सामना सुरू होण्याच्या अगदी अचूक क्षणी मैदानावर फ्लडलाइट्स पेटतात, तेव्हा सर्व काही सुनियोजित वाटते. परंतु यामागे ज्याचेे अथक परिश्रम असतात – तो म्हणजे क्रीडा स्पर्धा संचालन व्यवस्थापक बाहेरून पाहताना एखादी क्रीडा स्पर्धा अगदी सोपी वाटते – एक सामना, उत्सुक गर्दी आणि एक स्कोअरबोर्ड! परंतु त्यामागील प्रत्यक्ष कामकाज अत्यंत गुंतागुंतीचे असते.
एक स्पोर्ट्स इव्हेंट ऑपरेशन्स मॅनेजर खालील जबाबदार्या सांभाळतो:
० क्रीडांगणाची पूर्वतयारी
० वेळापत्रक आणि स्पर्धाची रूपरेषा
० खेळाडूंची येण्या-जाण्याची व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स
० क्रीडा साहित्याची मांडणी
० सुरक्षा आणि आपत्कालीन नियोजन
० प्रशिक्षक, पंच आणि अधिकार्यांशी समन्वय
० गर्दी व्यवस्थापन
० तंत्रज्ञान आणि थेट प्रक्षेपण साहाय्य
० व्हेंडर्स आणि प्रायोजकांशी ताळमेळ
० मैदानावरील कर्मचार्यांचे नेतृत्व आणि व्यवस्थापन
शालेय क्रीडा स्पर्धांपासून ते आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपपर्यंत, प्रत्येक यशस्वी स्पर्धेचा मॅनेजरच मुख्य कणा असतो.
नियोजन : या कामाचा आत्मा
सामन्याची पहिली शिट्टी वाजण्याच्या कित्येक महिने आधीपासून ऑपरेशन्स मॅनेजरचे काम सुरू होते.
० खेळाडू स्टेडियममध्ये कोणत्या मार्गाने प्रवेश करतील आणि बाहेर पडतील?
० वॉर्म-अप झोन कुठे असेल आणि क्रीडा साहित्याची वाहतूक कशी होईल?
० आपत्कालीन वैद्यकीय पथके कुठे तैनात असतील?
० प्रेक्षक सुरक्षितपणे कसे फिरतील?
० सामने वेळेवर सुरू होऊन नियोजित वेळेत संपतील का?
० हवामान किंवा तांत्रकि अडचणींमुळे उशीर झाल्यास पर्यायी योजना कोणती?
या कामात प्रत्येक बारीक तपशील महत्त्वाचा असतो. एका लहानशा चुकीमुळे संपूर्ण स्पर्धेचा खेळखंडोबा होऊ शकतो.
भारतीय संदर्भ आणि वाढती मागणी
भारतात दरवर्षी आयपीएल, आयएसएल, प्रो-कबड्डी यांसारख्या भव्य व्यावसायिक लीगपासून ते हजारो राष्ट्रीय स्पर्धा, मॅरेथॉन आणि आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सव आयोजित केले जातात. त्यामुळे क्रिकेट स्टेडियम्स, फुटबॉल क्लब्स आणि ॲथलेटिक्स फेडरेशन्समध्ये प्रशिक्षित ऑपरेशन्स मॅनेजर्सची मागणी प्रचंड वाढली आहे.
हे क्षेत्र केवळ एलिट स्पर्धांपुरते मर्यादित नसून शाळांचे क्रीडा दिन, कॉर्पोरेट क्रीडा स्पर्धा, स्थानिक मॅरेथॉन आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही अशा व्यवस्थापकांना मोठी संधी उपलब्ध आहे.
स्पोर्ट्स इव्हेंट ऑपरेशन्स मॅनेजर कसे बनावे?
० ११ वी आणि १२ वी (कोणतीही शाखा) :
कला, वाणिज्य किंवा विज्ञान अशा कोणत्याही शाखेतून १२ वी करू शकतात. नेतृत्व, संवाद आणि समस्या निवारणाची आवड असणे गरजेचे आहे.
० पदवी शिक्षण :
बारावीनंतर खालीलपैकी एका अभ्यासक्रमात पदवी मिळवा :
* बीबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट (क्रीडा व्यवस्थापन)
* बी.ए. इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट / इव्हेंट मॅनेजमेंट
* बी.कॉम (स्पोर्ट्स इलेक्टिव्ह विषयांसह)
* बी.एस.सी इन स्पोर्ट्स सायन्स (ऑपरेशन्स मॉड्यूल्ससह)
० पदव्युत्तर शिक्षण :
उच्च पदांसाठी खालील पर्याय निवडा:
* एमबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट
* एम.ए. इन इव्हेंट मॅनेजमेंट
* पी.जी. डिप्लोमा इन स्पोर्ट्स ऑपरेशन्स / स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन
० आवश्यक कौशल्ये :
नियोजन आणि वेळापत्रक व्यवस्थापन, संकट निवारण, लॉजिस्टिक्स समन्वय, वेळेचे व्यवस्थापन, उत्कृष्ट संवाद आणि तंत्रज्ञानाची मूलभूत जाण.
० प्रत्यक्ष कामाचा अनुभव :
क्रीडा अकादमी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, स्टेडियम्स, क्रीडा लीग (आयपीएल / आयएसएल फ्रँचायझी) किंवा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये इंटर्नशिप करून प्रत्यक्ष काम शिकणे हा यशाचा राजमार्ग आहे.
स्पोर्ट्स इव्हेंट ऑपरेशन्स मॅनेजर हा प्रत्येक सामना वेळेवर सुरू करणारा, खेळाडूंना पूर्ण सहकार्य मिळवून देणारा आणि चाहत्यांना अविस्मरणीय अनुभव देणारा मुख्य सूत्रधार असतो. तो गोंधळात सुसूत्रता आणतो, गुंतागुंतीला शिस्तबद्ध चौकट देतो आणि दबावाच्या क्षणी शांतपणे नेतृत्व करतो. खेळातील उत्कृष्टतेच्या प्रवासात, कागदावरील नियोजनाचे रूपांतर मैदानावर प्रत्यक्ष कृतीत करणारा तो पडद्यामागचा खरा ‘इंजिन’ आहे.
सर्व घटकांचा परस्पर ताळमेळ आणि सुरक्षा
एका क्रीडा स्पर्धेत खेळाडू, प्रशिक्षक, पंच, वैद्यकीय पथके, सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक, माध्यम प्रतिनिधी, प्रायोजक आणि हजारो चाहते सहभागी असतात. या सर्व घटकांमध्ये संवाद आणि समन्वय राखण्याचे काम ऑपरेशन्स मॅनेजर करतो. जर सामना पावसामुळे थांबला, तर संघ, प्रेक्षक, तिकिटिंग विभाग आणि टीव्ही ब्रॉडकास्टर्सना तात्काळ सूचना देणे ही त्यांचीच जबाबदारी असते. यासोबतच सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असते. आपत्कालीन निर्गमन मार्ग, चेंगराचेंगरी टाळण्यासाठी गर्दी नियंत्रण, अग्निसुरक्षा आणि वैद्यकीय
सुविधा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहेत की नाही, हे ते काटेकोरपणे तपासतात.
तंत्रज्ञान आणि थेट प्रक्षेपण साहाय्य
आधुनिक खेळ तंत्रज्ञानावर प्रचंड अवलंबून आहेत. डिजिटल स्कोअरबोर्ड योग्य चालतात का, टायमिंग सिस्टीम अचूक आहे का, कॅमेरे योग्य कोनात बसवले आहेत का, ब्रॉडकास्ट पथकांना अखंड वीज आणि हाय-स्पीड इंटरनेट मिळते आहे का, तसेच ‘डीआरएस’ किंवा ‘व्हिडिओ रिव्ह्यू सिस्टीम’ कार्यरत आहेत का, हे पाहण्यासाठी ऑपरेशन्स मॅनेजर तंत्रज्ञान पथकांसोबत सतत काम करतो.
nikhil@prophysio.co.in (लेखक क्रीडा शास्त्रज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट आहेत.)
