करिअरच्या दृष्टिकोनातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाची निवड करताना विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात नेहमीच संभ्रम पाहायला मिळतो. अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे वेध लागतात. परीक्षेच्या निकालानंतर अनेकजण हे करिअरच्या संधींबाबत तसेच निरनिराळ्या अभ्यासक्रमांबाबत विविध पर्यायांबाबत माहिती देत असतात, त्यामुळे विद्यार्थी हे गोंधळलेल्या मन:स्थितीत सापडतात. परंतु करिअरच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम स्वत:ची पडताळणी व मूल्यांकन करून तुमचे मन हे तुम्हाला नेमके काय सांगत आहे, ते व्यवस्थितपणे जाणून घ्या. स्वत:मधील विविध कौशल्यांचा शोध घ्या आणि त्यानंतर स्वत:च्या मनाप्रमाणे क्षेत्रनिवड करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला सुरुवात करा. भारताप्रमाणे परदेशातही विविध विषयांवर आधारित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी स्वरूपातील अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे निरनिराळ्या विषयांवर आधारित विविध अभ्यासक्रमांचे पर्याय जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच, परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्यापूर्वी तुमचे नेमके ध्येय काय आहे, नेमके साध्य काय करायचे आहे हे निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची ध्येय ही मर्यादित स्वरूपातील आणि टप्प्याटप्प्यात पूर्ण होणारी असतील, तरी काही हरकत नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने पूर्वनियोजन करून ध्येयपूर्तीसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेणे महत्त्वपूर्ण ठरते. तसेच, तुमची आवड आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन तुम्ही ज्या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक आहात, त्याची एक यादी करा. जेणेकरून अभ्यासक्रमाची निवड करताना मदत होईल. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणे आणि करिअरच्या दृष्टिकोनातून स्वत:चा कृती आराखडा तयार करून तो अंमलात आणणे महत्त्वाचे आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत दहावी व बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे वेध लागतात. त्यामुळे, अकरावी व बारावीचे शिक्षण घेत असतानाच त्या दृष्टीने तयारी करणे गरजेचे आहे. तुमचे मुख्य विषय ठरवा, विविध विद्यापीठांबाबत संकेतस्थळांवरून माहिती जाणून घ्या, इंटर्नशिप करून अनुभव गोळा करा, सॅट (एसएटी) व अॅक्ट (एसीटी) द्या, तुमची कौशल्ये विकसित करणे सुरु ठेवा, विविध कार्यशाळा व शिबिरांमध्ये जाऊन कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घ्या. विविध अभ्यासक्रमांची उपलब्धता आणि सर्वसमावेशक शैक्षणिक अनुभव, प्रत्यक्ष प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढविणे, जबाबदारीची जाणीव मनात ठेवून वावरणे, जागतिक नागरिक : आंतरसांस्कृतिक विकास आणि परदेशातील संस्कृती जाणून घेणे, दृष्टिकोन आणि संवेदना, अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांचा वापर, करिअरच्या विविध संधी, छोटेखानी वर्ग आणि महाविद्यालयीन प्रशासनाचा पाठिंबा, विविधता आदी गोष्टींबाबत माहिती मिळण्यासह विविध फायदे हे परदेशात शिकल्यामुळे होतात. तसेच, परदेशात शिक्षणासाठी जाण्यापूर्वी आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करणे गरजेचे आहे. उत्तम शिष्यवृत्ती योजना असणाऱ्या विद्यापीठाची निवड, शैक्षणिक कर्ज, सरकारी शिष्यवृत्ती असणाऱ्या अभ्यासक्रमांची निवड, अनेक परदेशी विद्यापीठे ही दुसऱ्या देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करतात आणि संबंधित अभ्यासक्रम राबवितात ते जाणून घ्या, शक्य झाल्यास अर्धवेळ नोकरी करा या सर्व गोष्टी केल्यास परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आर्थिक अडचण येणार नाही.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self assessment is essential before going for higher education abroad bakhtawar krishnan amy
First published on: 18-06-2024 at 09:53 IST