अ‍ॅड. प्रवीण निकम

मित्रांनो, उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्यातील अनेकांच्या वाटा खुंटतात जेव्हा विषय येतो आर्थिक अडचणींचा. आर्थिक अडचणींचा सामना करत शिकण्याची धडपड करणारे तुम्ही एकटे नाहीत असे हजारो आहेत आणि या हजारोंच्या पाठीशी प्रेरणा स्रोत म्हणून आहेत ते म्हणजे आपले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचे बालपण शिक्षणासाठीची तळमळ यासाठी त्यांनी सोसलेले कष्ट आपल्या सर्वाना माहीत आहेच. बाबासाहेबांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना सयाजीराव गायकवाड व पुढे जाऊन कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनी शिष्यवृत्ती दिली ज्यामुळे बाबासाहेबांचे परदेशी शिक्षण पूर्ण होऊ शकले.

आजच्या लेखात हे सर्व सांगण्याचे कारण एकच की, डॉ. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या हे आपल्या सर्वानाच माहीत आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे उच्च शिक्षणाची संधी मिळविणे हे वंचित बहुजन समाजासाठी अधिक कठीण होऊन जाते. परंतु बदलत्या काळानुसार भारतरत्न बाबासाहेबांच्या परदेशी उच्च शिक्षणाच्या प्रवासाला आदर्शवत मानत शासकीय पातळीवर देखील यावर काम करण्यात आले. ज्या सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीई अर्थात आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था अशा विविध शासनाच्या संस्थांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. जसे की, इतरमागास बहुजन कल्याण विभागातर्फे विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. या शिष्यवृत्ती अंतर्गत परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील निर्धारित राखीव प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींची परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी इच्छुक व पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. त्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे.

त्यासाठीचा अर्ज विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून डाउनलोड करायचा आहे. यानंतर अर्ज परिपूर्ण भरून व आवश्यक कागदपत्रे जोडून इतरमागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक यांच्या नावाने पुणे येथील पत्त्यावर पाठवायचा आहे. त्यासाठी ३० जूनच्या सायंकाळी सव्वा सहापर्यंतची मुदत आहे. दरम्यान, शिष्यवृत्तीच्या एकूण जागांपैकी ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. तसेच अर्जदार विद्यार्थ्यांना अटी- शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत क्यूएसमध्ये दोनशेच्या आतील असणे आवश्यक आहे. याशिवाय उत्पन्नाची व कागदपत्रविषयक अटींचेही पालन करावे लागणार आहे. यामध्ये विद्यापीठाने प्रमाणित केलेली. शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम अदा केली जाईल. विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च विभागातर्फे केला जाईल. वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या किंवा केंद्र सरकारच्या ‘डीओपीटी’ विभागाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे किंवा राज्य शासनाने निश्चित केल्याप्रमाणे अदा केला जाईल. याशिवाय विद्यार्थ्यांस परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारतात परतण्यासाठी नजीकच्या मार्गाने विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय राहणार आहे. काही वंचित बहुजन वर्गासाठी असणाऱ्या या शिष्यवृत्तीचा लाभ अनेक विद्यार्थी घेतील अशी आशा करतो. यासाठीची अंतिम मुदत ३० जूनच्या सायंकाळी सव्वा सहापर्यंतची आहे हे विसरू नका. वंचित बहुजन वर्गासाठी असणाऱ्या सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीई अर्थात आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था या शिष्यवृत्त्यांची माहिती आपण पुढील काही लेखात करून घेऊच तूर्तास इथेच थांबू. परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना आणि शासन नियम शिष्यवृत्तीच्या पात्रतेच्या अन्य अटी व शर्ती याच्या सविस्तर माहितीसाठी पुढील दिलेल्या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊ शकता.