स्पर्धा परीक्षा का द्यायची आहे, याविषयी प्रश्न पडायला पाहिजे, त्याची स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परीक्षेच्या अभ्यासात रूची निर्माण होणार नाही. ही नोकरी नाही तर सेवा आहे. सेवाभाव जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत अभ्यास चांगला होणार नाही… सांगताहेत संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत.

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम जवलगेरा या मागासलेल्या गावात जन्मलेल्या आणि बालपण गेलेल्या जी. श्रीकांत यांच्या आई-वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. तसेच घरी थोडीफार शेती होती. दुर्गम ठिकाणी गाव असल्याने त्यांना दुकानात, शेतात काम करावे लागायचे. मात्र, त्यांनी त्याही स्थितीत शिक्षणाची आवड जोपासली होती.

घरच्या परिस्थितीमुळे दहावी पास झाल्यावर त्यांना नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. अशातच त्यांना भारतीय रेल्वेतर्फे चालवल्या जाणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. यासाठी दहावी उत्तीर्ण एवढी पात्रता पुरेशी होती. त्याच वर्षी त्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्यांनी नांदेड रेल्वे विभागात ‘वोकेशनल कोर्स ईन रेल्वे कमर्शियल’ हे २ वर्षांचं प्रशिक्षण घेतले. सकाळी प्रशिक्षण आणि दुपारी नोकरी असे या कोर्सचे स्वरूप होते. यशस्वी प्रशिक्षणानंतर ऑक्टोबर २००२ मध्ये श्रीकांत यांची पूर्णा येथे तिकीट कलेक्टर म्हणून नेमणूक झाली.

सेवाभाव जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत तुम्ही उत्तम काम करू शकत नाही हेही श्रीकांत यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा >>>भारतीय वायू दलामध्ये नोकरीची संधी! मिळेल इतका पगार, जाणून घ्या पात्रता निकष अन् शेवटची तारीख

स्पर्धा परीक्षेची तयारी

श्रीकांत यांची रेल्वेतील नोकरी, शिक्षणही सुरूच होते. पण तरीही ते अस्वस्थ होते. ही अस्वस्थता काही अंशी दूर झाली ती त्यांच्या मित्राने कमलने दाखवलेल्या मार्गामुळे. कमल यांनी त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेविषयी माहिती दिली. ते स्वत:ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. त्याच्या मार्गदर्शनानुसार श्रीकांत यांनी सहा महिने बिन पगारी रजा घेऊन दिल्लीतल्या एका स्पर्धा परीक्षाविषयक शिकवणी वर्गात नाव नोंदवले.

सेवाभाव हवा

स्पर्धा परीक्षेनंतर मिळणारी पदे ही नोकरी नाही तर सेवा आहे. तसा सेवाभाव जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत तुम्ही उत्तम काम करू शकत नाही हेही श्रीकांत यांनी आवर्जून सांगितले. आयएएसचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नेमणूक नांदेड येथे सहायक आयुक्त म्हणून झाली. त्याठिकाणी नांदेड सेफ सिटी, जे एनएन यु आर एम चे कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान आदी महत्त्वपूर्ण कामे केली. त्यानंतर त्यांची नेमणूक झालेल्या ठिकाणी ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अंगणवाड्यांची निर्मिती, डिजिटल शाळा, कुमठेकर ब्लॉकवर आधारित ज्ञानदायी रचना पॅटर्न, त्यांनी सुरू केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, मिशन दिलासा उल्लेखनीय होते. सर्व करताना त्यांच्यात रुजलेला सेवाभाव कामी आला.

हेही वाचा >>> TISS Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; लगेच करा अर्ज

मोठी स्वप्ने पहा…

यूपीएससीच्या उमेदवारांनी मग ते पुरुष असोत की स्त्रिया, कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी. गरिबीचा बाऊ न करता जिद्दीने प्रयत्न करावेत. माझ्या सारखा तरुण कधी आयुक्त होईल, असे कुणी भाकीत केले असते. तर कुणी विश्वास ठेवला नसता. म्हणजे घरातून शिक्षणाची काही पार्श्वभूमी नाही. आई-वडिलांचे फारसे शिक्षण नाही असे असताना… म्हणूनच मोठी स्वप्न बघावीत. स्वप्नपूर्तीसाठी जिवाचे रान करावे. आपल्या समोर काही उदाहरण नसेल तर आपण स्वत:चेच उदाहरण इतरांसाठी निर्माण करावे, असा सल्ला ते देतात. कोणी तुम्हाला चमच्याने भरवणार नाही. तुम्हालाच मूळापर्यंत पोहोचावे लागेल. मेहनत तुम्हालाच करावी लागणार आहे. मात्र, जर तुम्ही स्वप्न स्पर्धा परीक्षा देण्याचे त्यात यश मिळवण्याचे पाहिले असेल तर शिक्षण झाल्या झाल्या प्रयत्न करणे जास्त उचित ठरेल, कारण जितके लवकर प्रयत्न कराल, तितकेच लवकर बाहेरही पडता येईल. मुख्य म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा जीवनात तरी अपयशी ठरत नाही असे श्रीकांत यांना वाटते. कारण तुम्ही उत्तम नागरिक तर बनताच, शिवाय स्पर्धा परीक्षा सोडून ज्या क्षेत्रात जाल त्याचे बारकावे ग्रहण करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होते, असे श्रीकांत यांना वाटते.

का आणि कसं याचा शोध घ्यायला हवा…

श्रीकांत हे पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र पुढच्या परीक्षेत त्यांना यश मिळाले नाही. या परीक्षेनंतर स्पर्धा परीक्षा का द्यायची आहे, याविषयी प्रश्न पडायला पाहिजे, त्याची स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परीक्षेच्या अभ्यासात रूची निर्माण होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. नव्हे त्या प्रश्नाची स्पष्टता त्यांना आली आणि मग मात्र त्यांना अभ्यासाचा आनंद घेत पुढे जाता आले. तणावविरहीत अभ्यास करता आला. जी. श्रीकांत सांगतात, भूगोल असेल किंवा इतिहास, चालू घडामोडी किंवा नागरिकशास्त्र तुम्हाला तो समजून घेणे तर सोपे झालेच, पण त्याचा वापर मी अधिकारी झाल्यावर कसा करू शकतो याची विचारशृंखलाही तयार होत गेली. ज्याचा फायदा त्यांना पुढे प्रत्यक्ष काम करताना झाला. विचारांत स्पष्टता आल्यानंतर ते दुसऱ्यांदाच त्यांना परीक्षेत यश मिळाले.

दूरस्थ शिक्षणाचा पर्याय

दूर पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये श्रीकांत यांची तिकीट कलेक्टर म्हणून ड्युटी लागत असे. त्यामुळे त्यांना संपूर्ण भारताचा कानाकोपरा पाहता आला. लोकांच्या स्वभावाचे अनेक पैलू या वेळी त्यांनी पाहिले. समाजातील विषमतेमुळे श्रीकांत अस्वस्थ व्हायचे. ही विषमता दूर करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, असे त्यांना वाटायचे. त्यासाठी आणखी शिक्षण गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. नोकरीची गरज असल्यामुळे नोकरी सोडणेही शक्य नव्हते. त्यांनी आंध्र प्रदेशातील उस्मानिया विद्यापीठाच्या दूर शिक्षण विभागाच्या बी. कॉमच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिकीट कलेक्टरची नोकरी करतच त्यांनी आपली पदवी पूर्ण केली. या पदवीनंतर त्यांनी एम. कॉम.साठी प्रवेश घेत पहिले वर्ष देखील पूर्ण केले.

शब्दांकन : प्रज्ञा तळेगावकर