UPSC Success story : भारतीय प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणारे असंख्य मुले-मुली बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत, प्रयत्न आणि सातत्य ठेवल्यास यश मिळतंच हे एका तरुणाने सिद्ध करून दाखवलं आहे. मोल-मजुरी करून घर चालवणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करत आपल्या स्वप्नांना जिद्दीची जोड देत नीलेश अहिरवार यांनी यश खेचून आणलंय. तरुणाच्या जिद्दी आणि मेहनतीने त्यानं संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलले. कसा होता त्यांचा हा प्रवास पाहूयात..

मध्य प्रदेशातील इशपूर या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या नीलेश अहिरवार यांंनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये यश मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. नीलेश अहिरवार यांनी UPSC 2023 मध्ये ९१६ वा क्रमांक मिळवला आहे. नीलेशच्या आई-वडिलांनीही त्याचे ध्येय आणि यश मिळवण्याच्या प्रवासात खूप मेहनत घेतली आहे. गावातील एका साध्या दोन खोल्यांच्या टाइल्सच्या घरात कोणत्याही चैनीच्या वस्तू नसताना नीलेशने तरुण वयात देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २४ वर्षीय नीलेशने मेहनतीने संपूर्ण कुटुंबाची हलाखीची परिस्थितीच बदलून टाकली.

संपूर्ण गावाला अभिमान

नीलेशचे वडील रामदास हे गावातच गवंडी काम करतात. दलित समाजातून आलेल्या नीलेशच्या यशाचा संपूर्ण गावाला अभिमान आहे. त्यांचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झाले, नंतर त्यांनी ९वी ते १२वी पर्यंतच्या शिक्षणासाठी तवनगर मॉडेल स्कूलमध्ये प्रवेश घेतला. १२वी नंतर त्यांनी २०२० मध्ये चित्रकूट येथील महात्मा गांधी ग्रामोद्योग विद्यापीठातून कृषी विषयात बीटेक केले.

अशा प्रकारे केली यूपीएससीची तयारी

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीलेशने आपल्या गावी परतण्याचा आणि यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दोन खोल्यांच्या घरात त्यानं दिवसरात्र अभ्यास करून यशाला गवसणी घातली. दरम्यान, खूप मेहनत करूनही तो २०२१ आणि २०२२ मध्ये यूपीएससी प्रीलिम्सही पास करू शकला नाही.

हेही वाचा >> Maharashtra SSC Result 2024: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल जाणून घ्या

तिसऱ्या प्रयत्नात यश

सलग दोन प्रयत्नात पराभूत झाल्यानंतर त्याने भोपाळला जाऊन तयारी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्यासाठी योग्य ठरला. येथे त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने तिसऱ्या प्रयत्नात प्रीलिम्स क्रॅक केले. त्यानंतर कोणताही धोका न पत्करता मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी तो दिल्लीला गेला. इथे मित्रांसोबत राहून तीन महिने रात्रंदिवस अभ्यास केला. परिणामी, त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आणि त्याने मुख्य परीक्षा आणि मुलाखत दोन्ही पास केले. अंतिम निकालात नीलेशने यूपीएससीमध्ये ९१६ रँकसह यश संपादन केले आणि त्यामुळे त्याचे नशीब आणि आर्थिक परिस्थिती दोन्ही बदलले.