राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक मधील भारतीय संस्कृती आणि परंपरा या घटकाच्या तयारी बाबत आपण मागील लेखांमध्ये पाहिले. या लेखामध्ये केंद्रीय नागरी सेवा परीक्षेमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची आदर्श उत्तरे पाहू.
प्रश्न भारताच्या इतिहासाच्या पुनर्बांधणीत चिनी आणि अरब प्रवाशांच्या प्रवासवर्णनांच्या महत्त्वाचे मूल्यांकन करा. (१५० शब्दांत १० गुण)
उत्तर. परदेशी प्रवाशांची प्रवासवर्णने तत्कालीन भारतीय समाजाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकतात.
फाहियान हा भारताला भेट देणारा हा पहिला चिनी प्रवासी होता. चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या काळातील भारताच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंग्डम या त्याच्या पुस्तकामध्ये आढळते. ह्युएन त्सांगने ‘रेकाॅर्ड्स ऑफ वेस्टर्न वर्ल्ड’ या पुस्तकात हर्षाच्या काळातील आणि त्यानंतरच्या भारताच्या सामाजिक आणि धार्मिक स्थितीबद्दल लिहिले आहे. इत्सिंग आणि यिजिंग यांचे वर्णन सातव्या शतकात भारत आणि चीनमधील राजनैतिक संबहधांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकते.
तसेच, भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासाच्या आकलनासाठी चिनी प्रवासवर्णने महत्त्वाची आहेत.
अल-मसुदी, सुलेमान, अल-बिदुरी आणि हक्कल हे नवव्या आणि दहाव्या शतकात भारताला भेट देणारे सुरुवातीचे अरब प्रवासी आणि भूगोलशास्त्रज्ञ होते. नंतरच्या अरब प्रवाशांमध्ये अल-बिरुनी, अल-इद्रीसी, मुहम्मद उफी आणि इब्न बतुता यांचा समावेश होतो. अल-बिरुनीचे तबकत-ए-नासिरी आणि इब्न बतुता यांचे रिहला हे मध्ययुगीन इतिहास समजून घेण्यासाठीचे महत्त्वाचे स्रोत आहेत,
अरब प्रवस वर्णने आणि वृत्तांत तत्कालीन भारतीय जीवनाच्या बहुतांश पैलूंवर विशेषतः सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक आयामांवर प्रकाश टाकतात. याव्यतिरिक्त, अरब वृत्तांतांनी भारत आणि अरब यांच्यातील व्यापारी संबंधांचा विस्तृतपणे उहापोह केला आहे.
या प्रवास वृत्तांतांनी इतिहासकारांना इतिहासाच्या इतर समकालीन स्रोतांशी जोडून भारताचा भूतकाळ अभ्यासण्यास मदत केली.
(मुद्दे – प्रवासी, त्यांचा कालखंड, प्रवास वर्ननाचा विषय, शक्य तिथे पुस्तकांचा उल्लेख आणि प्रवास वर्णातून इतिहासाच्या अभ्यासामध्ये होणारे सहाय्य. शब्द १७४. मर्यादेपेक्षा १० टक्के शब्द जास्त चालतील. इथे किमान १५ ते २० शब्द कमी असणे आवश्यक.)
प्रश्न: श्री. चैतन्य महाप्रभूंच्या आगमनाने भक्ती चळवळीला एक उल्लेखनीय पुनर्दिशा मिळाली. चर्चा करा. (२५० शब्दांत उत्तर, १५ गुण)
उत्तर. भक्ती चळवळ ही मध्ययुगीन काळात उदयास आलेली धार्मिक चळवळ होती. देवाच्या भक्तीमध्ये मोक्षाचे साधन म्हणून ही चळवळ उदयास आली. जाती बंधनांचे कठोर भेद मोडणे हे भक्ती चळवळीचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणता येईल.
चैतन्य महाप्रभू हे भक्ती चळवळीतील महान संतांपैकी एक होते. त्यांनी त्यांच्या कीर्तनांद्वारे बंगालमध्ये वैष्णव धर्माचा प्रसार केला. त्यांची कीर्तने म्हणजे काव्य, संगीत आणि सौंदर्याचा सुंदर मिलाफ होता. चैतन्य यांनी रासलीलेचे केलेले विस्तृत आणि तपशीलवार स्पष्टीकरण हे भारतीय तत्त्वज्ञानातील त्यांच्या सखोल योगदानांपैकी एक आहे.
भक्ती चळवळीच्या युगात श्री. चैतन्य यांना आध्यात्मिक प्रकाशाचे सर्वोच्च रूप मानले गेले. त्यांनी कीर्तनांच्या स्वरूपात भगवान श्रीकृष्णाचे गुणगान करून देवावर प्रेम करायला शिकवले. गाणे मनाला भौतिक जगातून दैवी जगात घेऊन जाते म्हणून केवळ गाण्यानेच देवाची प्राप्ती होऊ शकते, हा विश्वास त्यांनी जनमानसामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक मुक्तीच्या विचारसरणीचे समर्थक म्हणून, श्री. चैतन्य यांनी जातिव्यवस्थेचा, पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाला आणि अनावश्यक विधी आणि समारंभांना त्यांनी विरोध केला. त्यांच्या मते, ब्राह्मणीय उपासनेच्या पद्धती समाजास केवळ हिंसाचाराकडे नेत होत्या. म्हणून त्यांनी अशा उपासनेच्या पद्धतींऐवजी, केवळ प्रेम आणि भक्तीने जप करण्याचा सल्ला भक्तांना दिला. ‘हरे कृष्ण हरे राम’ मंत्र जप आणि ‘अचिंत्य भेद अभेद’ तत्वज्ञान ही त्यांची तत्कालीन समाजाच्या एकीकरण आणि मुक्ती साठीची आयुधे ठरली. त्यांनी ब्राह्मण, शूद्र, चंडेला आणि मुस्लिमांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्यांच्यामध्ये बंधुत्वाचे बंधन निर्माण केले. यातून त्यांनी मानवाच्या वैश्विक बंधुत्वाचे समर्थन केले. ‘यवन’ हरिदास हे त्यांचे सर्वात मोठे भक्त होते.
भक्ती चळवळीतील इतर संतांप्रमाणे, त्यांचा मूर्तिपूजा आणि तीर्थयात्रेवर विश्वास होता.तुलनेने सोप्या धार्मिक तत्त्वांमुळे त्यांना कबीर आणि नानक यांच्यापेक्षा जास्त अनुयायी लाभले.
निःसंशयपणे, श्री. चैतन्य यांच्या योगदानामुळे भक्ती चळवळीला पुनर्दिशा मिळाली.
(मुद्दे – चैतन्य यांची धार्मिक आस्था, शिकवण, रुजवलेले नवे तत्वज्ञान, भक्तीचा मार्ग, सामाजिक सुधारणेमधील योगदान, अन्य संतांपासून वेगळेपण देणारी वैशिष्ट्ये, शब्द २४६. योग्य शब्दमर्यादा)
