आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
एखाद्या नव्या प्रॉडक्टची म्हणजेच ‘उत्पादना’ची सुरुवात नेमकी कुठे होते? कारखान्यात, प्रयोगशाळेत की एखाद्या ग्राहकाच्या रोजच्या अडचणीत? आज जगातील अनेक विद्यापीठांमध्ये या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची पद्धत बदलते आहे. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आता केवळ इंजिनीअरिंगची प्रक्रिया राहिलेली नाही. माणसाला काय हवे आहे, तो एखादी वस्तू कशी वापरेल, तंत्रज्ञानाचा उपयोग त्यात कसा करता येईल, ती प्रत्यक्षात कशी तयार होईल आणि बाजारात तिचे स्थान काय असेल, या सगळ्यांचा एकत्र विचार करणारी नवी क्षेत्रे आकार घेत आहेत.

फिनलंडच्या आल्टो युनिव्हर्सिटीचे उदाहरण याबाबत विशेष लक्षवेधी आहे. तेथे इंजिनीअरिंग, इंडस्ट्रियल डिझाइन आणि बिझनेसचे विद्यार्थी विविध कंपन्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष समस्यांवर एकत्र काम करतात. अनेक महिन्यांच्या या प्रकल्पात समस्या समजून घेण्यापासून संकल्पना, नमुना, चाचणी आणि अखेरीस प्रत्यक्ष वापरता येणारं उत्पादन तयार करण्यापर्यंतचा प्रवास विद्यार्थी स्वतः करतात. ह्या विद्यापीठाच्या २०२५-२६ मधील प्रकल्पांमध्ये वैद्यकीय तंत्रज्ञान, पर्यावरण निरीक्षण, सर्क्युलर कन्स्ट्रक्शन, स्मार्ट उपकरणे आणि जैवसामग्री यांसारखे विषय होते.
आल्टोमध्ये यासाठी स्वतंत्र डिझाइन फॅक्टरी आहे. तेथे विद्यार्थ्यांना मशिनिंग, थ्री-डी प्रिंटिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर प्रोटोटायपिंग सुविधांचा वापर करता येतो. त्यांच्या आंतरशाखीय प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या अभ्यासक्रमात उत्पादनाची कल्पना प्रत्यक्ष काम करणार्या नमुन्यापर्यंत आणून ठेवण्यावर भर आहे.

अमेरिकेतील एमआयटीमध्येही प्रॉडक्ट डेवलपमेंट कडे अशाच बहुविषयक पद्धतीने पाहिले जाते. व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि इंडस्ट्रियल डिझाइनचे विद्यार्थी एकत्र येऊन एखादे उत्पादन किंवा सेवा संकल्पनेपासून नमुन्यापर्यंत विकसित करतात. ग्राहकांच्या गरजा, उत्पादनाची रचना, नमुना, चाचणी, उत्पादनाची पद्धत आणि पर्यावरणाचा विचार यांचा त्यात समावेश असतो.

जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापिठात तर ही वाट आणखी पुढपर्यंत घेऊन जाते. तेथील ‘लाँचपॅड’ पद्धतीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना एखादी कल्पना सुचवण्यापासून तिचा नमुना तयार करणे, चाचणी घेणे, किंमत ठरवणे, विक्री आणि वितरणापर्यंतचा प्रवास अनुभवायला मिळतो. प्रत्येक टीमला एखाद्या नव्या स्टार्टअपप्रमाणे काम करावे लागते. प्रोटोटाइप तयार करण्यासाठी स्वतंत्र निधीची सुविधाही विद्यार्थ्यांना उपलब्ध असते.

ह्या सर्व उदाहरणांमधून ‘प्रॉडक्ट डेव्हलपमेंट’च्या आसपास आज तयार होणाऱ्या नव्या क्षेत्रांचे चित्र स्पष्ट होईल. ह्युमन-सेंटर्ड डिझाइन, यूजर एक्स्पिरियन्स, सर्व्हिस डिझाइन, प्रोडक्ट मॅनेजमेंट, डिझाइन इंजिनीअरिंग, एआय आधारित उत्पादने, सस्टेनेबल डिझाइन आणि सर्क्युलर इकॉनॉमी ही त्यापैकी काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना आरोग्य, पर्यावरण, स्मार्ट उपकरणे किंवा नव्या जैवसामग्रीसारख्या विशिष्ट समस्यांवर काम करण्याचीही संधी मिळते. आल्टो विद्यापिठाच्या अलीकडच्या प्रकल्पांतून ही व्याप्ती किती विस्तारत आहे हे दिसून येते.

स्टॅनफर्डमध्ये तर आता एक्सटेंडेड रिअॅलिटी अर्थात विस्तारित वास्तव ह्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन तयार करण्यासाठीसुद्धा स्वतंत्र असा अभ्यासक्रम आहे. त्यात डिझाइन, तंत्रज्ञान आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांतील विद्यार्थी एकत्र काम करतात आणि मेटा, युनिटी, आयडिओसारख्या जगद्विख्यात कंपन्यांतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतात.

म्हणून ‘कोणती शाखा निवडायची’ हा केवळ प्रश्न आता उरला नाही. परदेशात शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी, आपल्याला माणसाची कोणती एखादी समस्या समजून घ्यायची आहे, कोणते नवे उत्पादन तयार करायचे आहे, तंत्रज्ञानाला कसे अधिक उपयोगी रूप द्यायचे आहे? किंवा एखादी कल्पना प्रॉडक्ट मध्ये कशी रुपांतरित करता येऊ शकेल? असे प्रश्न अधिक महत्त्वाचे ठरतील.

याआधी अनेक वेळा ह्या सदरामध्ये उल्लेख केला गेलेला मुद्दा पुन्हा एकदा ह्या निमित्तने अधोरेखित करावासा वाटतो आणि तो म्हणजे, भविष्यातील अनेक करिअर एकाच-एक शाखेत तयार होणार नाहीत. ही क्षेत्रे दोन किंवा तीन वेगवेगळ्या शाखांच्या संगमावर तयार होतील. आणि अशा ज्ञान-शाखांच्या संगमावर जाऊन शिकण्याची संधी शोधणे, हेच परदेशातील शिक्षणाचे खरे आकर्षण ठरू शकते.

टेक्स्टाइलपासून प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या दुनियेत भरारी

इचलकरंजीमध्ये टेक्स्टाइल मॅन्युफॅक्चरिंग शिकलेला एक विद्यार्थी पुढे अमेरिकेत प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे नेतृत्व करू लागतो. या दोन टोकांमध्ये त्याला मिळालेले शिक्षण, संशोधनाचा अनुभव आणि वेगवेगळ्या क्षेत्रांकडे पाहण्याची बदललेली दृष्टी दडलेली आहे. प्रसाद भातखंडे यांचा हा प्रवास परदेशातील शिक्षणाचा नेमका उपयोग कसा करून घेता येतो, याची रंजक कहाणी आहे.

शिवाजी विद्यापीठातून टेक्स्टाइल मॅन्युफॅक्चरिंगचा डिप्लोमा आणि मॅन-मेड टेक्स्टाइल टेक्नॉलॉजीची पदवी घेतल्यानंतर प्रसाद यांनी अलोक इंडस्ट्रीजमध्ये काम केले. उत्पादन विभाग आणि कॉर्पोरेट कार्यालयात काम करताना उत्पादन, ग्राहकांच्या गरजा आणि डिझाइन यांचा संबंध त्यांच्या लक्षात येऊ लागला. प्रसादला पुढे शिकायचे होते, पण त्यासाठी मोठे कर्ज घ्यायचे नव्हते.

त्याच वेळी त्यांच्या महाविद्यालयाचा अमेरिकेतील ईस्टर्न मिशिगन युनिव्हर्सिटीसोबत झालेला करार त्यांच्यासाठी मोठी संधी ठरला. निवड प्रक्रियेत चार विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड झाली आणि त्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाली.

ईस्टर्न मिशिगनमध्ये अॅपरेल, टेक्स्टाइल्स अँड मर्चंडायझिंगचा अभ्यास करताना त्यांना टेक्स्टाइल क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची संधी मिळाली. संशोधन सहाय्यक म्हणून तापमान नियंत्रित करणाऱ्या कापडावर काम करताना फेज चेंज मटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि आधुनिक चाचणी पद्धतींचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला. वर्गात शिकलेले तंत्रज्ञान प्रयोगशाळेत तपासण्याची आणि त्यातून प्रत्यक्ष उपयोगाच्या शक्यता शोधण्याची संधी त्यांना मिळाली.

तांत्रिक ज्ञानाला व्यवसायाच्या दृष्टीकोनाची जोड मिळावी यासाठी पुढे एमबीए करण्याची गरज त्यांना जाणवू लागली. ह्या शिक्षणादरम्यान बाजारपेठ, ग्राहक, खर्च आणि व्यवस्थापन यांचा विचार उत्पादनाच्या दृष्टीने करायला ते शिकले. त्यानंतर केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील प्रॉडक्ट मॅनेजमेंटच्या अभ्यासाने टेक्स्टाइल आणि व्यवसाय या दोन्ही अनुभवांना एकत्र आणण्याची एक नवी दिशा मिळाली.

आज सिंटासमध्ये सिनियर मॅनेजर, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणून ते नवीन उत्पादनाच्या कल्पनेपासून त्याच्या विकास आणि व्यावसायिकीकरणापर्यंतच्या प्रक्रियेत काम करतात. लवकर सुकणारा टॉवेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे वापरता येणारा अॅप्रन यांसारख्या उत्पादनांच्या विकासात त्यांचे तांत्रिक ज्ञान आणि ग्राहकांच्या गरजांबद्दलची समज ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कामी येतात.

परदेशातील शिक्षणामुळे प्रसाद यांना आपल्या तांत्रिक ज्ञानाकडे नव्या दृष्टीने पाहता आले आणि त्यातून प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात भरारी घेता आली.