फारुक नाईकवाडे

राज्यसेवा पूर्व परिक्षेमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने विचारण्यात येतो. या घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये पाहू. 

प्राचीन इतिहास

’    महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक पुरातत्व स्थळे, त्यांचा काळ, उत्खननातील वस्तू आणि त्यात्या कालखंडाबाबत इतिहासकारांची मते माहित असायला हवीत. भारतातील प्रागैतिहासिक इतिहासाचा आढावा घेणे पुरेसे ठरेल.

’    सिंधु संस्कृतीमधील पुरातत्व स्थळे, तेथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्टय़े, उत्खननकर्ते, नगर रचनेची ठळक वैशिष्टय़े, कालखंड व अस्ताबाबतची इतिहासकारांची मते या बाबी माहीत असाव्यात.

’    वैदिक व उत्तरवैदिक कालखंडातील साहित्य, साहित्यकार, त्या काळातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचे स्वरूप समजून घ्यावे.

’    जैन व बौद्ध धर्माचा उदय व विस्तार, त्यांची मुख्य शिकवण, ग्रंथ, राजाश्रय तसेच त्या काळखंडातील सोळा महाजनपदे, त्यांचे महत्त्वाचे शासक यांचा आढावा घ्यावा.

’    तमिळ संगम साहित्य, साहित्यकार आणि ग्रंथ, महत्त्वाच्या ग्रंथांचे विषय, कालखंड, राजवटी / राजाश्रय यांचा आढावा घ्यावा.

’    मौर्य व गुप्त साम्राज्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाचे स्त्रोत, शिलालेख, नाणी, साहीत्य यांच्या टेबलमध्ये नोटस काढाव्या. या कालखंडातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचे स्वरूप समजून घ्यावे.

’    प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन घराणे, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट घराणे, शिलाहार, गोंड घराणे या घराण्यांचा अभ्यास कालखंड, संस्थापक, महत्त्वाचे राजे, शाखा व त्याचे प्रमुख या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

मध्ययुगीन इतिहास

’    या कालखंडातील वास्तुकला, चित्रकला व संगीत आणि नृत्य या दृष्यकलांचा वेगवेगळय़ा शैली, त्यांची वैशिष्टय़े व त्यांचे क्षेत्र या मुद्दय़ांच्या आधारे नोट्स काढून अभ्यास करावा. उत्तर व दक्षिण भारतातील स्थापत्य आणि शिल्प व दृष्य कलांचा आढावा घ्यावा. महत्त्वाच्या शास्त्रीय शोधांचा आढावा घ्यावा.

’    या कालखंडात भारतातील वेगवेगळय़ा राज्यांच्या आश्रयाला असलेले साहित्यिक, इतिहासकार आणि त्यांच्या रचना व त्यातील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा विषय, परकीय प्रवासी आणि त्यांची प्रवासवर्णने यांच्या टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.

’    हर्षांच्या अस्तानंतर सल्तनत कालखंडापर्यंतचे प्रादेशिक राज्ये, त्यांचे महत्त्वपूर्ण राजे, लढाया, त्यांचे परिणाम, समकालीन जगभरातील घटना आणि त्यांचा भारतावरील परिणाम हे मुद्दे असणारे टेबल करावेत.

’    सल्तनत व मुघल काळातील महत्त्वाचे राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे आर्थिक – सामाजिक निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय, सांस्कृतिक जीवन यांचा टेबलमध्ये अभ्यास करावा.

’    मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रमुख राजवटींचा अभ्यास – चालुक्य, यादव, बहामनी – (ईमादशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही) महत्त्वाचे राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

मराठा कालखंड

(१६३०-१८१८)

’    शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या लढाया, तह, ठळक घडामोडी, अष्ट्प्रधान मंडळ, आर्थिक व राजकीय निर्णय यांचा बारकाईने अभ्यास करावा. महत्त्वाचे पेशवे, त्यांच्या लढाया, त्यांचे निर्णय, तह, महत्त्वाचे मराठा सरदार व त्यांचे कार्यक्षेत्र हे मुद्दे लक्षात घ्यावेत.

’    वारकरी संप्रदाय, महानुभव पंथ, इतर मध्ययुगीन संत, त्यांच्या रचना, त्यांची शिकवण यांचा आढावा घ्यावा.

स्वातंत्र्यपूर्व इतिहास

’    ब्रिटिशांची आर्थिक नीती, महत्त्वाचे चार्टर कायदे, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ. चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची विधाने माहीत असावीत.

’    शेतकरी व आदिवासींचे बंड, १८५७ चा उठाव, गांधीयुगातील शेतकरी, आदिवासी, कामगार, संस्थानी जनता इ. च्या चळवळी/ बंड अशा संघर्षांचा अभ्यास कारणे/पार्श्वभूमी, स्वरूप, विस्तार, वैशिष्टय़े, प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, परिणाम या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

’    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ व जहाल कालखंडांचा अभ्यास सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत, दोन्ही कालखंडातील नेत्यांच्या मागण्या, महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य, दोन्ही कालखंडातील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया या मुद्दय़ांच्या आधारे तुलना करून करावा.

’    सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार यांचा पार्श्वभूमी, कारणे व परिणाम या मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा.

’    गांधीयुगातील असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ. चळवळी अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासाव्यात.

’    क्रांतिकारी चळवळींचा अभ्यास उदयाची पार्श्वभूमी, स्वरूप, कार्ये, ठळक विचार, घडामोडी, महत्त्वाचे नेते व त्यांचे योगदान, भारताबाहेरील कार्ये आणि त्याचे स्वरूप, महिलांचा सहभाग, वृत्तपत्रे, साहित्य, खटले या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

’    वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, असल्यास ब्रीदवाक्य, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रीत माध्यमांचा अभ्यास करावा.

’    समाजसुधारकांचा अभ्यास करताना त्यांची ठळक वैयक्तिक माहिती – पूर्ण नाव, महत्त्वाचे नातेवाईक, जन्म ठिकाण, कार्यक्षेत्र, शिक्षण, नोकरी, सहकारी, स्थापन केलेल्या संस्था, असल्यास वृत्तपत्र /नियतकालिक, साहित्य, महत्त्वाचे उद्गार, महत्त्वाच्या घटना, कार्ये (कालानुक्रमे), असल्यास लोकापवाद आणि इतर माहिती हे मुद्दे पहावेत.

स्वातंत्र्योत्तर इतिहास 

’    संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका, विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरच्या बाबतीत सर्वागीण अभ्यास करावा.

’    भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत बारकाईने अभ्यासाव्यात.

’    आणीबाणी काळातील महत्त्वाच्या घडमोडी, नेते, त्यांचे कार्य, विचार यांचा आढावा घ्यायला हवा. यामध्ये राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रादेशिक राजकीय चळवळी उदा. जयप्रकाश नारायण यांचे विद्यार्थी आंदोलन, आनंदपूर साहिब प्रस्ताव, भाषावार प्रांत रचनेबाबतचे संघर्ष अशा मुद्दय़ांचा अभ्यास आवश्यक आहे.

’    मराठवाडा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाषावार प्रांत रचनेची मागणी, मराठी साहित्य संमेलने, संयुक्त महाराष्ट्र सभा, महाराष्ट्र एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांची स्थापना, नेते, मागण्या, उपक्रम, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रयत्नशील वृत्तपत्रे, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांची माहिती असावी. नागपूर करार, स्वतंत्र विदर्भाची मागणीबाबतच्या घडामोडी यांचाही आढावा घ्यावा.