मागील लेखांमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर चारमधील मानवी मूल्ये आणि नितीमत्ता या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये मानवी मूल्ये या मुद्यावर केंद्रीय नागरी सेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तरलेखन पाहू.

प्रश्न: काही लोकांना असे वाटते की मूल्ये काळ आणि परिस्थितीनुसार बदलत राहतात, तर काही लोकांचा ठाम विश्वास आहे की काही निश्चित मानवी मूल्ये सार्वत्रिक आणि शाश्वत आहेत. या संदर्भात योग्य कारणमीमांसेसह आपले मत स्पष्ट करा.

मानवी मूल्ये ही समाजाच्या नैतिक जीवनाला दिशा देतात. मात्र, समाज स्थिर नसल्याने त्याची मूल्यव्यवस्थाही काळानुसार विकसित होणे आवश्यक आहे. माझ्या मते, मूल्ये अपरिवर्तनीय मानण्याऐवजी बदलत्या सामाजिक वास्तवाशी सुसंगतपणे त्यांचे पुनर्मूल्यांकन केले पाहिजे.

सामाजिक परिवर्तनामुळे पूर्वी स्वीकारली गेलेली अनेक मूल्ये कालबाह्य ठरली आहेत. स्त्री-पुरुष असमानता, अस्पृश्यता, बालविवाह किंवा वंशभेद यांना पूर्वी सामाजिक मान्यता असली, तरी आधुनिक काळात समानता, स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे नैतिक प्रगतीसाठी मूल्यपरिवर्तन आवश्यक आहे.

त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि नव्या सामाजिक आव्हानांमुळे नवीन मूल्यांची निर्मिती आवश्यक झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे, डेटा-सुरक्षा, जैव-तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय संकटे यांसाठी पूर्वीच्या मूल्यचौकटी पुरेशा नाहीत. डिजिटल गोपनीयता, तंत्रज्ञानातील जबाबदारी आणि पर्यावरणीय न्याय यांसारखी मूल्ये त्यामुळे महत्त्वाची ठरतात.

तथापि, मूल्यपरिवर्तनाचा अर्थ नैतिक सापेक्षतावाद नव्हे. मानवी प्रतिष्ठा, न्याय, करुणा आणि अहिंसा यांसारखी मूलभूत तत्त्वे परिवर्तनासाठी नैतिक कसोटी ठरली पाहिजेत.

म्हणून, मूल्ये बदलत्या समाजाच्या गरजांनुसार विकसित झाली पाहिजेत; परंतु हा बदल मानवी कल्याण, प्रतिष्ठा आणि न्यायाच्या व्यापक चौकटीत असला पाहिजे.

मानवी मूल्ये ही केवळ काळ, समाज किंवा परिस्थितीची निर्मिती नसून मानवी अस्तित्वाच्या मूलभूत नैतिक गरजांशी संबंधित आहेत. माझ्या मते, मूल्यांच्या अभिव्यक्तीत बदल होऊ शकतो; परंतु त्यांच्या मूलभूत गाभ्याला सार्वत्रिक आणि शाश्वत मानणे अधिक योग्य आहे.

सत्य, न्याय, करुणा, प्रामाणिकपणा, अहिंसा, आणि मानवी प्रतिष्ठा यांसारखी मूल्ये विविध संस्कृती व कालखंडांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. त्यांची सामाजिक अभिव्यक्ती बदलली असली तरी मानवी कल्याण आणि प्रतिष्ठेचे संरक्षण हा त्यांचा मूलभूत हेतू कायम राहतो. उदाहरणार्थ, आधुनिक मानवी हक्कांची संकल्पना विकसित झाली असली तरी न्याय आणि मानवी प्रतिष्ठेची आकांक्षा नवीन नाही.

दुसरे म्हणजे, मूल्ये पूर्णपणे परिस्थितीनुसार बदलणारी मानल्यास नैतिक सापेक्षतावाद निर्माण होऊ शकतो. त्यातून अन्याय, शोषण किंवा भेदभावालाही विशिष्ट परिस्थितीच्या नावाखाली योग्य ठरविण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी काही स्थिर नैतिक कसोट्या आवश्यक असतात.

तथापि, शाश्वत मूल्यांचा अर्थ त्यांच्या कठोर किंवा अपरिवर्तनीय स्वरूपाचा आग्रह नव्हे. मूलभूत मूल्यांचा नैतिक आधार कायम ठेवून त्यांच्या अर्थाची आणि व्यवहारातील अभिव्यक्तीची पुनर्व्याख्या होऊ शकते.

मानवी मूल्ये ही व्यक्तीच्या वर्तनाला योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय आणि हित-अहित यांमध्ये भेद करण्यासाठी मार्गदर्शन करणारी तत्त्वे आहेत. मूल्यांचा मूलभूत गाभा सार्वत्रिक असतो; मात्र त्यांची व्याख्या, प्राधान्यक्रम आणि व्यवहारातील अभिव्यक्ती काळ, संस्कृती आणि परिस्थितीनुसार बदलत असते.

इतिहास पाहिल्यास मूल्यव्यवस्थेत लक्षणीय परिवर्तन झाल्याचे दिसते. पूर्वी सामाजिक परंपरा, कुटुंबाची प्रतिष्ठा किंवा सामूहिक हित यांना व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्व दिले जात असे. आधुनिक लोकशाही व्यवस्थेत व्यक्तीची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समानता आणि मानवी हक्क यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. उदाहरणार्थ, स्त्रियांचे शिक्षण, आंतरजातीय विवाह किंवा सामाजिक समावेशन याबाबत समाजाच्या नैतिक दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. त्याचप्रमाणे युद्ध, महामारी किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या परिस्थितींमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्यापेक्षा सामूहिक सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिले जाऊ शकते.

तरीही या बदलांच्या पलीकडे काही मूल्ये मानवी जीवनाच्या मूलभूत गरजांशी जोडलेली आहेत. सत्य, न्याय, करुणा, मानवी प्रतिष्ठा, प्रामाणिकपणा, अहिंसा यांना जवळपास सर्व काळी सर्व संस्कृतींमध्ये नैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. केवळ त्यांची अभिव्यक्ती काळानुरूप बदलू शकते.

त्यामुळे मूल्ये पूर्णपणे स्थिरही नाहीत आणि पूर्णपणे सापेक्षही नाहीत. काळ मूल्यांचे स्वरूप घडवतो, परिस्थिती त्यांचे प्राधान्य ठरवते, तर मानवी प्रतिष्ठा व कल्याण त्यांना नैतिक दिशा देतात.

स्पष्टीकरण

पहिल्या उत्तरामध्ये मूल्यांचे परिवर्तनशील असणे, दुसऱ्या उत्तरामध्ये मूल्यांचे शाश्वत असणे, आणि तिसऱ्या उत्तरामध्ये या द्वंद्वातील संतुलन, अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि तीनही उत्तरे मूल्यांचा गाभा शाश्वत असल्याचे आणि त्यांची अभिव्यक्ती व प्राधान्य परिस्थितीनुसार बदलत असल्याचे तर्कसंगत निष्कर्ष मांडतात. त्यामुळे दृष्टिकोन वेगवेगळा असला तरी तीनही उत्तरे तर्कसंगत आणि परिणामकारक आहेत.