राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर तीनमधील विज्ञान तंत्रज्ञान या घटकाच्या तयारीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. यंत्रमानव क्षेत्रातील संशोधन आणि विकास या मुद्याबाबतच्या प्रश्नाचे उत्तरलेखन या लेखामध्ये पाहू.
प्रश्नः यंत्रमानवाच्या सहाय्याने कोणती प्रतिबंधित/धोकादायक श्रमाची कामे शाश्वतपणे व्यवस्थापित करता येऊ शकतात? भारतात यंत्रमानव क्षेत्रात संशोधन व विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची चर्चा करा.
उत्तर क्र. 1 (सुमारे 270 शब्द)
यंत्रमानव केवळ धोकादायक श्रमांची जागा घेत नाही, तर स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, संसाधन कार्यक्षमता आणि मानवी प्रतिष्ठा यांना बळकटी देत शाश्वत विकासाचे प्रभावी साधन ठरु शकतात.
यंत्रमानवाद्वारे शाश्वतपणे व्यवस्थापित करता येणारी धोकादायक कामे :
1. मानवी मैलावहन निर्मुलन आणि सुरक्षित सांडपाणी व्यवस्थापन – गटारे, सेप्टिक टँक व ड्रेनेज स्वच्छतेत यंत्रमानवाचा वापर करुन कामगारांच्या आरोग्याचे संरक्षण व सन्मानजनक रोजगाराला चालना दिली जाते. यामुळे मानवी मैलावहनास प्रतिबंध अधिनियम, 2013 चे पालन होते तसेच सामाजिक समावेशनास चालना मिळते.
2. घनकचरा व जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन – कचऱ्याचे विशेषतः वैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन व प्रक्रिया सुरक्षित्पणे आणि आरोग्य्पूर्ण पद्धतीने करणे यंत्रमानवाच्या वापरामुळे शक्य होते.
3. खाणकाम – दुर्गम व धोकादायक भागांत उत्खनन करताना यंत्रमानवाच्या वापरामुळे जिवित आणि वित्त हानी कमी करणे शक्य होते.
4. अणुऊर्जा व रासायनिक उद्योग – किरणोत्सर्ग व विषारी पदार्थ हाताळन्यासाठी यंत्रमानव हाच सुरक्षित पर्याय आहे. अचूक व काटेकोर कामे शक्य झाल्याने मानवी चुकांची शक्यता कमी होते.
5. आपत्ती व्यवस्थापन – यंत्रमानवाच्या वापरामुळे आपत्तीग्रस्त क्षेत्रात मानवी मदत पोचू शकत नाही अशा ठिकाणी शोध व बचाव कार्य वेगवान व सुरक्षितपणे पूर्ण होते.
भारतातील संशोधन व विकासासाठी उपाययोजना :
1. राष्टीय धोरणाची आवश्यकता – राष्ट्रीय रोबोटिक्स धोरण तयार करुन त्याची अंलबजावणी करणे आवश्यक आहे.
2. व्यावसायिक उत्पादनास चालना – विद्यापीठे आणि स्टार्टअप्स व उद्योग यांच्यात समन्वय साधून व्यावसायिक उत्पादनास चालना मिळणे आवश्यक आहे. यासाठी मेक इन इंडीया, स्टार्ट अप इंडीया या योजनांमध्ये आटोमेशन आणि यंत्रमानव क्षेत्रासाठी प्रोत्साहन् देणे आवश्यक आहे.
3. कौशल्य विकास – कृत्रिम बुद्धीमत्ता आणि यंत्रमानव तंत्रज्ञानाच्या वापराकरीता कौशल्य विकास योजना राबविणे आवश्यक आहे.
4. स्वदेशी चिप्स, सेन्सर्स व रोबोटिक घटकांचे उत्पादन वाढविण्यासाट्ही प्रयत्न गरजेचे आहेत.
5. नियामक चौकट – यंत्रमानवांच्या वापरासाठी मानके, सायबर सुरक्षा व नैतिक वापरासाठी नियामक चौकट आखून देण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे.
उत्तर क्र. 2 (227 शब्द)
यंत्रमानव हे कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर्स आणि स्वयंचलित नियंत्रण प्रणालींच्या साहाय्याने कार्य करणारे तंत्रज्ञान आहे. धोकादायक, आरोग्यास अपायकारक आणि प्रतिबंधित स्वरूपाची अनेक कामे यंत्रमानवाच्या मदतीने अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतीने व्यवस्थापित करता येतात.
यंत्रमानवाची कामेः
सांडपाणी वाहिन्या, मॅनहोल आणि सेप्टिक टँक यांच्या स्वच्छतेसाठी रोबोटचा वापर केल्यास मानवी जीविताला असलेला धोका टाळता येतो आणि Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act, 2013 च्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करता येते. घनकचरा आणि जैववैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन व प्रक्रिया यंत्रमानवाद्वारे केल्यास स्वच्छता सुधारते तसेच पुनर्वापर आणि संसाधनांचे संवर्धन शक्य होते.
खाणकाम क्षेत्रात यंत्रमानवाचा वापर केल्यास विषारी वायू, भूस्खलन आणि स्फोट यांसारख्या धोक्यांपासून कामगारांचे संरक्षण होते. अणुऊर्जा केंद्रे आणि रासायनिक उद्योगांमध्ये यंत्रमानव किरणोत्सर्ग व विषारी पदार्थांची सुरक्षित हाताळणी करू शकतात. भूकंप, पूर आणि इमारती कोसळल्यासारख्या आपत्तीमध्ये यंत्रमानव शोध व बचाव कार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पार पाडू शकतात.
यंत्रमानव क्षेत्रात संशोधन व विकास
भारतात यंत्रमानव क्षेत्रात संशोधन व विकासाला चालना देण्यासाठी सरकारने दीर्घकालीन निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
संशोधन संस्था, विद्यापीठे, उद्योग आणि स्टार्टअप्स यांच्यात सहकार्य वाढविणे आवश्यक आहे. मेक इन इंडीया, स्टार्ट अप इंडीया अंतर्गत यंत्य्रमानव उद्योगाला विशेष प्रोत्साहन दिले पाहिजे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर्स आणि स्वयंचलन क्षेत्रातील कौशल्य विकासावर भर देणे तसेच स्वदेशी चिप्स आणि रोबोटिक घटकांचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.
हे सर्व उपाय एकत्रितपणे राबविण्यासाठी राष्ट्रीय यंत्रमानव धोरण तयार करुन त्याच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे.
अशा उपाययोजनांमुळे भारतात सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण होईल, उत्पादकता वाढेल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होईल
स्पष्टीकरणः दोन्ही उत्तरांमध्ये आवश्यक सर्व मुद्दे कव्हर होत आहेत. उत्तराच्या रचनेचा परीक्षकावर वेगवेगळा परीणाम होतो, कसा ते पाहू. उत्तर क्र. 1 मध्ये दोन मुख्य मुद्यांमध्ये उपमुद्दे मांडून त्यांना शीर्षक दिले आहे. तेवढ्या शीर्षकांउळे मुद्दा लक्षात येतो. संपूर्ण उत्तर वाचायची गरज पडत नाही. आणि सुटसुटीत रचनेमुळे उत्तर परीणामकारक होते. उत्तर क्र. 2 मध्ये शीर्षक न देता परीच्छेदांचा वापर केला आहे. आणि सपर्मक मुद्दे एका परीच्छेदामध्ये एकत्रितपणे लिहीले आहेत. त्यामुळे परीच्छेदांची रचना सुटसुटीत झाली आहे. दोन्ही उत्तरे परीणामकारक ठरतात.
