– डॉ. मिलिंद आपटे
मी २०१९ ला अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर मी ३ वर्षे आयटीमधे नोकरी केली, आणि याच वर्षी माझं लग्न झालं. लग्नाआधी मी माझा नोकरी सोडली. पण आता घरी बसून मला एमपीएससीची तयारी करण्याची इच्छा आहे आणि मी अभ्यास देखील सुरू केला आहे. घर काम संभाळून वेळेचे व्यवस्थापन करणे अवघड आहे. मला अभ्यास रोज किती केला पाहिजे आणि अभ्यास नेमका कसा करावा?
– अमृता
घर काम संभाळून वेळेचे व्यवस्थापन करणे थोडे अवघड जात आहे असे तुम्ही म्हणताय, मी समजू शकतो पण जे साध्य करायचे आहे ते सुद्धा सोपे नाही. त्यामुळे जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करावा लागेल. सोशल मीडिया व मोबाइलपासून दूर व्हावे लागेल हा पहिला नियम. ज्यावेळी अभ्यासातून वारंवार उठावे लागणार आहे त्यावेळी तुमचा आवडता विषय घ्यावा ज्यामुळे आपण विचलित होत नाही व चिडचिड होत नाही.
लवकर उठून जे विषय तुम्हाला नवीन आणि अवघड जातात ते सांभाळावे, रात्री सराव जास्त करावा, विषय बदलत जावे. इंजिनीअर असल्याने गणित सहज हाताळत असाल तो रात्री हाताळावा, घरात आपण जी नवीन माहिती घेतली आहे ती चर्चेला असावी त्यामुळे वातावरणनिर्मिती होते. बाकी बरीच माहिती मी मागील काही उत्तरांमध्ये दिली आहे त्याचा उपयोग होईल. खूप शुभेच्छा.
सर माझा मुलगा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर या ठिकाणी बॅचलर इन सोशल सायन्स (बीए) या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा आहे, परंतु तिसऱ्या वर्षी डिग्री मिळते, चौथ्या वर्षी ऑनर्सची डिग्री मिळते. फक्त या पदवीमुळे भविष्यात काही प्लेसमेंट होऊ शकते काय? अथवा आमचा विचार CUCIT अथवा GET ची एक्झाम देऊन PG in economics करण्याचा आहे. हा निर्णय योग्य आहे का? असेल तर इकॉनॉमिकसाठी सर्वात चांगली प्लेसमेंट असलेले कॉलेज कोणते? कृपया मार्गदर्शन करा
– राजेंद्र बनसोड
– टीआयएसएस मधून बॅचलर इन सोशल सायन्स ही पदवी किंवा ऑनर्स झाल्यावर बहुतेक करून मोठ्या एनजीओमध्ये नोकरी करण्याची संधी मिळते. उच्च शिक्षण सुद्धा घेता येते. पीजी अर्थशास्त्र करणे सुद्धा उत्तम गोखले इन्स्टिट्यूट किंवा दिल्ली, मुंबई विद्यापीठातून घेतले तर चांगले. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे अर्थशास्त्र शिकणारा सांख्यिकी म्हणजे स्टाटिस्टिक मध्ये प्रवीण असणे किंवा तत्सम गणिताची आवड असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला करिअरमध्ये मर्यादित वाढ मिळते. वरील गोखले विद्यापीठातून पीजी केल्यास प्लेसमेंटची शक्यता जास्त, अथवा इंडियन इकॉनॉमिक सर्विसेस (आयईएस)ची परीक्षा, ग्रेड बी ची परीक्षा देऊन उत्तम करियर घडू शकते.
careerloksatta@gmail.com