मागील लेखांमध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर चारमधील नैतिक विचारवंत व तत्त्ववेत्ते या मुद्द्याच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या मुद्द्यावर केंद्रीय नागरी सेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तरलेखन या लेखामध्ये पाहू.

* पुढील विधानाचा तुमच्या मते काय अर्थ आहे? – ‘कायद्याच्या दृष्टीने, जेव्हा मनुष्य इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन करतो तेव्हा तो दोषी असतो; तर नीतिशास्त्राच्या दृष्टीने, तसा केवळ विचार करणे हासुद्धा त्याचा अपराध ठरतो.’

— इमॅन्युएल कांट (१० गुण, १५० शब्द मर्यादा)

प्रश्न विश्लेषण आणि उत्तरलेखनासाठी दृष्टिकोन

या प्रश्नाची मुख्य मागणी कायदा आणि नीतिशास्त्र यांतील फरकाच्या संदर्भात कांटच्या विचाराचे स्पष्टीकरण करणे ही आहे. प्रश्न केवळ कायदेशीर दोष आणि नैतिक दोष यांतील भेद विचारत नाही, तर कृतीपेक्षा तिच्यामागील हेतू, नैतिक कर्तव्य आणि अंत:प्रेरणा यांना कांटने दिलेले महत्त्व अधोरेखित करतो.

उत्तर लिहिताना पुढील मुद्दे कव्हर करायला हवेत:

० कांटच्या कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्राच्या आधारे उद्धरणाचा अर्थ स्पष्ट करणे;

० कायदा प्रामुख्याने बाह्य कृती व अधिकारांचे नियमन करतो, तर नीतिशास्त्र व्यक्तीच्या हेतू व नैतिक प्रेरणांचे मूल्यांकन करते, याचे स्पष्टीकरण

०  यासाठी समर्पक उदाहरण

०  समारोपामध्ये मतप्रदर्शन

उत्तर क्रमांक १
(१७० शब्द)

इमॅन्युएल कांटच्या नैतिक कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्रानुसार, एखाद्या कृतीच्या बाह्य परिणामांपेक्षा त्या कृतीमागील हेतू आणि नैतिक कर्तव्याच्या जाणीवेमध्ये त्या कृतीचे नैतिक मूल्य निहित असते.

या पार्श्वभूमीवर वरील उद्धरणाचा विचार केल्यास लक्षात येते की, कायदा प्रामुख्याने व्यक्तीच्या कृतींचे नियमन करतो, तर नीतिशास्त्र व्यक्तीच्या हेतू, विचार आणि अंतर्गत प्रेरणांचे नियमन करते. त्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीने दुसर्‍याच्या अधिकारांचे प्रत्यक्ष उल्लंघन केल्यास तिच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाते. मात्र, व्यक्तीने असे कृत्य प्रत्यक्षात केले नसेल, तर केवळ त्या विचारासाठी कायदा कारवाई करू शकत नाही. परंतु असे कृत्य करण्याची इच्छा व्यक्तीमध्ये निर्माण झाली असेल, तर नैतिकदृष्ट्या ती व्यक्ती दोषी ठरते.

उदाहरणार्थ, एखाद्या अधिकार्‍याने जात, धर्म किंवा राजकीय ओळखीच्या आधारावर नागरिकाला शासकीय सेवा नाकारल्यास त्याच्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन होते आणि कायदेशीरदृष्ट्या त्यावर कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते. तथापि, अशा प्रकारे प्रत्यक्ष सेवा नाकारता आली नाही, तरी सेवा उपलब्ध करून देताना अडथळे निर्माण करणे किंवा जाणूनबुजून विलंब करणे अशा कृती नैतिकदृष्ट्या अयोग्य ठरतात. म्हणून, एखादी कृती केवळ ‘‘बेकायदेशीर नसणे’’ ही ‘‘नैतिक असण्याची’’ हमी नाही. कायद्याच्या किमान चौकटीपलीकडे जाऊन शुद्ध हेतू, कर्तव्यनिष्ठा आणि नैतिक विवेकाने वागणे हेच खर्‍या नैतिक आचरणाचे लक्षण आहे.

उत्तर क्रमांक २
(१६३ शब्द)

इमॅन्युएल कांट यांचे हे विधान कायदेशीर उत्तरदायित्व आणि नैतिक मूल्ये यांतील मूलभूत फरक स्पष्ट करते. कायदा प्रामुख्याने व्यक्तिचे बाह्य वर्तन आणि प्रत्यक्ष कृती नियंत्रित करतो. कायद्याच्या चौकटीत एखादी व्यक्ती जोपर्यंत नियमांचे किंवा दुसर्‍याच्या अधिकारांचे उल्लंघन करत नाही, तोपर्यंत ती निर्दोष मानली जाते. उदाहरणार्थ, रस्त्यावर हेल्मेट न वापरता गाडी चालवणे आणि पोलिसांच्या ‘सुरक्षित प्रवासाच्या’ नियमांचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार थेट गुन्हा ठरतो. कायदा अशा प्रत्यक्ष घडलेल्या बाह्य कृत्यावर आणि पुराव्यांवर आधारित दंड किंवा कारवाई करतो.

याउलट, नीतिशास्त्र मानवी मन, हेतू आणि आंतरिक चारित्र्याला नियंत्रित करते. कांट यांच्या कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्रानुसार, कृतीपेक्षा त्यामागचा ‘शुद्ध हेतू’ अधिक महत्त्वाचा असतो. नागरिक जिथे पोलीस उभे असतील तिथे केवळ कारवाईच्या किंवा दंडाच्या भीतीपोटी हेल्मेट घालतात आणि इतर ठिकाणी ते काढून ठेवतात. नीतिशास्त्राच्या दृष्टीने ही प्रवृत्ती चुकीची आहे, कारण यात स्वत:च्या व इतरांच्या जीवाचे रक्षण करण्याच्या ‘मूल्याला’ महत्त्व नसून केवळ दंडापासून वाचण्याचा स्वार्थी विचार असतो. असा विचार आणि हेतू नीतिशास्त्राच्या दृष्टीने नैतिक अप्रामाणिकतेचा ठरतो.

थोडक्यात समाजात दंडाच्या भीतीने शिस्त राखतो, तर नीतिशास्त्र माणसाच्या विचारात व वर्तनात उच्च दर्जाची सचोटी निर्माण करते.

उत्तर क्रमांक ३
(१३४  शब्द)

इमॅन्युएल कांट यांचे हे विधान कायदेशीर उत्तरदायित्व आणि नैतिक मूल्ये यांतील मूलभूत फरक दाखवून त्यांच्या कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्राचा सिद्धांताचे स्पष्टीकरण देते.

* कायदा (बाह्य कृत्य) :

कायदा मानवाच्या प्रत्यक्ष वर्तनाला व बाह्य कृतीला नियंत्रित करतो. एखादी व्यक्ती जोपर्यंत दुसर्‍याचे अधिकार किंवा कायदेशीर नियम मोडत नाही, तोपर्यंत ती कायद्याने निर्दोष असते. कायद्यात पुराव्याला आणि प्रत्यक्ष कृतीला महत्त्व असते.

* नीतिशास्त्र (अंतर्गत विचार व हेतू) :

नीतिशास्त्र माणसाचे मन, हेतू आणि चारित्र्य नियंत्रित करते. कांट यांच्या कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्रानुसार, शुद्ध हेतू अत्यंत महत्त्वाचा असतो. केवळ वाईट किंवा भ्रष्ट विचार मनात आणणे हीसुद्धा नैतिकतेची घसरण मानली जाते, कारण विचारांतूनच पुढे कृत्य घडत असते.

कायदा समाजात किमान शिस्त आणि व्यवस्था राखण्याचे काम करतो; परंतु नीतिशास्त्र मानवी वर्तनात आणि विचारात उच्च दर्जाची सचोटी निर्माण करते. खर्‍या अर्थाने नैतिक समाज आणि पारदर्शक प्रशासन घडवण्यासाठी केवळ कायदेपालन पुरेसे नसून विचारांची शुद्धता बाळगणे तितकेच गरजेचे आहे.
steelframe.india@gmail.com