सलील चिंचोरे
कामगिरीचे वार्षिक अवलोकन ही कर्मचार्‍यांसाठी स्वत:कडे मागे वळून बघण्याची उत्तम संधी असते. मानसशास्त्रानुसार कामगिरीचे विश्लेषण आणि सुधारणा करण्यासाठी केलेल्या विचारपूर्वक योजना प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

मार्च महिना येऊ घातला की कर्मचार्‍यांना एप्रिल महिन्यातील वेतन वाढ व प्रमोशनचे वेध लागतात. मार्च महिना हा वित्तीय वर्षातील अखेरचा महिना. मार्च महिन्याअखेरीस कंपनीच्या वित्तीय कामगिरीचा आढावा तर घेतला जातोच; तसेच कर्मचार्‍यांच्या वार्षिक कामगिरीचेही अवलोकन केले जाते. या पद्धतशीर मार्गाला परफॉर्मन्स अप्रेजल म्हणतात. कर्मचार्‍यांच्या वार्षिक अवलोकनाचे खास महत्त्व असते. कर्मचार्‍यांच्या कामगिरीनुसार त्यांना परफॉर्मन्स रेटिंग दिले जाते. यानुसार कर्मचार्‍यांसंबंधीचे वेतनवाढ, प्रमोशन, बदली, बोनस असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

म्हणून प्रत्येक कर्मचारी वर्षाअखेरीस आपल्या कामाला रंगरंगोटी करून तिला आकर्षक स्वरूपात बॉससमोर सादर करतो. परफॉर्मन्स अप्रेजल मीटिंगमध्ये आपल्या कामगिरीची बॉसवर छाप पाडून चांगले रेटिंग मिळवण्याचा हा प्रयत्न असतो. काही वेळेला हा प्रयत्न फलद्रूप होतो तर काहीदा तो चक्क फसतो. कारण बॉसने कर्मचार्‍यांबरोबर वर्षभर खांद्याला खांदा लावून काम केलेले असते.

कर्मचार्‍यांच्या कामातील खाचाकोचा, उणीवा, कर्मचार्‍यांचा स्वभाव बॉसला चांगला ठाऊक असतो. बॉसपुढे कितीही अतिशयोक्तीपूर्ण सादरीकरण केले तरी प्रत्येक कर्मचार्‍याला स्वत:च्या कामगिरीची यथार्थ जाणीव असते. पण त्याला रंगरंगोटी करण्याच्या नादात आपण त्यातील सत्व हरवून बसतो.

आज आपण याच गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघू. कामगिरीचे वार्षिक अवलोकन ही कर्मचार्‍यांसाठी स्वत:कडे मागे वळून बघण्याची उत्तम संधी असते. मानसशास्त्रानुसार कामगिरीचे विश्लेषण आणि सुधारणा करण्यासाठी केलेल्या विचारपूर्वक योजना प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

प्रत्येक कसलेला खेळाडू मॅच संपल्यावर आपल्या कोचबरोबर बसून मॅचचे व स्वत:च्या कामगिरीचे सखोल विश्लेषण करतो. त्यातून हाती येणार्‍या त्रुटींवर भर देऊन सराव करतो. त्यामुळे त्या खेळाडूला पुढच्या मॅचसाठी अधिक चांगले तयार होण्यासाठी मदत होते. बर्‍याचदा आपली कामगिरी फुगवून सांगण्याच्या नादात आपण स्वत:ला आरशात बघण्याचे विसरतो. यावेळेस परफॉर्मन्स रिव्ह्यूसाठी नेहमीचे पवित्रे सोडून तुम्ही स्वत:चे कठोर मूल्यमापन करा. त्यासाठी मदत म्हणून तुम्हाला मी काही प्रश्न देतो आहे. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वत:च स्वत:साठी शोधू शकता –

  • गेल्या वर्षात वर्षभरात कोणती टार्गेट्स मी पार केली? ते कशामुळे साध्य झाले?
  • कोणती टार्गेट्स पार करण्यात मला अपयश आले? त्याची कारणे काय?
  • गेल्या वर्षभरात मला कोणत्या अडचणी आल्या? त्यांचा सामना मी कसा केला?
  • माझा बॉस व इतर वरिष्ठांनी मला कोणता फीडबॅक दिला? त्याला मी कसा प्रतिसाद दिला?
  • माझ्या कामगिरीवर मी पूर्णत: समाधानी आहे का? नसल्यास त्यात कुठे कमतरता जाणवते आहे?
  • गेल्या वर्षभरात इतर सहकार्‍यांबरोबरचे संबंध कसे होते? ते सुधारण्यासाठी मी कोणते प्रयत्न केले?
  • गेल्या वर्षात मी काय नवीन शिकलो? त्याचा वापर मला पुढे कसा करता येईल?
  • येत्या एक-दोन वर्षातील माझी करिअरची उद्दिष्टे कोणती?
  • त्यासाठी येत्या वर्षात मला कोणत्या नवीन गोष्टी अनुभवायच्या अथवा शिकायच्या आहेत?
  • सर्व गोष्टींचा सारासार विचार करता पुढच्या वित्तीय वर्षात माझ्या कामाविषयी व करिअरविषयी मी (अ) कोणत्या गोष्टी नव्याने चालू करणार? (ब) कोणत्या गोष्टी अधिक सातत्याने करत राहणार? व (क) कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळणार?

या प्रश्नांवर विचार करून त्याची तुमच्या बॉसबरोबर मोकळेपणाने चर्चा करा. सहेतुक केलेली चर्चा निश्चितच पुढील मार्ग दर्शवेल. स्वत:च्या कामगिरीची तुलना तुमच्या सहकार्‍यांच्या कामगिरीशी करण्याचे टाळा.

बहुतांशी कर्मचार्‍यांना वाटत असते की आपल्या करिअरची सगळी जबाबदारी कंपनीची आहे. माझ्या भवितव्याचा विचार माझ्या बॉसने आणि कंपनीने करावा. मी पुढे काय करावे, कसे काम करावे हे त्यांनीच ठरवावे. ही धारणा संपूर्णपणे चुकीची आहे. आपल्या कामगिरीची व करिअरची जबाबदारी आपली आहे. विचार-विश्लेषण करून पुढील मार्गही आपल्यालाच आखायचा असतो. त्यासाठी कंपनी व कंपनीतील वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यायचे असते.

कंपनी तुमच्या करिअरच्या रथाचे साराथ्य करत असेल तरी तुमचे युद्ध तुम्हीच लढायचे व जिंकायचे असते.

chinchoresalil@gmail.com
(लेखक मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञ असून या क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत आहेत)