राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या विज्ञान व तंत्रज्ञान घटकाच्या अभ्यासक्रमातील अवकाश, संरक्षण, आणि जैव तंत्रज्ञान या उपघटकांच्या तयारीबाबत आपण आतापर्यंत पाहिले. या क्षेत्रांमधील घडामोडींबाबत सजग राहून त्याबाबत उमेदवारांनी स्वत:चे मत विकसित करणे आयोगाला अपेक्षित आहे. या लेखामध्ये यंत्रमानव तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान या उपघटकांची तयारी कशी करावी ते पाहू.

यंत्रमानव तंत्रज्ञान 

यंत्रमानव तंत्रज्ञानाची संकल्पना व प्रकार या मूलभूत बाबी अभ्यासल्यावर त्यांच्या उप्योजनाबाबत व्यवहार्यपणे विचार आणि विश्लेषण शक्य होणार आहे. यंत्रमानव ही संकल्पना चित्रपटातील चित्रणापेक्षा विस्तृत आहे हे समजून घ्यावे लागेल. यंत्रमानवाचा वेगवेगळ्या क्षेत्रातील वापर आणि त्याचे मूल्यमापन ही तयारीची मूलभूत दिशा असली पाहिजे. यंत्रमानव तंत्रज्ञानाचा अभ्यास ‘उद्योग, कृषी, आरोग्य आणि संरक्षण’ या क्षेत्रांतील उपयोगांवर भर देऊन करायला हवा. तयारी करताना विचारात घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे तक्त्यात दिले आहेत.

यंत्रमानवांमुळे उत्पादनक्षमता, अचूकता आणि गुणवत्तेत वाढ तसेच उत्पादन खर्चात कपात होते या अनुषंगाने त्यांच्या वापराचे फायदे तोटे, आव्हाने आणि उपाययोजना अशा मद्द्यांच्या आधारे सर्वसाधारण मूल्यमापन तयार हवे. एखाद्या क्षेत्रातील यंत्रमानवाचा वापर अथवा स्वयंचलनाबाबत काही लक्षणीय चालू घडामोड असेल अशा वेळी त्याचा बारकाईने व तपशीलवार अभ्यास आवश्यक आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि यंत्रमानव

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणामुळे स्वयंचलित निर्णयप्रक्रिया, संगणकीय दृष्टी आणि स्मार्ट यंत्रणांचा विकास शक्य झाला आहे. अशा प्रकारच्या यंत्रणांबाबत तांत्रिक मुद्द्यांऐवजी त्यांचे आर्थिक, सामाजिक परिणाम समजून घ्यावेत.

नैतिक आणि सामाजिक प्रश्न

अमानवीय आणि हलकी समजळी जाणारी पण आवश्यक कामे करण्यासाठी यंत्रमानवांचा वापर वाढत आहे. त्याचे सामाजिक फायदे समजून घेणे आवश्यक आहे. यंत्रमानव तंत्रज्ञानामुळे रोजगारावर परिणाम, गोपनीयतेचे प्रश्न, उत्तरदायित्व आणि कायदेशीर चौकटीची आवश्यकता यांसारखी नैतिक व सामाजिक आव्हानेसुद्धा निर्माण होत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा मानवकेंद्रित दृष्टिकोनातून वापर करण्याची आवश्यकता या मुद्यावर विशेष चिंतन आवश्यक आहे. हा मुद्दा सामान्य अध्ययन पेपर चारसाठीही महत्वाचा आहे.

नॅनो तंत्रज्ञानाची संकल्पना

नॅनोतंत्रज्ञानामध्ये अतिसूक्ष्म स्तरावरील पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांचा विविध क्षेत्रांत उपयोग केला जातो. हे तंत्रज्ञान आधुनिक विज्ञानातील सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या क्षेत्रांपैकी एक आहे. या तंत्रज्ञानातील संशोधन आणि त्याचा दैनंदीन जीवनातील वापर या मुद्यावर भर देऊन तयारी आवश्यक आहे. 

नॅनो तंत्रज्ञानाचे उपयोजन

आरोग्य, कृषी, पर्यावरण, ऊर्जा,  इलेक्ट्रॉनिक्स व उद्योग, संरक्षण या क्षेत्रातील नॅनो तंत्रज्ञानाचे उपयोग समजून घेऊन त्यांच्या वापराने होणारे फायदे-तोटे, उदाहरणे, समस्या, त्यावरील उपाययोजना आणि एकंदरीत मूल्यमापन समजून घेणे आवश्यक आहे. या क्षेत्रांतील नॅनो तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आमूलाग्र बदल घडविणारे संशोधन किंवा तंत्रज्ञानाचे व्यापारी तत्वावर उपयोजन हे चालू घडामोडींमध्ये शोधण्याचे मुद्दे आहेत. नॅनो तंत्रज्ञानाशी संबंधित आव्हाने नॅनोकणांच्या सुरक्षिततेविषयी अपुरी माहिती, मानवी आरोग्यावर संभाव्य परिणाम, पर्यावरणीय जोखीम, उच्च संशोधन खर्च, तंत्रज्ञान हस्तांतरणातील अडचणी, कुशल मनुष्यबळाची कमतरता आणि नियामक चौकटीचा अभाव ही क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. प्रत्येक प्रकारच्या समस्येचे स्वरूप, कारणे, परिणाम आणि उपाय या मद्द्यांच्या अनुषंगाने विश्लेषण करुन स्वत:चे मत विकसित करायला हवे. 

दोन्ही क्षेत्रांमधील भारतातील सद्य:स्थिती

भारतामध्ये संशोधन संस्था, विद्यापीठे आणि उद्योगांच्या माध्यमातून या दोन्ही क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. या क्षेत्रात भारतामध्ये होत असलेले संशोधन, त्यातील ठळक टप्पे, वापर, असल्यास प्रोत्साहनात्मक योजना, महत्त्वाच्या क्षेत्रातील वापर, दैनंदीन जीवनातील वापराची उदाहरणे, समस्या, उपाययोजना, चालू घडामोडी हे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

यंत्रमानव तंत्रज्ञान अभ्यासाचे मुद्दे

५ औद्योगिक यंत्रमानव आणि उत्पादन क्षेत्र.

५ वैद्यकीय यंत्रमानव व आरोग्यसेवा.

५ कृषी क्षेत्रातील यंत्रमानव आणि अचूक शेती.

५ संरक्षण क्षेत्रातील यंत्रमानवांचा वापर.

५ मानवसदृश यंत्रमानव व सेवा क्षेत्र.

५ कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांचे एकत्रीकरण.

५ रोजगार, कौशल्य विकास व सामाजिक परिणाम.

५ नैतिक, कायदेशीर व गोपनीयतेशी संबंधित प्रश्न.

५ यंत्रमानव तंत्रज्ञानामुळे निर्माण होणार्‍या संधी आणि आव्हाने