राज्य सेवा मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक ३ मधील विज्ञान व तंत्रज्ञान घटकाच्या तयारीविषयी सध्या चर्चा सुरू आहे. या विषयाच्या मूलभूत तयारीसंदर्भात चर्चा करुन मागील काही लेखांमध्ये या घटकावरील प्रश्नांची आदर्श उत्तरे कशी लिहिता येतील, याचा आढावा घेण्यात आला. उत्तरलेखनाचा सराव, प्रश्नांचे स्वरूप आणि अपेक्षित उत्तरांची रचना यांचे विश्लेषण केल्यानंतर आता या घटकाच्या सर्वंकष तयारीबाबतची चर्चा सविस्तरपणे करण्यात येत आहे. या घटकाच्या चालू घडामोडींमधून परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे कसे शोधावे ते या लेखामध्ये पाहू.
केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या धर्तीवर राज्यसेवा मुख्य परीक्षा आयोजित होणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण करून अपेक्षित प्रश्नांचे स्वरूप आणि त्यासाठी करावयाची तयारी समजून घेणे आवश्यक आहे. केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण केल्यानंतर प्रामुख्याने त्या त्या वर्षातील चालू घडामोडी, समकालीन विषय आणि चर्चेत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर हे प्रश्न आधारित असल्याचे दिसून येते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे मुद्दे चालू घडामोडींमधून कसे शोधायचे, हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे.
पूर्वपरीक्षेसाठी तथ्यात्मक माहिती, आकडेवारी आणि संकल्पनांची मूलभूत माहिती महत्त्वाची असते; तर मुख्य परीक्षेसाठी दीर्घकालीन परिणाम घडविणारे, धोरणात्मक महत्त्व असलेले तसेच सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक परिणाम करणारे मुद्दे अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास करताना केवळ घटनांपुरते मर्यादित न राहता त्यांच्या पार्श्वभूमीचा, कारणांचा, परिणामांचा आणि भविष्यातील परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.
या दृष्टिकोनातून विज्ञान व तंत्रज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आलेल्या घटकांच्या अनुषंगाने महत्त्वाच्या चालू घडामोडींचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. विज्ञान व तंत्रज्ञान घटकाचा सविस्तर अभ्यासक्रम आपण पाहिला आहे. या अभ्यासक्रमातील प्रत्येक उपघटकाच्या संदर्भात पुढील मुद्द्यांवर आधारित चालू घडामोडी या प्रश्नांचा विषय असू शकतात.
१. संबंधित क्षेत्रामध्ये झालेले मूलभूत संशोधन आणि त्यातून विकसित झालेल्या नवीन संकल्पना.
२. त्या क्षेत्राशी संबंधित नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांचे संशोधन, त्यांचे योगदान आणि त्याचे वैज्ञानिक तसेच सामाजिक महत्त्व.
३. जागतिक स्तरावर विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर, त्यामधील नवोन्मेष आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे होत असलेले अनुप्रयोग.
४. संबंधित क्षेत्रात उद्भवलेल्या गंभीर समस्या, आव्हाने किंवा संकटे, ज्यांची जागतिक, राष्ट्रीय अथवा राज्यस्तरावर व्यापक चर्चा होत आहे किंवा ज्यांचा प्रभाव राज्य, राष्ट्र अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणवत आहे.
तयारी करताना या चार आयामांचा विचार करून चालू घडामोडींचे विश्लेषण केल्यास मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असलेला विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. तसेच अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाला समकालीन घटनांशी जोडून पाहिल्यास प्रश्नांचा संभाव्य आवाका आणि अपेक्षित उत्तरांचे स्वरूप अधिक स्पष्टपणे समजते.
जागतिक स्तरावर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत असलेले विविध मुद्देही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेद्वारे करण्यात येणाऱ्या घोषणा, विविध आंतरराष्ट्रीय करार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित जागतिक सहकार्याच्या उपक्रमांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, अणुऊर्जा क्षेत्रातील करार, संरक्षण तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीसंबंधी करार, अवकाश संशोधनातील आंतरराष्ट्रीय सहकार्य, हवामान बदलासंदर्भातील तांत्रिक करार इत्यादी विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांनाही विशेष महत्त्व द्यायला हवे. केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रांच्या विकासासाठी स्वतंत्र धोरणे जाहीर केली जातात. विज्ञान व तंत्रज्ञान ही व्यापक संकल्पना असल्याने तिच्या अंतर्गत येणाऱ्या विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र धोरणे आखली जातात. उदाहरणार्थ, नॅनोतंत्रज्ञानासाठी स्वतंत्र धोरण, विद्युत वाहनांसाठी (ई-व्हेईकल्स) धोरण, सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी धोरण, ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षमतेसाठी धोरण, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा आणि सेमीकंडक्टर उद्योग यांसारख्या क्षेत्रांसाठी आखण्यात आलेली धोरणे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात. या धोरणांशी संबंधित चालू घडामोडी असोत वा नसोत, त्यांचा अभ्यास आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना तांत्रिक संकल्पना समजून घेऊन, त्या क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणे, करार, कार्यक्रम आणि त्यांचे परिणाम यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. अशा समन्वित अभ्यासातून मुख्य परीक्षेसाठी अपेक्षित विश्लेषणात्मक दृष्टीकोन विकसित होऊ शकतो.
परिणामकारक तयारीसाठी…
मुख्य परीक्षेतील विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे प्रश्न प्रामुख्याने चालू घडामोडींवर आधारित असतात. त्यामुळे महत्त्वाच्या चालू घडामोडी ओळखताना मूलभूत संशोधन, नवोन्मेष, उदयोन्मुख तंत्रज्ञान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणे, करार, तसेच व्यापक परिणाम घडविणारे वैज्ञानिक आणि तांत्रिक विषय यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अशा घटनांचा अभ्यास अभ्यासक्रमातील संबंधित घटकांशी जोडून केल्यास तयारी अधिक परिणामकारक ठरते.
