राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर तीनमधील विज्ञान तंत्रज्ञन या घटकाच्या तयारीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. या क्षेत्रातील चालू घडामोडी आणि त्यांचा दैनंदीन जीवनावरील परीणाम हा या घटकाचा केंद्रबिंदू आहे हे आपण मागील लेखाम्ध्ये पाहिले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमामम्ध्ये दिलेल्या मुद्यांबाबतच्या चालू घडमोडी माहित करुन घेऊन त्यांची तयारी करणे आवश्यक आहे. या लेखामध्ये या घटकावर नागरी सेवा मुख्य परिक्षा 2024 मधील सामान्य अध्ययन पेपर तीनमधल्या प्रश्नाचे उत्तर लेखन कशा प्रकारे करता येईल ते पाहू.

प्रश्न: भारताला सेमीकंडक्टर उत्पादनाचे केंद्र बनवायचे आहे. भारतातील सेमीकंडक्टर उद्योगासमोरील आव्हाने कोणती आहेत? ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ची प्रमुख वैशिष्ट्ये नमूद करा.

उत्तर क्र. 1

आकृतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रस्तावना किंवा समारोपाशिवाय मुद्देसूद उत्तर लिहीता येईल.

उत्तर क्र. 2

भारताला जागतिक सेमीकंडक्टर केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, परंतु या प्रवासात काही प्रमुख आव्हाने आहेत.

सेमीकंडक्टर उद्योगासमोरील आव्हाने:

प्रचंड भांडवली गुंतवणुकीची आवश्यकताः चिप उत्पादनासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि दीर्घ कालावधी लागतो.

पायाभूत सुविधा: अखंडित, अति-शुद्ध पाणी आणि स्थिर वीजपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांचा तुटवडा हे मोठे आव्हान आहे.

पुरवठा साखळीचा अभाव: कच्चा माल, विशेष वायू आणि प्रगत उपकरणांसाठी भारत अजूनही आयातीवर अवलंबून असून, स्थानिक परिसंस्थेचा अभाव आहे.

कुशल मनुष्यबळाची कमतरता: भारताकडे चिप ‘डिझायनिंग’मध्ये उत्कृष्ट कौशल्य असले, तरी प्रत्यक्ष ‘उत्पादन’ क्षेत्रातील अनुभवी मनुष्यबळाची कमतरता आहे.

इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) ची प्रमुख वैशिष्ट्ये:

भारतात सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करण्यासाठी सरकारने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केले आहे. त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

आर्थिक मदत: सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्स (Fabs) उभारण्यासाठी प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ५०% इतकी आर्थिक मदत दिली जाते.

डिझाईन-लिंक्ड इन्सेंन्टिव्ह (DLI) योजना: देशांतर्गत चिप डिझायनिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि पायाभूत सुविधा पुरवल्या जातात.

सर्वसमावेशक विकास: सिलिकॉन फोटोनिक्स, कंपाऊंड सेमीकंडक्टर आणि सेमीकंडक्टर पॅकेजिंग (ATMP) सुविधांच्या स्थापनेला याद्वारे पाठबळ दिले जाते.

नोडल एजन्सी: भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील दीर्घकालीन धोरणांचे आणि जागतिक करारांचे संचलन करण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन ही एक स्वतंत्र व्यावसायिक संस्था म्हणून काम करते.

उत्तर क्र. 3

डिजिटल अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, 5G, इलेक्ट्रिक वाहने आणि संरक्षण क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे सेमीकंडक्टर हे आधुनिक अर्थव्यवस्थेचे “नवे तेल” मानले जाते. जागतिक पुरवठा साखळीतील बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताने स्वयंपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्था उभारण्याचा संकल्प केला आहे.

भारतातील सेमीकंडक्टर उद्योगासमोरील आव्हाने

1. उच्च भांडवली गुंतवणूक : फॅब युनिट उभारण्यासाठी अब्जावधी डॉलरची आवश्यकता असते.

2. तांत्रिक कौशल्यांचा अभाव : अत्याधुनिक चिप डिझाईन व उत्पादनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मर्यादित आहे.

3. पायाभूत सुविधांची कमतरता : अखंड वीज पुरवठा, शुद्ध पाणी आणि उच्च दर्जाची वाहतूक सुविधा आवश्यक असते.

4. पुरवठा साखळीवरील परावलंबित्व : कच्चा माल, यंत्रसामग्री आणि आवश्यक तंत्रज्ञान यांसाठी परदेशांवर अवलंबित्व आहे.

5. संशोधन व विकासातील कमी गुंतवणूक : देशांतर्गत संशोधन आणि विकासावर कमी क्षमता तुलनेने कमी आहे.

6. जागतिक स्पर्धा : तैवान, दक्षिण कोरीआ, आणि चीन यांसारख्या देशांची या क्षेत्रावर मजबूत पकड आहे.

इंडिया सेमीकंडक्टर मिशनची प्रमुख वैशिष्ट्ये

भारत सरकारने २०२१ मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केले.

1. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादनासाठी ₹76,000 कोटींचे प्रोत्साहन पॅकेज.

2. फॅब, ATMP/OSAT आणि डिस्प्ले उत्पादन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य.

3. देशांतर्गत चिप डिझाईनला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन-लिंक्ड इन्सेंन्टिव्ह (DLI)” योजना.

4. दरवर्षी सेमीकान परीषदा भरवून जागतिक कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे.

5. “मेक इन इंडीया” आणि “आत्मनिर्भर भारत” उपक्रमांना बळकटी.

6. संशोधन, नवोन्मेष आणि कौशल्य विकासावर भर.

7. नोडल एजन्सी प्रारुपावर कामकाज. धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावनीसाठी सेमीकाण इंडीया जबाबदार.

अशा प्रकारे, योग्य धोरणात्मक सहाय्य, कौशल्यविकास आणि पायाभूत सुविधा उभारणीद्वारे भारत जागतिक सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो.

स्पष्टीकरणः

उर्रत क्र. 1 मध्ये कमी शब्दांत सर्व मुद्दे कव्हर झाले आहेत. उत्तर क्र. 2 आणि 3 च्या तुलनेत या उत्तरामध्ये बारीक्साड़ीक मुद्याम्नाही जागा मिळाली आहे. मात्र या उत्तरामध्ये इंग्रजी शब्दांचा वापर जास्त प्रमाणात झाला आहे. मराठी माध्यमातून उत्तर लिहीताना असे द्वीभाषी स्वरुप कटक्षाने टाळायला हवे.

उत्तर क्र. 2 हे 150 शब्दमर्यादेच्या उत्तरासाठी योग्य प्रारुप आहे तर 250 शब्दामर्यादेचे उत्तर लिहीताना उत्तर क्र. 3 चांगला पर्याय ठरतो. उत्तर क्र, 2 मध्ये शब्दमर्यदा कमी आहे म्हणून महत्वाचे मुद्दे गाळलेले दिसतत. यापेक्षा मुद्दे एकत्र करुन कमी शब्दात सर्व महत्वाच्या बाबी कव्हर कशा होतील ते पाहण आवश्यक आहे.