आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये सार्वजनिक आरोग्य ही अत्यंत विकसित आणि प्रतिष्ठित शाखा मानली जाते. अमेरिका, ब्रिटन, आणि युरोपमधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना संशोधन आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करण्याची संधी मिळते.
करोनाच्या महामारीने जगाला अनेक धडे दिले. डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचार्यां नी लाखो रोग्यांवर उपचार केले. परंतु महामारीने एक मोठा प्रश्नही उभा केला. आजारांवर उपचारांबरोबरच त्यांचा प्रसार रोखणे, समाजाचे आरोग्य सुधारणे याची जबाबदारी कोणी घ्यायची? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘सार्वजनिक आरोग्य’ ही शाखा.
वैद्यकीय उपचार-शास्त्र एखाद्या व्यक्तीच्या आजारावर लक्ष केंद्रित करते. सार्वजनिक आरोग्य मात्र संपूर्ण समाजाच्या आरोग्याचा विचार करते. एखाद्या रुग्णाला डेंग्यू झाला तर डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात. पण डेंग्यूचा प्रसार का होत आहे, तो कसा थांबवायचा आणि भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कोणती उपाय-योजना करायची याचा अभ्यास सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ करतात.
पदव्युत्तर स्तरावरील सार्वजनिक आरोग्य अभ्यासक्रमामध्ये रोगांचा प्रसार, आरोग्य धोरणे, आरोग्य व्यवस्थापन, संशोधन आणि जागतिक आरोग्यविषयक प्रश्नांचा अभ्यास केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि मानसिक आरोग्य यांसारखे विषयही महत्त्वाचे ठरत आहेत.
ही शाखा बहु-विद्याशाखीय आहे. आरोग्याच्या समस्या केवळ जैविक नसतात. सामाजिक, आर्थिक, व्यवस्थापकीय आणि तांत्रिक घटकही त्यामागे असतात. त्यामुळे वैद्यकीय शाखांबरोबरच समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, सांख्यिकी, व्यवस्थापन आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही येथे मोठ्या संधी उपलब्ध आहेत. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये सार्वजनिक आरोग्य ही अत्यंत विकसित आणि प्रतिष्ठित शाखा मानली जाते. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना संशोधन, क्षेत्रीय प्रकल्प, धोरण विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे जागतिक आरोग्यविषयक प्रश्न आणि विविध देशांतील आरोग्य व्यवस्थांचा अनुभव मिळतो.
या शाखेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअर संधीही विविध प्रकारच्या असतात. सरकारी आरोग्य विभाग, आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधन केंद्रे, स्वयंसेवी संस्था, रुग्णालय व्यवस्थापन, आरोग्य सल्लागार संस्था, आरोग्य तंत्रज्ञान कंपन्या आणि आरोग्य माहिती विश्लेषण क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य पदवीधरांना संधी मिळतात. भारतातही राष्ट्रीय आरोग्य अभियान, डिजिटल आरोग्य उपक्रम, मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन यांमुळे या क्षेत्रातील मागणी वाढत आहे.
भविष्यातील साथी, प्रदूषण, मानसिक आरोग्य, कुपोषण आणि हवामान बदल यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कुशल तज्ञांची गरज वाढणार आहे. विज्ञान, समाज आणि धोरणनिर्मिती यांच्या संगमावर उभे असलेले हे क्षेत्र समाजात व्यापक बदल घडवू इच्छिणार्याे विद्यार्थ्यांसाठी एक अर्थपूर्ण करिअर पर्याय ठरू शकते.
समाजस्वास्थ्याची शोधयात्री : गार्गी सपकाळ
बुलढाण्याच्या गार्गी सपकाळने भारती विद्यापीठातून दंतवैद्यक शास्त्राचे (बीडीएस) शिक्षण पूर्ण केले आणि काही काळ क्लिनिकल प्रॅक्टिसही केली. पण त्याबरोबरच ‘सर्च’च्या ‘निर्माण-एकलव्य’ उपक्रमात समन्वयक म्हणून ती सामील झाली. एचआयव्ही प्रतिबंधक कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करताना ग्रामीण समाजात मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे तिला जाणवले.
मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांना मदत करण्यासाठी २०२२ मध्ये ‘दवा-दुवा प्रकल्प’ गार्गीने सुरू केला. मानसिक आरोग्याचा प्रश्न केवळ वैद्यकीय नाही. तो सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्य व्यवस्थेशी निगडित आहे, हे या प्रकल्पामध्ये काम करताना गार्गीला स्पष्ट झाले. या प्रश्नांचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी तिने ‘सार्वजनिक आरोग्य’ क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
ब्रिटन सरकारच्या प्रतिष्ठेच्या चेवनिंग स्कॉलरशिपसाठी तिने अर्ज केला. अर्ज प्रक्रियेत शैक्षणिक यशाइतकेच नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि भविष्यवेधी दृष्टीकोन महत्त्वाचा ठरला. ‘‘माझ्या दवा-दुवा प्रकल्पातील अनुभवांनी मला माझे ध्येय स्पष्टपणे मांडण्यास मदत केली,’’ असे गार्गी म्हणते.
२०२४ मध्ये गार्गीची निवड चेव्हनिंग शिष्यवृत्तीसाठी झाली. त्यानंतर तिने लंडनमधील जगप्रसिद्ध ‘लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन’ येथे मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. सार्वजनिक आरोग्य, आरोग्य धोरणे आणि जागतिक आरोग्य व्यवस्थांचा अभ्यास करताना तिला विविध देशांतील अनुभवांतून शिकण्याची संधी मिळाली.
स्थानिक समस्या जागतिक संशोधनाच्या व्यासपीठावर नेणे हे सुद्धा परदेशी शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे गर्गी मानते.
आज गार्गी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या ( WHO ) राष्ट्रीय संस्थेत संशोधन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. संशोधन, धोरण आणि समाज यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याचे काम ती करत आहे.
सार्वजनिक आरोग्य : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणार्याण संस्था
हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (अमेरिका)
जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (अमेरिका)
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (ब्रिटन)
इम्पिरियल कॉलेज लंडन (ब्रिटन)
युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न स्कूल ऑफ पॉप्युलेशन अँड ग्लोबल हेल्थ (ऑस्ट्रेलिया)
या संस्थांमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना जागतिक आरोग्य संघटना
( हऌड), संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संस्था, संशोधन केंद्रे आणि आरोग्य धोरणविषयक संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
chinchoresalil@gmail.com
(लेखक करिअर समुपदेशक आहेत.)
