राज्य सेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमध्ये भक्ती चळवळीचा स्वतंत्र मुद्याच्या स्वरुपात समावेश केलेला आहे. हा मुद्दा अभ्यासक्रमामध्ये ” महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि तिचे तत्वज्ञान” असा नमूद करण्यात आला आहे. या घटकाचा स्वतंत्र उल्लेख केलेला आहे म्हणजे दरवर्षी किमान १० गुणांसाठी या घटकावर प्रश्न नक्की विचारला जाणार हे गृहीत धरायला हवे. तुलनेने कमी तयारीमध्ये चांगल्या गुणांची तजवीज या घटकामुळे होऊ शकते हे लक्षात घ्यायला हवे. तयारी कशी करावी ते पाहू.

भक्ती चळवळीचा उदय आणि पार्श्वभूमी

भक्ती चळवळीचा विकास सातव्या ते बाराव्या शतकात झालेला दिसून येतो. या काळातील सामाजिक, राजकीय, धार्मिक बाबी भक्ती चळवळीच्या उगमास कारणीभूत ठरल्या. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधील तत्कालीन सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भक्ती संप्रदायांचा उगम आणि विकास कसा झाला याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

भक्ती चळवळीचे स्वरुप आणि ठळक वैशिष्ट्ये

भारतातील सर्व भक्ती संप्रदायांमध्ये समान धागा असलेली काही वैशिष्ट्ये म्हणजे सामाजिक भेदभावांवा विरोध आणि समानतेचा पुरस्कार, शिव आणि विष्णू या दैवतांच्या भक्तीवर भर, कर्मकांडांना विरोध, स्थानिक भाषेतून शिकवण, भक्तीसाठी काव्याच्या आधार. या वैशिष्ट्यांच्या आधारे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये उदयास आलेल्या भक्ती चळवळींची वैशिष्ट्ये अभ्यासायला हवीत.

भक्ती संप्रदायांचा अभ्यास

उत्तर भारत आणि दक्षिण भारतामधील भक्ती संप्रदायांच्या उदयाची पार्श्वभूमी समजून घेऊन तुलनात्मक मुद्दे समजून घ्यावेत. देव, मोक्ष, भक्ती, मूर्तिपूजा, सामाजिक चालीरिती यांबाबत वेगवेगळ्या भक्ती संप्रदायांची विचारधारा आणि त्यांतील साम्यभेद समजून घेणे आवश्यक आहे.

या व्यतिरीक्त प्रत्येक भक्ती चळवळीचे/ संप्रदायाचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य उदाहरणार्थ एकनाथांची भारुडे, चैतन्य महाप्रभूंचे नामजप, कबीराचे दोहे, सगुण निर्गुण तत्वज्ञान समजून घ्यायला हवे.

सर्व भक्ती संप्रदायांचे ग्रंथ, अन्य साहित्य यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये महत्त्वाच्या संतांचे ग्रंथ, त्यांचा विषय, त्याची वैशिष्ट्ये आणि मूल्यमापन हे मुद्दे विचारात घ्यावेत.

भक्ती चळवलीतील महत्वाचे संत

दक्षिण भारतातील तसेच उत्तर भारतातील भक्ती चळवळीमधील संतांचे साम्य भेद लक्षात घ्यावेत. महत्वाच्या संतांचा कालखंड, समकालीन राजवट व तिचा समाजावरील प्रभाव, संतांची महत्वाची मते, विचार, त्यांचे ग्रंथ/ साहित्य, त्यांच्या भक्ती मार्गाचे ठळक वैशिष्ट्य यांचा टेबलमध्ये नोट्स काढाव्यात. पण उत्तरे लिहीताना यातील मुद्यांचा प्रश्नाचा रोख समजून घेऊन वापर करायचे कौशल्य आवश्यक आहे.

भक्ती चळवळींचा समाजावरील परीणामः

भक्ती चळवळी या तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून आणि तत्कालीन समस्यांवर आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक उपाय देण्यासाठी उद्याला आल्या. त्यामुळे मध्ययुगीन इतिहासाचा भाग म्हणून या चळवळी / संप्रदाय यांचे महत्व समजून घेण्यासाठी त्यांचा तत्कालीन समाजावरील परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. भक्तीचे सोपे मार्ग आणि साधने, भेदभाव निर्मूलन या ठळक बाबींबरोबर इतर सामाजिक सुधारणांमध्ये त्यंचे योगदान समजून घ्यायला हवे.

महाराष्ट्रातील भक्ती संप्रदाय आणि संत साहित्य

मध्ययुगीन कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला आकार देण्यात भक्ती संप्रदायांची महत्त्वाची भूमिका आहे. या कालखंडातील भक्ती संप्रदायाच्या अभ्यासासाठी तत्कालीन राजवटी, त्यांची धोरणे सामाजिक चालीरिती समजून घ्याव्यात.

संत ज्ञानेश्वर, त्यांची भावंडे, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास यांच्या कार्याचा अभ्यास पुढील मुद्यांच्या अनुषंगाने करायला हवा – त्यांचा कालखंड, तत्कालीन सामाजिक व धार्मिक चालीरिती, त्यांचे महत्त्वाचे विचार, स्थापन केलेला संप्रदाय, संप्रदायाच भक्तीमार्ग, त्यांना झालेले विरोध, महत्वाचे अनुयायी, त्यांचा सध्याच्या समाजावर असलेला प्रभाव, त्यांच्या कार्यामुळे तत्कालीन समाजामध्ये झालेल्या सुधारणा/ बदल, महत्वाची प्रसिद्ध उद्धरणे इ.

संत साहित्य

संत साहित्याचा अभ्यास करताना वेगवेगळे ग्रंथ, त्यांचे लेखक, त्यांचा विषय, भाषा सौंदर्य, त्यातील प्रमुख विचार, लेखनाची वैशिष्ट्ये व असल्यास इतर ठळक वैशिष्ट्ये या मुद्यांच्या आधारे करायला हवा. महानुभाव पंथाचे साहित्य अभ्यासतानाही याच मुद्यंच्या अनुशंगाने विचार करायला हवा.

वारकरी, धारकरी पंथ, महनुभाव पंथ यांच्या शिकवणींचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. तुलनेसाठी उपासना पद्धती, देवाशी माणसाच्या नात्याचा विचार, सामाजिक प्रथांबाबतचा विचार, समाजावरील परिणाम या बाबींचा विचार करायला हवा.