राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर चारमधील प्रशासकीय अभिवृत्ती घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या मुद्यावर केंद्रीय नागरी सेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तरलेखन या लेखामध्ये पाहू.
प्रश्न: “सचोटीची एक कसोटी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यास पूर्ण नकार देणे होय. प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणाच्या संदर्भासह स्पष्ट करा.” (10 गुण, १५० शब्द)
उत्तर क्रमांक १ (१६५ शब्द)
मूल्ये, विचार, शब्द आणि कृती यांच्यातील सुसंगती म्हणजे सचोटी. राजकीय दबाव, आर्थिक प्रलोभन, वैयक्तिक संबंध, हितसंबंधांचा संघर्ष किंवा वरीष्ठांचे अनुचित आदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत तिची खरी परीक्षा होते.
सार्वजनिक सेवेत राजकीय दबावाच्या परिस्थितीत टी. एन. शेषन यांनी निवडणूक आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करून घटनात्मक कर्तव्याला प्राधान्य दिले. अवैध वाळू उत्खननाविरुद्ध कारवाई करणाऱ्या दुर्गा शक्ती नागपाल यांचे उदाहरण सार्वजनिक संसाधनांचे संरक्षण आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील ठामपणा दर्शवते.
अशोक खेमका यांच्या कारकिर्दीतील नियमाधारित निर्णय आणि वारंवार झालेल्या बदल्या हे बाह्य दबावापेक्षा प्रशासकीय प्रक्रियेला महत्त्व देण्याच्या संदर्भात अभ्यासता येतात. सत्येंद्र दुबे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील कथित गैरप्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊन भ्रष्टाचाराविरुद्ध नैतिक धैर्य दाखवले. ई. श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रोच्या अंमलबजावणीत वेळ, गुणवत्ता आणि व्यावसायिक शिस्तीवर भर दिला. हितसंबंधांच्या संघर्षात निर्णयप्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवणे आणि वरिष्ठांचा अनुचित आदेश असल्यास नियमबद्ध मार्गाने आक्षेप नोंदवणे हेही सचोटीचे आवश्यक पैलू आहेत.
सचोटी म्हणजे केवळ भ्रष्टाचार नाकारणे नव्हे; तर परिस्थिती कोणतीही असो, न डगमगता कायदा, नैतिकता आणि सार्वजनिक हित यांच्याशी बांधील राहणे होय. प्रशासनाची विश्वासार्हता आणि सार्वजनिक विश्वास दृढ राहण्यासाठी सचोटी मूलभूत मूल्य आहे.
उत्तर क्रमांक २ (१७० शब्द)
सचोटी म्हणजे मूल्ये, विचार, शब्द आणि कृती यांच्यातील सुसंगती. तिची खरी परीक्षा अनुकूल परिस्थितीत नव्हे, तर दबाव, प्रलोभन, वैयक्तिक हित किंवा प्रतिकूल परिस्थितीतही नैतिक तत्त्वांशी तडजोड न करण्यामध्ये होते.
सार्वजनिक सेवेत सचोटी पुढील परिस्थितींमध्ये विशेषतः महत्त्वाची ठरते.
राजकीय दबावाच्या प्रसंगी, अधिकारी कायदा व घटनात्मक कर्तव्याला प्राधान्य देतो.
आर्थिक प्रलोभनाच्या प्रसंगी, लाच किंवा अनुचित लाभ नाकारणे ही सचोटी होय.
वैयक्तिक संबंधांच्या प्रसंगी, परिचित व्यक्तीला नियमबाह्य लाभ न देणे आवश्यक असते.
हितसंबंधांचा संघर्ष निर्माण झाल्यास, संबंधित निर्णयप्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवणे संस्थात्मक निष्पक्षता टिकवते.
वरिष्ठांकडून अनुचित आदेश मिळाल्यास, त्याची कायदेशीरता तपासून योग्य प्रशासकीय मार्गाने आक्षेप नोंदवणे अपेक्षित असते.
याचे उदाहरण म्हणून टी. एन. शेषन यांचा संदर्भ देता येतो. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांविरुद्ध संस्थात्मक अधिकारांचा वापर केला. त्यांचे कार्य सार्वजनिक पदावरील घटनात्मक जबाबदारीला वैयक्तिक किंवा बाह्य दबावापेक्षा प्राधान्य देण्याचे उदाहरण ठरते.
त्यामुळे सचोटी म्हणजे केवळ भ्रष्टाचारापासून दूर राहणे नव्हे; ती दबाव, प्रलोभन आणि वैयक्तिक हितापेक्षा कायदा, नैतिकता व सार्वजनिक हित यांना प्राधान्य देण्याची क्षमता आहे. अशा सचोटीमुळे प्रशासनावरील सार्वजनिक विश्वास दृढ होतो.
उत्तर क्रमांक ३ (१४१ शब्द)
सचोटीची खरी परीक्षा दबाव, प्रलोभन किंवा वैयक्तिक हित समोर असतानाही योग्य तत्त्वांशी तडजोडीस नकार देण्यात दिसते.
सार्वजनिक प्रशासनात तुकाराम मुंढे यांची नियमपालन, शिस्त आणि सार्वजनिक हिताला प्राधान्य देणारी कार्यपद्धती ही सचोटीचे उदाहरण मानता येते. यातून व्यक्तिगत किंवा बाह्य दबावापेक्षा नियम व कर्तव्याला प्राधान्य देण्याचा नैतिक धडा मिळतो. डॉ. प्रकाश आमटे यांनी हेमलकसा परिसरातील आदिवासी समाजासाठी आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रात दीर्घकाळ कार्य केले. त्यातून वंचित घटकांच्या सेवेसाठी वैयक्तिक सुखसोयींचा त्याग आणि सेवाभाव हा नैतिक संदेश मिळतो. डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनाच्या माध्यमातून कुष्ठरोगग्रस्त व वंचित व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्य केले; यातून मानवी प्रतिष्ठा, समावेशकता आणि सामाजिक उत्तरदायित्व अधोरेखित होते. सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ व निराधार मुलांसाठी आयुष्य समर्पित केले; त्यातून करुणा, मातृत्वभाव आणि दुर्बल घटकांप्रती निःस्वार्थ बांधिलकी दिसून येते.
थोडक्यात सचोटी ही केवळ भ्रष्टाचार न करणे एवढ्यापुरती मर्यादित नाही तर न्याय्य तत्त्वांशी बांधिलकी, सार्वजनिक हितासाठी त्याग आणि मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण यांचा समन्वय आहे.
स्पष्टीकरण
उत्तर क्रमांक १ मध्ये देशपातळीवरील उच्चपदस्थ अधिकारी व सार्वजनिक सेवकांची उदाहरणे घेऊन सचोटीची चर्चा केली आहे. यातून उमेदवाराचे व्यापक वाचन आणि राष्ट्रीय स्तरावरील उदाहरणांचा योग्य वापर करण्याची क्षमता दिसते.
उत्तर क्रमांक २ मध्ये सचोटीची परीक्षा कोणत्या सर्वसाधारण प्रसंगांत लागते—राजकीय दबाव, आर्थिक प्रलोभन, वैयक्तिक संबंध, हितसंबंधांचा संघर्ष किंवा अनुचित आदेश—हे स्पष्ट करून टी. एन. शेषन यांचे उदाहरण दिले आहे. यातून संकल्पनात्मक स्पष्टता आणि प्रसंगानुरूप उदाहरण देण्याचे कौशल्य दिसते.
उत्तर क्रमांक ३ मध्ये तुकाराम मुंढे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे आणि सिंधुताई सपकाळ यांसारखी महाराष्ट्रातील उदाहरणे घेतली आहेत. त्यामुळे सचोटी ही केवळ प्रशासकीय सेवापुरती मर्यादित नसून सामाजिक व सार्वजनिक जीवनातील व्यापक मूल्य आहे, हे अधोरेखित होते.
तिन्ही उत्तरांचा आशय समान असला तरी दृष्टिकोन वेगळा आहे. परीक्षेतील प्रसंगावधान, प्रश्नाची मागणी आणि स्वतःची तयारी यानुसार उमेदवार राष्ट्रीय, प्रशासकीय, स्थानिक किंवा सामाजिक उदाहरणांपैकी योग्य उदाहरण निवडू शकतो. त्यामुळे विविध स्तरांवरील उदाहरणांचा संच तयार ठेवणे उपयुक्त ठरते.
