संघ कसा जिंकतो आणि का पराभूत होतो, याची कारणे या आकड्यांमध्ये दडलेली असतात. या आकडेमोडीचे ‘डिकोडिंग’ करण्याचे काम ‘स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशियन’ (क्रीडा सांख्यिकी तज्ज्ञ) करतात. खेळ जरी प्रत्यक्ष मैदानावर खेळला जात असला, तरी आजच्या आधुनिक युगात तो आकड्यांच्या माध्यमातून अधिक काटेकोरपणे समजून घेतला जातो. केलेली प्रत्येक धाव, दिलेला प्रत्येक पास, जिंकलेली प्रत्येक रॅली किंवा मारलेली प्रत्येक वेगवान दौड – या सर्वांमधून एक विशिष्ट आकृतिबंध तयार होतो. संघ कसा जिंकतो आणि का पराभूत होतो, याची कारणे या आकड्यांमध्ये दडलेली असतात. या आकडेमोडीचे ‘डिकोडिंग’ करण्याचे काम ‘स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशियन’ (क्रीडा सांख्यिकी तज्ज्ञ) करतात. आधुनिक क्रीडा विश्वातील हा एक पडद्यामागील अत्यंत प्रभावशाली घटक आहे.

जे कच्च्या कच्च्या आकडेवारीचे रूपांतर धोरणात्मक निर्णय, खेळाडूंची निवड आणि दीर्घकालीन नियोजनात करतात, असे खेळाचे गणितज्ञ म्हणजे क्रीडा सांख्यिकी तज्ज्ञ. स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशियनचे काम केवळ धावांची नोंद ठेवणे किंवा डेटाबेस सांभाळण्यापुरते मर्यादित नसते. ते खालील घटकांचा सखोल अभ्यास करतात –

  • संभाव्यता
  • कामगिरीचे प्रवाह आणि पॅटर्न
  • परस्परसंबंध
  • प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स (भविष्यातील कामगिरीचा अंदाज)
  • दीर्घकालीन कामगिरीचा आलेख
  • प्रतिस्पर्धी संघाच्या सवयी आणि रणनीती
  • जोखीम विश्लेषण

सामन्यांचे सिम्युलेशन (विविध परिस्थितींतील संभाव्य निकाल) आकड्यांच्या मदतीने संघाला अधिक हुशारीने आणि अचूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे त्यांचे अगदी स्पष्ट ध्येय असते. परफॉर्मन्स ॲनालिस्ट आणि स्टॅटिस्टिशियनमधील फरक अनेकदा लोक परफॉर्मन्स ॲनालिस्ट (कामगिरी विश्लेषक) आणि स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशियन (सांख्यिकी तज्ज्ञ) यांना एकच समजतात. परंतु दोघांच्या कार्यपद्धतीत मोठा फरक आहे: परफॉर्मन्स ॲनालिस्ट प्रामुख्याने व्हिडिओ फुटेज, जीपीएस डेटा आणि सामन्यातील हालचालींवर काम करतात. ते प्रशिक्षकांना तात्काळ रणनिती ठरवण्यासाठी मदत करतात. स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशियन गणितीय मॉडेल्स, संभाव्यता प्रणाली आणि अनेक वर्षांच्या मोठ्या डेटावर काम करतात. ते संस्थात्मक पातळीवर दूरगामी निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतात.

खेळाचा अंदाज बांधणे

स्टॅटिस्टिशियनच्या कामातील सर्वात रंजक भाग म्हणजे गणितीय अंदाजांचे मॉडेलिंग. ते गणिताच्या आधारे खालील गोष्टींचा अंदाज लावतात :

  • संघ जिंकण्याची संभाव्यता
  • खेळाडूच्या चांगल्या किंवा वाईट कामगिरीची शक्यता
  • दुखापतींच्या जोखमीचे प्रवाह
  • संघाचे सर्वोत्तम संयोजन
  • फुटबॉलमधील अपेक्षित गोल्स (xG) आणि क्रिकेटमधील अपेक्षित विकेट्स (xW)
  • वेगवेगळ्या खेळपट्टीवर किंवा हवामानात सामन्याचा संभाव्य निकाल
  • उदाहरणार्थ : क्रिकेटमध्ये विशिष्ट गोलंदाजाविरुद्ध फलंदाजाचा स्ट्राईक-रेट कसा बदलतो, याचे विश्लेषण करणे.
  • फुटबॉलमध्ये मैदानाच्या कोणत्या भागातून गोल होण्याची शक्यता जास्त आहे, हे मोजणे.
  • बॅडमिंटनमध्ये रॅलीची लांबी आणि खेळाडूच्या थकव्याचा संबंध तपासणे.
  • कबड्डीमध्ये चढाई (Raid) यशस्वी होण्याची शक्यता वर्तवणे.
  • या माहितीमुळे प्रशिक्षक केवळ अनुमानावर अवलंबून न राहता पुराव्यांवर आधारित अचूक योजना आखू शकतात.

भारतीय संदर्भ आणि वाढती मागणी

भारतात आज क्रीडा सांख्यिकीला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे. क्रिकेटमध्ये आता वॅगन व्हील्स, मॅनहॅटन चार्ट्स, स्ट्राईक-रेट क्लस्टर्स आणि बॉलिंग इम्पॅक्ट स्कोअर यांसारख्या आधुनिक मेट्रिक्सचा वापर अनिवार्य झाला आहे. फुटबॉल क्लब ‘एक्सपेक्टेड गोल्स’ आणि ट्रान्सिशनचा अभ्यास करतात. प्रो-कबड्डीमध्ये टॅकल-कार्यक्षमता मोजली जाते, तर बॅडमिंटनमध्ये शॉट-डिस्ट्रिब्युशन पाहिले जाते. असे असूनही, भारतात अजूनही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशियन्सची संख्या फार कमी आहे. त्यामुळे गणित आणि डेटाची आवड असणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत उज्ज्वल भविष्याची हमी देणारे करिअर ठरत आहे. हे क्षेत्र केवळ एलिट खेळाडूंसाठीच नाही; शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांचे नियोजन, क्रीडा अकादमींमधील गुणवत्ता शोध आणि प्रसारमाध्यमांमध्ये सामन्यांचे रंजक विश्लेषण करण्यासाठीही सांख्यिकी तज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात.

स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशियन कसे बनावे?

१. ११ वी आणि १२ वी (विज्ञान किंवा वाणिज्य शाखा): गणित हा विषय अत्यंत आवश्यक आहे. आकडेमोड, तर्कशास्त्र आणि समस्या सोडवण्याची आवड असायला हवी.

२. पदवी शिक्षण : बारावीनंतर खालीलपैकी एका शाखेत पदवी पूर्ण करा : बी.एस.सी. स्टॅटिस्टिक्स (सांख्यिकी), बी.एस.सी. मॅथेमॅटिक्स (गणित), बी.एस.सी. डेटा सायन्स (डेटा सायन्स), बी.टेक्. कॉम्प्युटर सायन्स (संगणक अभियांत्रिकी), बी.एस.सी. स्पोर्ट्स सायन्स (ॲनालिटिक्स विषयांसह)

३. पदव्युत्तर शिक्षण : अधिक प्राविण्य मिळवण्यासाठी खालील पर्याय निवडा: एम.एस.सी. स्टॅटिस्टिक्स / अप्लाइड मॅथेमॅटिक्स, एम.एस.सी. डेटा सायन्स, एम.एस.सी. स्पोर्ट्स ॲनालिटिक्स

४. तांत्रिक कौशल्ये : संभाव्यता आणि प्रगत सांख्यिकीची समज, पायथन किंवा आर यांसारख्या प्रोग्रॅमिंग भाषा डेटा व्हिज्युअलायझेशन (Tableau, PowerBI) प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग आणि मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना

५. प्रत्यक्ष कामाचा अनुभव : स्पोर्ट्स ॲनालिटिक्स कंपन्या, क्रिकेट किंवा फुटबॉल अकादमी, मीडिया हाऊसेस, हाय-परफॉर्मन्स सेंटर्स किंवा क्रीडा लीगमध्ये इंटर्नशिप करून प्रत्यक्ष काम शिकणे अत्यंत फायदेशीर ठरते. स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशियन हा खेळातील चमत्कारांमागे काम करणारा खरा गणितज्ञ असतो. तो खेळातील गोंधळाला स्पष्टता देतो, अनिश्चिततेला शिस्तबद्ध चौकट मिळवून देतो आणि निर्णयप्रक्रियेला बुद्धिमत्तेची जोड देतो.