खेळाडूंच्या विविध कौशल्ये आणि क्षमता आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला शास्त्रीय आकार देणारा आणि आधुनिक क्रीडा जगतात झपाट्याने पुढे येणारा तज्ज्ञ म्हणजे ‘स्किल्स ॲक्विझिशन स्पेशालिस्ट’ (कौशल्य संपादन तज्ज्ञ), ज्याला ‘मोटर लर्निंग कोच’ म्हणूनही ओळखले जाते.
क्रीडा क्षेत्रात केवळ उपजत प्रतिभा असणे पुरेसे नसते. एका सामान्य खेळाडूचा महान खेळाडूपर्यंत होणार्या प्रवासात अनेक कौशल्ये आणि क्षमता आत्मसात कराव्या लागतात. नवीन कौशल्ये वेगाने शिकण्याची, दबावाखाली स्वत:ला बदलण्याची आणि अनपेक्षित वातावरणात सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता अंगी बाणवावी लागते. खेळाडूंच्या याच शिकण्याच्या प्रक्रियेला शास्त्रीय आकार देणारा आणि आधुनिक क्रीडा जगतात झपाट्याने पुढे येणारा तज्ज्ञ म्हणजे ‘स्किल्स ॲक्विझिशन स्पेशालिस्ट’ (कौशल्य संपादन तज्ज्ञ), ज्याला ‘मोटर लर्निंग कोच’ म्हणूनही ओळखले जाते.
कौशल्य शिकण्यामागचे विज्ञान
कौशल्य संपादन करणे म्हणजे केवळ एकाच प्रकारच्या सरावाची शेकडो वेळा पुनरावृत्ती करणे नव्हे. मानवी शरीर हालचाली कशा शिकते, मेंदू माहितीवर कशी प्रक्रिया करतो आणि बदलत्या परिस्थितीनुसार खेळाडू स्वत:ला कसे जुळवून घेतात, याचे हे एक शास्त्र आहे.
एक स्किल्स ॲक्विझिशन स्पेशालिस्ट खालील घटकांचा सखोल अभ्यास करतो:
मोटर लर्निंग : शरीराच्या स्नायूंच्या हालचाली शिकण्याची पद्धत.
अँटिसिपेशन आणि डिसिजन मेकिंग :
खेळताना वेगाने निर्णय घेण्याची क्षमता.
इकोलॉजिकल डायनॅमिक्स: आजूबाजूच्या वातावरणाचा हालचालींवर होणारा परिणाम.
त्यांचे उद्दिष्ट अगदी साधे असते – खेळाडूंना नवीन कौशल्ये वेगाने शिकवणे, ती दीर्घकाळ लक्षात ठेवण्यास मदत करणे आणि प्रत्यक्ष सामन्यात दबावाखाली त्यांचा अचूक वापर करून घेणे.
जुन्या पद्धतींच्या पलीकडचा सराव
पारंपरिक प्रशिक्षणात अनेकदा एकाच प्रकारच्या सरावावर भर दिला जातो. परंतु आधुनिक संशोधन सांगते की, जेव्हा खेळाडूंचा सराव आव्हानात्मक आणि अनपेक्षित असतो, तेव्हाच ते जास्त शिकतात . हे तज्ज्ञ खेळाडूच्या शरीरासोबतच त्याच्या मेंदूलाही आव्हान देणारे सराव वातावरण तयार करतात. पुढील उदाहरणे पाहा –
क्रिकेट : फलंदाजाला वेगवेगळ्या कोनातून, वेगवेगळ्या वेगाने आणि बदलत्या क्षेत्ररक्षणानुसार चेंडूचा सामना करायला लावणे.
फुटबॉल : वेळेचे बंधन आणि बचावपटूंच्या गराड्यात अचूक पास देण्याचा सराव करून घेणे.
बॅडमिंटन : शटलच्या नेहमीच्या मार्गात मुद्दाम बदल करून खेळाडूची अंदाज लावण्याची क्षमता सुधारणे.
दबावाखाली कामगिरी करणे
शांत वातावरणात शिकलेली कौशल्ये अनेकदा प्रत्यक्ष सामन्याच्या दबावाखाली कोलमडतात. म्हणूनच, हे तज्ज्ञ सरावादरम्यान खेळाडूंना विविध आव्हाने देतात, जसे की वेळेचा दबाव, जागेची मर्यादा, प्रतिस्पध्र्यांचे दडपण, थकवा आणि मैदानावरील गोंगाट.
यामुळे खेळाडूंचे कौशल्य इतके पक्के होते की ते अत्यंत कठीण प्रसंगातही अचूक कामगिरी करतात. ते मॅच पॅटर्न समजून घेण्यासाठी ‘परफॉर्मन्स ॲनालिस्ट’सोबत आणि हालचालींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘बायोमेकॅनिस्ट’ सोबत मिळून काम करतात.
वाढती व्याप्ती
भारतात अजूनही पारंपरिक पद्धतीनेच सराव करून घेण्यावर भर दिला जातो, जिथे निर्णयक्षमता वाढवण्यावर कमी लक्ष असते. मात्र, आता क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि हॉकीमधील नामांकित अकादमी आधुनिक ‘मोटर-लर्निंग’ तत्त्वांचा अवलंब करू लागल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि युरोपमध्ये प्रत्येक संघासोबत पूर्णवेळ ‘स्किल्स ॲक्विझिशन स्पेशालिस्ट’ असतात. भारतातही पुढील दशकात या क्षेत्राची मागणी वेगाने वाढणार आहे. हे क्षेत्र केवळ प्रोफेशनल्ससाठी नाही, तर पायाभूत कौशल्ये शिकणारे तरुण खेळाडू, तंत्र सुधारू पाहणारे हौशी नागरिक आणि दुखापतीनंतर पुन्हा हालचाली शिकणारे लोक या सर्वांसाठी उपयुक्त आहे.
स्किल्स ॲक्विझिशन स्पेशालिस्ट हे खेळाडूंना केवळ कठोर परिश्रम करायला लावत नाहीत, तर त्यांना ‘स्मार्ट’ पद्धतीने सराव करायला शिकवतात. ते तंत्राचे रूपांतर कौशल्यात आणि सरावाचे रूपांतर थेट मैदानावरील सर्वोत्तम कामगिरीत करतात. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेच्या प्रवासात, हालचालींना हुशारीचे कोंदण देणारे हे पडद्यामागचे खरे शिल्पकार आहेत.
‘स्किल्स ॲक्विझिशन स्पेशालिस्ट’ कसे बनावे?
० शालेय शिक्षण : ११ वी आणि १२ वी मध्ये विज्ञान शाखा निवडणे शिफारसीत आहे. जीवशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचा येथे मोठा फायदा होतो.
० पदवी शिक्षण : १२ वी नंतर तुम्ही खालीलपैकी एका विषयात
पदवी घेऊ शकता :
’ बीएससी स्पोर्ट्स सायन्स
’ बी. पी. एड (फिजिकल एज्युकेशन)
’ बीएससी सायकॉलॉजी / ह्युमन मूव्हमेंट सायन्स
० पदव्युत्तर शिक्षण आणि कौशल्ये : विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी एम.एससी इन स्किल ॲक्विझिशन किंवा एम.एससी इन मोटर लर्निंग हे अभ्यासक्रम उत्तम पर्याय आहेत. याशिवाय, ‘गेम-बेस्ड कोचिंग’ आणि ‘डिसिजन-ट्रेनिंग मॉडेल्स’चे ज्ञान असणे गरजेचे आहे. व्हिडिओ ॲनालिसिस टूल्स आणि रिॲक्शन-टाइम सिस्टम यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही या तज्ज्ञांना करावा लागतो.
nikhil@prophysio.co.in
(लेखक क्रीडा शास्त्रज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट आहेत.)
