानवी बुद्धिमत्तेसारखी विचार, विश्लेषण, शिकणे आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करणारे तंत्रज्ञान होय. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून अचूक निष्कर्ष काढते.

आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे क्लिनिकल निदान अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक झाले आहे. क्लिनिकल निदानातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका:

रोगांचे प्राथमिक निदान : एक्स-रे,  टफक,  उळ स्कॅन यांच्या अहवालांचे विश्लेषण करून कर्करोग, क्षयरोग,

हृदयरोग इत्यादींचे कमी वेळेत निदान करण्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली उपयोगी ठरत आहे.

अचूकता वाढविणे : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत निदान प्रणालीस योग्य डेटा उपलब्ध झाला तर संभाव्य मानवी चुका टाळून निदानाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

डेटा विश्लेषण : रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासाचे विश्लेषण करून संभाव्य आजारांची पूर्वकल्पना देण्यास कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयोगी ठरत आहे.

टेलिमेडिसिन व ग्रामीण आरोग्यसेवा : डॉक्टरांची कमतरता असलेल्या भागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट्स व डिजिटल साधने रोग निदान आणि उपचार दोन्हींमध्ये मदतगार ठरतात.

व्यक्तिपरत्वे उपचार

(Personalized Medicine): कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत निदान प्रणालीचा वापर करुन प्रत्येक रुग्णाची जैविक माहिती आणि त्याचा वैद्यकीय इतिहास यांचा एकत्रित विचार करुन संभाव्य जोखीमा लक्षात घेता येतात. त्यानुसार व्यक्तिपरत्वे विशिष्ट उपचार सुचवले जातात.

तथापि, रुग्णाची गोपनीयता विचारात घेता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काही गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, त्या पुढीलप्रमाणे:

डेटा चोरीचा धोका : रुग्णांची वैद्यकीय माहिती हॅकर्सकडून चोरी होऊ शकते.

माहितीची अनधिकृत देवाणघेवाण : रुग्णाच्या परवानगीशिवाय त्याची माहिती इतर व्यक्तींना मिळू शकते.

खासगी माहितीचा गैरवापर: आरोग्यविषयक माहिती विमा कंपन्या किंवा व्यावसायिक संस्थांकडून चुकीच्या पद्धतीने वापरली जाऊ शकते.

चुकीचे निदान : चुकीचा डेटा किंवा अल्गोरिदममध्ये bias असल्यास चुकीचे उपचार सुचवले जाऊ शकतात.

त्त् मानवी नियंत्रण कमी होणे: पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहिल्यास डॉक्टरांचा मानवी निर्णय व संवेदनशीलता कमी होऊ शकते.

म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर करण्यासाठी मजबूत डेटा संरक्षण कायदे, सायबर सुरक्षा, पारदर्शक अल्गोरिदम आणि नैतिक नियमन आवश्यक आहे. योग्य नियमनासह  AI  आरोग्यसेवेत क्रांती घडवू शकते.

स्पष्टीकरण 

प्रश्नामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेची संकल्पना स्पष्ट करण्यास संगितले आहे. कोणात्याही विशेष शिक्षण प्रशिक्षाणाशिवाय नागरी सेवा परीक्षेचा उमेदवार म्हणून ही संकल्पना व्यवस्थित समजलेली असणे आयोगाला अपेक्षित आहे. याचा अर्थ ही संकल्पना समजून तिचा वापर कशा प्रकारे करता येईल याबाबत तुमचे स्वत:चे मत तयार असणे आवश्यक आहे. या प्रश्नामध्ये त्या पुढील टप्पा म्हणजे वापराबाबतचे विश्लेषण विचारलेले आहे. दैनंदिन वापरामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणात्या समस्या उद्भवू शकतात याबाबत उमेदवारांनी सजग असणे आयोगाला अपेक्षित आहे हे या प्रश्नावरून समजून येते.

आता उत्तराचे विश्लेषण पाहू. प्रश्नाचे तीन भाग आहेत:

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना स्पष्ट करणे

तिची रोग निदानामधील उपयुक्तता

रोगनिदानामधील वापरामुळे उद्भवणार्या गोपनीयतेबाबतच्या समस्या

उत्तरामध्ये योग्य पद्धतीने महत्त्व देऊन तिन्ही मुद्दे कव्हर केलेले आहेत. पण शब्दमर्यादेचे पालन झालेले नाही. २५० शब्दमर्यादेची उत्तरे लिहिताना जास्तीत जास्त

१० % शब्द वाढवून वापरणे ठीक आहे. पण हे उत्तर ३०२ शब्दांचे झाले आहे.

गोपनीयतेबाबतच्या समस्या लिहीताना अचानक डॉक्टरांचा मानवी हस्तक्षेप आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. हा मुद्दा उत्तरासाठी आवश्यकही नाही आणि समर्पकही नाही. तो गाळून कमी शब्दांत समारोप केला असता तर हे आदर्श उत्तर झाले असते.

गेल्या वर्षीचे प्रश्न

राज्य सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा केंद्रीय नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारीत आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षेचे नव्या अभ्यासक्रमानुसार हे पहिलेच वर्ष असेल. त्यामुळे नागरी सेवा परीक्षा मुख्य परीक्षेच्या मागील वर्षीच्या प्रश्नांचे विश्लेषण करुन प्रश्नांबाबत अंदाज बांधता येऊ शकतो.

steelframe.india@gmail.com