पशुपालन घटक स्वरूप

दुग्ध व्यवसाय, पक्षी पालन, मांस उत्पादन, रेशीम उत्पादन, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन अशा पूरक क्षेत्रांचा पशुपालनामध्ये समावेश होतो. या प्रत्येक क्षेत्रातील उत्पादनाची प्रक्रिया समजून घ्यायला हवी. पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञाने यांची व्यवस्थित माहिती करून घ्यावी. विश्लेषणात्मक उत्तरांसाठी या पद्धती आणि त्यांचे फायदे तोटे मांडता येणे गरजेचे आहे.

अर्थव्यवस्थेतील योगदान

दुग्ध व्यवसाय, मांस उत्पादन, अंडी उत्पादन, रेशीम उत्पादन या क्षेत्रांमध्ये भारत जागतिक क्रमवारीमध्ये अग्रक्रम यादीत असतो. दरवर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालामधून या क्षेत्रातील जागतिक क्रमवारीतील भारताचा कमांक माहीत करून घ्यायला हवा. मागील वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रांतील उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ किंवा घट झाली असल्यास तो प्रश्नाचा विषय असू शकतो. त्यामुळे याबाबतची कारणे, परिणाम, उपाय असे मुद्दे नीट तयार करायला हवेत.

या क्षेत्रांचा भारताच्या आणि महाराष्ट्राच्या जीडीपी, जीव्हीपी आणि निर्यातीमधील वाटा माहीत असायला हवा. तसेच महाराष्ट्राचे या क्षेत्रातील राज्यांच्या क्रमवारीतील स्थान यांची माहिती हवी. या आकडेवारीचा उत्तरामध्ये समर्पक वापर करता यायला हवा.

सामाजिक, आर्थिक महत्त्व

पशुपालन हे क्षेत्र वैज्ञानिक असले तरी हा व्यवसाय ग्रामीण क्षेत्रात बहुतांश वेळा अकुशल व्यक्तींकडून केला जातो. ही बाब लक्षात घेतली तर या क्षेत्रास आर्थिकच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्व असल्याचे कळते. उत्तरांमध्ये सामाजिक महत्त्वाचा संदर्भ समर्पकपणे करता येणे परिणामकारक ठरते.
या क्षेत्राचा ग्रामीण कुटुंबांच्या दैनंदीन आर्थिक उत्पन्नातील वाटा, उपजिविकेमधील महत्त्व, आपात्कालीन आधार, आहारातील वाटा समजून घेतला पाहिजे. अकुशल मनुष्यबळाचा रोजगार, वाहतूक, इंधन अशा समांतर बाबींमधील पशुपालन क्षेत्राचे योगदान माहीत असायला हवे. ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणामध्ये या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. विशेषत: दुग्ध उत्पादनामध्ये महिलांचा वाटा हा अभ्यासासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. याबाबतच्या केस स्टडीज, शक्य असेल तर काही आकडेवारी जमवता आली तर उत्तम.

शासकीय योजना

पशुपालन क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येणार्‍या शासकीय उपक्रम, योजनांची यादी तक्त्यामध्ये दिलेली आहे. या योजनांचा पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करावा:

पार्श्वभूमी, उद्दिष्ट, असल्यास लाभार्थी निकष आणि लाभाचे स्वरुप (आर्थिक लाभ किंवा आदाने उदा. बियाणे, बीजके,) तांत्रिक आयाम, असल्यास समस्या, कारणे आणि उपाय व मूल्यमापन याशिवाय या क्षेत्रामधील वेगवेगळ्या उपक्षेत्रांच्या मूलभूत आणि दूरगामी विकास व रुपांतरणाकरिता व्यापक योजना राबविण्यात आल्या आहेत. अशा योजनांचे परिणाम व्यापक आणि मूलभूत असल्याने त्यांना क्रांती म्हणण्यात येते. तक्ता क्र. २ मध्ये या क्रात्यांचे क्षेत्र आणि उद्दिष्टे नमूद केलेली आहेत. त्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे. यासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत:

पार्श्वभूमी, सुरुवात, उद्दिष्टे, भर देण्यात आलेले मुद्दे, शासकीय सहाय्याचे स्वरूप, झालेले असल्यास बदल किंवा सुधारित तरतूदी वा त्यांची पार्श्वभूमी व उद्दिष्टे, आतापर्यंतची वाटचाल आणि ठळक यश, समस्या, त्यांची कारणे आणि व त्यांवरील उपाय.

पर्यावरणीय मुद्दे

पधुपालन क्षेत्राचा कार्बन उत्सर्जनातील विशेषत: हरित गृह वायूंच्या उत्सर्जनातील वाटा हा लक्षणीय आहे. याबाबतची आकडेवारी माहीत असायला हवी. या क्षेत्राच्या पर्यावरणीय आघातांची तीव्रता कमी करण्यासाठीचे उपाय हा विश्लेषणात्मक मुद्दा आहे. याची तयारी मुलाखत आणि पेपर चारसाठीही मदतगार ठरणार आहे.

समस्या, उपाययोजना

कमी उत्पादकता, पशुंचे आरोग्य, सकस खाद्याची उपलब्धता, प्रजनन तंत्रज्ञान आणि कर्जाची व विम्याची उपलब्धता, असंघटीत क्षेत्राचे तोटे या आर्थिक बाबी अशा समस्यांचा स्वरुप, कारणे आणि उपाययोजना या मुद्यांच्या आधारे अभ्यास आवश्यक आहे.

अर्थशास्त्राचे वेगवेगळ्या पद्धतीने आकलन

ग्रामीण कुटुंबांमध्ये शेती उत्पन्नास पूरक उत्पन्नासाठी पशुपालन करण्याकडे कल असतो. पशुपालन हे कृषीपूरक क्षेत्र समजले जात असले तरी लक्षणीय प्रमाणात अकृषिक कुटुंबांच्या उपजिविकेचे साधनही आहे. केवळ पशुपालन किंवा मत्स्यव्यवसाय हा भूमिहीन किंवा अल्पभूधारक कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. या बाबींचा विचार करून या क्षेत्राचे अर्थशास्त्र वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेतले पाहिजे.

पशुपालनास उत्तेजन देण्यासाठी शासकीय योजना

– राष्ट्रीय गोकुळ मिशन
– पशुधन अभियान
– दुग्धविकास
– पशुहाट पोर्टल
– पशुधन आरोग्य आणि रोगप्रतिबंध कार्यक्रम
– पशुपालन पायाभूत सुविधा विकास निधी
– राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम
– मत्स्यपालन आणि जलशेती पायाभूत सुविधा विकास निधी
– प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

पशुपालन क्षेत्रातील क्रांती

– धवल क्रांती – दुग्ध उत्पादनामध्ये वाढ
– धवल क्रांती २.० – दुग्ध उत्पादनामध्ये वाढ अणि सहकारी दूध उत्पाद संस्थांना प्रोत्साहन
– गुलाबी क्रांती -मांस उत्पादन क्षेत्राची यांत्रिकीकरण आणि आधिउनिकीकरणाद्वारे निर्यातवाढ
– नील क्रांती – तांत्रकि, आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनामध्ये वाढ
– रजत क्रांती – अंडी आणि कुक्कुट मांस उत्पादन वाढ आणि पोषण आहारामध्ये वृद्धी

steelframe.india@gmail.com