अभिवृत्तीचे घटक आणि तिचा प्रभाव या संकल्पनात्मक मुद्यांच्या तयारीबाबत आपण यापूर्वी पाहिले. व्यक्तिची अभिवृत्ती तिच्या वर्तनातून व्यक्त होते. विशेषतः प्रशासनामध्ये नैतिक अभिवृत्तीबरोबरच राजकीय अभिवृत्तीही प्रभावी ठरते. तिचे सामाजिक परीणाम हा सुशासनासाठी महत्वाचा घटक आहे. त्यामुळे तयारी करताना नैतिक अभिवृत्ती, राजकीय अभिवृत्ती, त्यांचे सामाजिक परिणाम आणि पाठपुरावा हे घटक परस्परांशी जोडून समजून घेणे आवश्यक आहे.

नैतिक अभिवृत्ती

योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय, कर्तव्य-अकर्तव्य याबाबत व्यक्तीची मानसिक भूमिका म्हणजे नैतिक अभिवृत्ती. एखाद्या व्यक्तीची नैतिक अभिवृत्ती तिच्या निर्णयांवर आणि वर्तनावर कशा प्रकारे प्रभाव टाकते, हे उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेणे जास्त उपयोगी ठरेल. उदाहरणार्थ, अधिकाऱ्याची निष्पक्षतेबद्दलची सकारात्मक अभिवृत्ती त्याला राजकीय किंवा सामाजिक दबाव असूनही नियमांनुसार निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकते. प्रशासनाच्या संदर्भात प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठता, निष्पक्षता, पारदर्शकता, उत्तरदायित्व, सहानुभूती आणि लोकहिताची भावना या नैतिक अभिवृत्ती महत्वाच्या आहेत. विशेषतः भ्रष्टाचार, राजकीय दबाव, हितसंबंधांचा संघर्ष, नियमांचे पालन आणि लोकहिताचा निर्णय यांच्याशी नैतिक अभिवृत्तीचा संबंध जोडून अभ्यास करणे केस स्ट्डीज आणि मुलाखतीच्या तयारीकरता आवश्यक आहे.

राजकीय अभिवृत्ती

राजकीय संस्था, शासन, लोकशाही, संविधान, राजकीय पक्ष, सार्वजनिक धोरणे आणि नागरिकांच्या राजकीय सहभागाबाबत व्यक्तीची धारणा, भावना आणि कृतीची प्रवृत्ती म्हणजे राजकीय अभिवृत्ती.

लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समानता, स्वातंत्र्य इत्यादी घटनात्मक मूल्ये, राजकीय सहभाग, मतदान, सार्वजनिक मत, शासनावरील विश्वास आणि राजकीय ध्रुवीकरण अशा मुद्यांबाबत अभिवृत्ती कशी विकसित होते अणि त्यातील सकारात्मक व नकारात्मक पैलूंचा प्रशासनावर आणि समाजावर काय परिणाम होतो हे समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ संविधानिक मूल्यांवरील सकारात्मक अभिवृत्ती सामाजिक विविधतेचा स्वीकार आणि समान संधी वाढवू शकते; तर पूर्वग्रहदूषित किंवा अतिध्रुवीकृत राजकीय अभिवृत्ती सामाजिक तणाव आणि संघर्ष वाढवू शकते. नकारात्मक अभिवृत्तीच्या परीणामांचा विचार करता त्यावरील उपाययोजनांचाही सविस्तर अभ्यास करायला हवा. तयारी करताना नैतिक मूल्ये → अभिवृत्ती → निर्णय → वर्तन → सामाजिक परिणाम ही साखळी समजून घ्यावी.

सामाजिक परीणाम

एखादी अभिवृत्ती केवळ व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करत नाही, तर तिचे परिणाम कुटुंब, समूह, संस्था आणि संपूर्ण समाजावर होऊ शकतात, हे लक्षात घ्यावे. प्रत्येक अभिवृत्तीचा अभ्यास करताना तिचे सकारात्मक तसेच नकारात्मक सामाजिक परिणाम स्वतंत्रपणे ओळखावेत. याकरीता अभिवृत्तींची उदाहरण बॅंक तयार करावी. सोबतच्या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या अभिवृत्तींचे संकलन असलेली अभिवृत्ती उदाहरण बॅंक दिली आहे. प्रत्येक अभिवृत्तीचे एका पानामध्ये घटक, CAB माडेलमध्ये संरचना, तिचा प्रभाव, सकारात्मक आणि नकारात्मक पैलू आणि वर्तनावर होणारा परीणाम समजून घेऊन 2 -3 उदाहरणे संकलित करावीत.

पाठपुरावा

अभिवृत्ती आणि वर्तनामध्ये तफावत असेल तर सकारात्मक अभिवृत्ती वर्तनामध्ये रुपांतरीत व्हावी यासाठी उपाययोजना करणे शक्य आहे. तर नकारात्मक अभिवृत्तीचे सकारात्मक अभिवृत्तीमध्ये परीवर्तन करण्यासाठीही उपाययोजना करता येणे शक्य आणि आवश्यक आहे. अशा परीवर्तनासाठी आणि सकारात्मक वर्तनास प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन, दंड, नैतिक संदेश अशा विविध मार्गांचा त्यांची परीणामकारकता आणि मूल्यमापन अशा मुद्यांच्या आधारे अभ्यास करायला हवा. याबाबत रीचर्ड थेलर यांचा नज सिद्धांत समजून घ्यायला हवा. अशा प्रकारे उपायांनंतर झालेला अभिवृत्तीतील बदल प्रत्यक्ष वर्तनात दिसतो आहे का, याचे नियमित निरीक्षण आणि मूल्यमापन करणे आवश्यक आहे, हे समजून घ्यावे. हा बदल सातत्यपूर्ण रहावा यासाठी कोणत्या मार्गांनी पाठपुरावा करता येईल याचाही विचार आवश्यक आहे.

भ्रष्टाचारविरोधी प्रशिक्षण दिल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या अभिवृत्तीमध्ये बदल झाला का, त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात पारदर्शकता स्वीकारली का आणि नागरिकांच्या अनुभवात सुधारणा झाली का, याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

अभिवृत्ती example Bank

  1. लोकशाही मूल्ये
  2. कायद्याचे पालन
  3. पर्यावरण संरक्षण
  4. महिला सक्षमीकरण
  5. लिंगभाव समानता
  6. जातीय पूर्वग्रह
  7. धार्मिक सहिष्णुता
  8. सामाजिक समावेशन
  9. दिव्यांग समावेशन
  10. बालहक्क व बालसंरक्षण
  11. गरीब व दुर्बल घटकांबाबतची अभिवृत्ती
  12. भाषिक संवेदनशीलता
  13. वैज्ञानिक दृष्टिकोन
  14. अंधश्रद्धाविरोधी दृष्टिकोन
  15. प्रशासनातील नागरिकाभिमुखता
  16. तक्रार निवारण
  17. पारदर्शकता
  18. कर्तव्यनिष्ठा
  19. सेवाभाव
  20. भ्रष्टाचार
  21. सार्वजनिक सेवांबाबतची नागरिकांची अभिवृत्ती
  22. मतदान
  23. वाहतूक नियमांचे पालन
  24. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण
  25. कामाच्या ठिकाणी शिस्त
  26. सोशल मीडिया वापर
  27. Fake News बाबतची अभिवृत्ती
  28. डेटा गोपनीयता
  29. जलसंवर्धन
  30. ऊर्जा बचत
  31. कचरा वर्गीकरण
  32. प्लास्टिकविरोधी भूमिका
  33. सार्वजनिक ठिकाणी शिस्त
  34. Whistleblowing

केवळ सकारात्मक अभिवृत्ती असून पुरेसे नसते; परिस्थितीजन्य दबाव, संस्थात्मक मर्यादा आणि वैयक्तिक स्वार्थ अशा बाह्य कारकांचा निर्णायावर परीणाम होऊ शकतो. व्यक्तीच्या अभिवृत्तीशी त्याचे वर्तन सुसंगत असेल तर अशा निर्णयांचा सकारात्मक सामाजिक परीणाम दिसून येतो. त्यांमध्ये विसंगती असेल तर प्रशिक्षण, जनजागृती किंवा नैतिक संदेश अशा मार्गांनी सकारात्मक अभिवृत्ती जोपासण्याचे प्रयत्न करवे लागतात. आणि त्यांच्यासाठी पाठपुरावाही करावा लागतो. हे समजून घ्यायला हवे.