प्रश्न: “नक्षलवाद हा सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक समस्यांमधून उद्भवलेला असून तो हिंसक अंतर्गत सुरक्षा धोक्याच्या स्वरूपात प्रकट होतो. या पार्श्वभूमीवर नक्षलवादासंदर्भातील उदयोन्मुख मुद्द्यांची चर्चा करा आणि या समस्येवर मात करण्यासाठी बहुस्तरीय धोरण सुचवा.”

उत्तर १: पारंपरिक रचना (सुमारे २७० शब्द)

उदयोन्मुख मुद्दे

नक्षलवाद हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून सामाजिक अन्याय, आर्थिक विषमता, आदिवासींचे विस्थापन, बेरोजगारी आणि विकासातील असमतोल यांमधून निर्माण झालेला अंतर्गत सुरक्षा धोका आहे. गेल्या काही वर्षांत सुरक्षा कारवायांमुळे त्याचा भौगोलिक विस्तार कमी झाला असला तरी त्याचे स्वरूप अधिक तांत्रिक आणि स्थानिक झाले आहे.

आज नक्षलवादाबाबत काही नवीन आव्हाने दिसून येतात. ड्रोन, एन्क्रिप्टेड संवाद प्रणाली आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढत आहे. समाज माध्यमांमधून स्थानिक युवकांची भरती, खंडणीद्वारे निधी उभारणी, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणेवर नेमके हल्ले तसेच राज्यांमधील समन्वयाची समस्या ही महत्त्वाची आव्हाने आहेत. याशिवाय पर्यावरण, वनहक्क आणि विकास यांतील संघर्षामुळे स्थानिक असंतोष वाढण्याची शक्यता कायम आहे.

आवश्यक बहुस्तरीय धोरण

या समस्येवर मात करण्यासाठी बहुस्तरीय धोरण आवश्यक आहे. प्रथम, गुप्तचर यंत्रणा, आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोनविरोधी प्रणाली आणि राज्यांमधील समन्वय वाढवून सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करायला हवी. रस्ते, आरोग्य, शिक्षण, इंटरनेट, बँकिंग आणि रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांचा वेगाने विस्तार करणे आवश्यक आहे. वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासींचे हक्क सुरक्षित करावे आणि त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करायला हवे. शरणागती व पुनर्वसन धोरण अधिक आकर्षक करून कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि समुदायाच्या सहभागातून शासनावरील विश्वास वाढवावा. दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रभावी माहिती व्यवस्थापन आवश्यक आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे तपास यंत्रणांसमोर निर्माण होणाऱ्या अडचणींवर कायदेशीर आणि तांत्रिक उपाय शोधणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० आणि माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ या नियमांद्वारे सोशल मीडिया कंपन्यांवर तक्रार निवारण व्यवस्था, आक्षेपार्ह सामग्री हटविणे या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची खात्री पटविणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे “सुरक्षा आणि विकास” यांचा समतोल राखणारे SAMADHAN, Security Related Expenditure Scheme आणि Aspirational Districts Programme यांसारख्या उपक्रमांना बळ देत लोककेंद्रित शासनाद्वारे नक्षलवादाचे कायमस्वरूपी निर्मूलन करता येईल.

उत्तर २ : मुद्देसूद रचना (सुमारे 221 शब्द)

नक्षलवाद हा सामाजिक, प्रशासकीय आणि आर्थिक कारणांमुळे उद्भवलेला अंतर्गत सुरक्षा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे स्वरूप अधिक तांत्रिक आणि स्थानिक झाले आहे. याबाबत नव्याने उदयाला येत असलेली आव्हाने आणि त्यावरील उपाय योजना पुढीलप्रमाणे:

१. उदयोन्मुख मुद्दे

नक्षलवादी गटांचा एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन आणि डिजिटल नेटवर्कचा वाढता वापर.
ड्रोन, IED आणि आधुनिक शस्त्रांचा वाढता वापर.

सायबर प्रचार व ऑनलाइन कट्टरतावाद
समाज माध्यमांमधून स्थानिक युवकांची भरती व कट्टरतेचा प्रसार.

खंडणी, अवैध खाणकाम व जंगल संसाधनांमधून निधी.
पायाभूत सुविधा व सुरक्षा दलांवर सुनियोजित हल्ले.

वनहक्क, खाण प्रकल्प व विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणारा असंतोष.
पर्यावरणीय व आदिवासी प्रश्नांचा प्रचारासाठी वापर

२. बहुस्तरीय उपाययोजना

(अ) सुरक्षा स्तर

आधुनिक शस्त्रे, ड्रोन व गुप्तचर क्षमता वाढविणे, आंतरराज्य तसेच विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय वाढविणे, SAMADHAN धोरणाची प्रभावी अंमलबजावणी.

(ब) विकास स्तर

रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क, आरोग्य व शिक्षण यांची उपलब्धता विस्तारणे, कौशल्य विकास व स्थानिक रोजगार यांमधील संधी वाढविणे, Aspirational Districts Programme ला गती देणे

(क) सामाजिक स्तर

वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, आदिवासींचा निर्णयप्रक्रियेत सहभाग, विश्वास निर्माण करणारे प्रशासन.

(ड) प्रशासनिक स्तर

माहिती तंत्रज्ञान अधिनियम व नियम यांची प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि समुदायाचा सहभाग, भ्रष्टाचारावर नियंत्रण, जलद न्याय व तक्रार निवारण.

(ई) पुनर्वसन स्तर

शरणागती व पुनर्वसन योजनेअंतर्गत आकर्षक प्रस्ताव, शिक्षण, उद्योजकता व आर्थिक पुनर्वसन.

निष्कर्ष

नक्षलवादाविरुद्धची लढाई केवळ बंदुकीने जिंकता येत नाही; न्याय, विकास, सुशासन आणि लोकसहभाग यांच्या समन्वित प्रयत्नांनीच कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करता येईल.

स्पष्टीकरण

उत्तर १ ची बलस्थाने

अधिक विश्लेषणात्मक आणि प्रवाही, प्रस्तावना व निष्कर्ष प्रभावी, Essay-type उत्तरासाठी उपयुक्त, प्रत्येक उपायामागील तर्क स्पष्ट होतो.

उत्तर १ ची मर्यादा
परीक्षकाला मुद्दे पटकन दिसत नाहीत, उदयोन्मुख मुद्दे म्हणून जुने मुद्देही नमूद केले आहेत, आकृती किंवा फ्लोचार्ट नसल्याने दृश्य प्रभाव कमी आहे.

उत्तर २ ची बलस्थाने
योग्य सादरीकरण, उत्तराचे तीन भाग स्पष्ट दिसतात: कारणे – उदयोन्मुख मुद्दे, बहुस्तरीय उपाययोजना, कमी वेळात जास्त मुद्दे मांडता येतात.

उत्तर २ ची मर्यादा
प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण कमी आहे, उदयोन्मुख मुद्यांमध्ये जुने मुद्देही लिहीले आहेत, जर फक्त मुद्दे लिहिले तर उत्तर थोडे वर्णनहीन वाटू शकते, परिणामकारक रचना

३०–४० शब्दांची प्रस्तावना – लहान आकृती – उदयोन्मुख मुद्दे (५–६ मुद्दे, प्रत्येकी एका ओळीत, नेमकेपणाने) – बहुस्तरीय उपाययोजना (५ स्तर, प्रत्येकी २–३ मुद्दे) – ३०–४० शब्दांचा निष्कर्ष