scorecardresearch

एमपीएससी मंत्र : पूर्वपरीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या वेगवेगळय़ा विभागांमधील राजपत्रित आणि अराजपत्रित संवर्गातील पदांसाठी भरती करण्यात येते.

एमपीएससी मंत्र : पूर्वपरीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम
संग्रहित छायाचित्र

रोहिणी शहा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या वेगवेगळय़ा विभागांमधील राजपत्रित आणि अराजपत्रित संवर्गातील पदांसाठी भरती करण्यात येते. सध्याच्या भरती प्रक्रियेचे नियोजन सुकर होण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हे बदल सन २०२३ करिता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील, असे आयोगाने जाहीर केले आहे. आयोगाकडून आयोजित होणाऱ्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलांनंतर त्याचा फायदा उमेदवारांना कसा होणार आहे, याबाबत या लेखमालेमध्ये यापूर्वीच चर्चा करण्यात आली आहे.

जुन्या प्रारूपानुसार गट ब (अराजपत्रित) संवर्गातील वेगवेगळय़ा पदांसाठी गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येऊन त्या त्या पदांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येत असे. त्याचप्रमाणे गट क संवर्गातील वेगवेगेळय़ा पदांसाठी गट क संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येऊन त्या त्या पदांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येत असे. आता सर्व गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा (Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच या संयुक्त पूर्वपरीक्षेच्या आधारे भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या / वेतनश्रेणी, दर्जा, इत्यादी बाबी लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा’ तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा’ या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

गट ब (अराजपत्रित) संवर्गातील ४ आणि गट क संवर्गातील ६ अशा दोन्ही संवर्गातील एकूण १० पदांसाठी ही पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया १४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली आहे. तर, परीक्षा ३० एप्रिल रोजी प्रस्तावित आहे. भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे त्या त्या संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येईल. आणि त्या आधारे प्रत्येक   संवर्गाकरिता पूर्वपरीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेकरिता उमेदवारांकडून अर्ज घेताना त्या त्या संवर्गाकरिता आवश्यक अर्हतेच्या आधारे संवर्गाचा विकल्प घेण्यात येणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या पदावर आपली काम करण्याची इच्छा आहे ते ठरवून असे विकल्प काळजीपूर्वक देणे आवश्यक आहे.

अराजपत्रित सेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम

    चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

    नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

    इतिहास आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा

    भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

    अर्थव्यवस्था

अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या,   दारिदय़्र    व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी

ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी

    सामान्य विज्ञान

भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजिन).

    बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

अ) बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर आणि अचूक विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न

ब) अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णाक व टक्केवारी

पूर्वपरीक्षेची काठिण्य पातळी गट ब अराजपत्रित सेवांसाठी पदवी स्तराची तर गट क साठी बारावी स्तराची होती. नव्या पॅटर्नप्रमाणे पूर्वपरीक्षेची काठीण्य पातळी पदवी स्तराची असल्याचे आयोगाकडून घोषित करण्यात आले आहे.

मुख्य परीक्षेकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) घेऊन त्या आधारे संबंधित संवर्गासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरिता शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल.

वेगवेगळय़ा परीक्षांसाठी आवश्यक वेगवेगळय़ा गुणवत्ता राखण्यासाठी उमेदवारांना सतत करावे लागणारे प्रयत्न विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे. त्यामुळे गट क सेवांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी काठिण्य पातळीमध्ये वाढ झाल्याचा विचार न करता गट बची पदे ही त्याच परीक्षेतून उपलब्ध होत असल्याचे लक्षात घेऊन तयारी करायला हवी.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 00:02 IST