१)माझी मुलगी आता इयत्ता ७ वी ला आहे. तिला अवांतर वाचनाची खूप आवड आहे. एमपीएससी करायचे तिने आत्तापासूनच ठरवले आहे. तर नक्की कधीपासून तिने त्यादृष्टीने तयारी करायची? कृपया याबाबत मार्गदर्शन मिळावे.. – ज्ञानेश्वर महाजन, जळगाव.

— अकरावी पासून तयारी सुरू केली तर तोपर्यंत तिला स्वतःला काही ठरवण्याइतपत अंदाज आलेला असेल. मात्र तिने आत्तापासून पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचन विशेषतः चालू घडामोडी, इतिहास, भूगोल , शास्त्र या विषयांचे वाचन सुरू ठेवावे. तहसीलदारांपासून तलाठ्यापर्यंत आणि पोलीस सब-इन्स्पेक्टर पासून हवालदारापर्यंत कोणाकोणाला काय काय कामे करावी लागतात याचे थोडेसे ज्ञान तिला पुढील तीन वर्षांत मिळवायला मदत करा.

२) मी विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षाला आहे. येणाऱ्या एमपीएससी पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.-आशिष वंजारी, सिरुड, वर्धा</p>

— एमपीएससी पूर्वपरीक्षेला दोन पेपर्स आहेत. पहिला जनरल स्टडीज ज्यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल , राज्यशास्त्र, पर्यावरण, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो तर दुसऱ्या सीसॅटच्या परीक्षेसाठी मराठी व इंग्रजी काम्प्रिहेन्शन , रिझनिंग ऍबिलिटी, मेंटल ॲबिलिटी यासारखे विषय आहेत. त्यामुळे तुम्हाला आत्तापासून या दोन्ही पेपरची समान तयारी सुरू करणे आवश्यक आहे. सध्या पदवीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत रोज किमान दोन तासांचा वेळ या दोन्ही पेपरच्या अभ्यासासाठी द्यावा लागेल आणि पदवी परीक्षा संपल्यानंतर लगेचच रोज किमान ६ तास या प्रत्येक पेपरच्या अभ्यासासाठी द्यावा लागेल ज्यामध्ये वाचन, नोट्स काढणे याच्या बरोबरीने पेपर सोडवण्याचा सराव करावा लागेल.