मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. मुलांचे सारे उत्तम असले, तरी कमर्शियल पायलट बनण्याच्या मुलाच्या हट्टा पायी घर गेले आणि अपमानही सहन करावा लागला. मुलाने यश कमावूनही त्याच्या वडिलांना झालेल्या मनस्तापामुळे त्यांच्यात अलिप्तताच जास्त.

शिरूर जवळच्या दुष्काळी भागातील आम्ही जगताप मंडळी. होती नव्हती ती कोरडवाहू जमीन विकून टाकून सगळे देशोधडीला लागलेले. आम्ही दोन भावंडे त्यातला मी धाकटा. शाळेचे चांगले मार्क म्हणून हट्टाने सायन्स घेतले. गणित बरे होते पण बायोलॉजी आवडत असल्यामुळे डॉक्टर बनण्याची इच्छा होती. शंभरातल्या ९९ मुलांचे जे होते त्यातच माझी गणना बारावी नंतर झाली. म्हणजे छान मार्क म्हणून डॉक्टर व्हायला निघालेले ९९ इतरच काहीतरी खुडबुड करण्यात अडकतात. कोणी फार्मसीला जाते तर माझ्यासारखी बरीच एग्रीकल्चरचा रस्ता धरतात. माझ्या वेळेला अकरावी बारावीसाठी लावल्या जाणाऱ्या क्लास चे पैसे कोणत्याही आई बापाला झेपतील असे होते. आज तेही राहिलेले नाही. हे सारे मला सारखे आठवायला लागले ते ऑस्ट्रेलियाला पोचल्यावर.

हेही वाचा : कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल तीन हजार जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या अर्जप्रक्रिया

शाळेच्या शिक्षणाकरता ऑस्ट्रेलियन नागरिकांना एक पैसाही मोजावा लागत नाही आणि शाळा संपल्यानंतर इतके असंख्य तांत्रिकी अभ्यासक्रम ठेवले आहेत की पदवीच्या मागे जाण्याच कारण राहत नाही. सहज एकदा किती अभ्यासक्रम आहेत म्हणून मी चौकशी केली तर माझा वासलेला आ बंदच होईना. सुमारे बाराशे असे अभ्यासक्रम तेही अभ्यासवृत्ती देऊन व फी भरता उपलब्ध असतात. या साऱ्यांना टेक्निकल अँड फर्दर एज्युकेशन असे नाव आहे. त्याला सुटसुटीतपणे ‘टाफे कोर्स’ असं म्हणतात.

ऑस्ट्रेलियात राहुरी कृषी विद्यापीठातर्फे मी एका प्रकल्पावर गेलो होतो. किमान मनुष्यबळ वापरून फायद्यात येणारी शेती, हा माझ्या प्रकल्पाचा अभ्यासाचा विषय होता. कोणताच शेतकरी कामगार नावाची व्यक्ती बाळगून नव्हता. पहिल्या भेटीत एका शेतकऱ्याला विचारले इथला शेतकरी सरासरी किती जमीन बाळगून शेती करतो? ती किती एकर असते? त्याचे उत्तर थक्क करणारे होते. १००० एकराच्या आत शेती परवडत नाही आणि माझ्याकडे अडीच हजार एकर शेती आहे. मग किती माणसे ही सारी कामे करतात या माझ्या प्रश्नावर त्यांनी माझ्याकडे हा काय प्रश्न? अशा पद्धतीत पाहिले व उत्तर दिले मी माझी बायको आणि माझी दोन मुले. माझ्याकडे एक विमान आहे, दोन ट्रॅक्टर, इतर यंत्र आहेत आणि विमान सोडले तर बाकी सगळी यंत्रे दुरुस्त करण्याचे कौशल्य आमच्या तिघांकडे आहे.

आमचे चहापाणी झाले होते. तो म्हणाला, चल तुला शेत दाखवून आणतो. मी पुन्हा भाबडेपणाने त्याला विचारले किती तासाने आपण परत येऊ? तो म्हणला वीस ते पंचवीस मिनिटांत. चल म्हणून त्यांनी विमानाच्या किल्ल्या घेतल्या आणि मला दोन सीटर विमानात मागे बसवले. एखादी बाईक किंवा कार चालवावी तितक्या सहजपणे त्याने विमान सुरू केले आणि जेमतेम २०० ते ३०० फुटांवरून आम्ही सगळ्या शेताची टेहळणी करू लागलो. अर्ध्या तासात सगळ्या शेतावरून फिरून परत आल्यावर विमानाच्या पंख्यांना काय काय जोडण्या करता येतात व त्याचे खते, बी बियाणे, औषध फवारणी यासाठी कसकसा उपयोग होतो हे प्रात्यक्षिक करून दाखवले. सांगायचे तात्पर्य एवढेच की विमानाबद्दलचे आकर्षण संपून त्याची उपयुक्तता कशी वापरावी हे मला पहिल्यांदा कळले.

हेही वाचा : IOCL Bharti 2024: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; ५० हजारांपर्यंत मिळणार पगार

विमान नावाच्या यंत्राबद्दलचे माझे आकर्षण तर सोडाच, पण कोणीही ते शिकू शकतो वापरू शकतो याबद्दलचे अज्ञान कायमचे दूर झाले होते. एकदा मी तिथल्या विद्यापीठातील प्राध्यापकाशी बोलत असताना सहजपणे कमर्शियल पायलट होण्याकरता किती खर्च येतो ,असे विचारले. प्राध्यापकांनी मला उलट प्रश्न केला, ‘यू मीन टू से टू बीकम एअर टॅक्सी ड्रायव्हर?’ हा शब्द ऐकून आता माझी बोलती बंद होण्याचीच वेळ आली होती. मग त्या प्राध्यापकाने अजून विस्ताराने सांगितले आमचे खंड मोठे असले तरी सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. ज्यावेळी विमानांचा वापर सुरू झाला तेव्हापासून विमान ही आमची गरज बनलेली आहे. जसे मोटर चालवणे गरजेचे तसे विमान चालवायला शिकणे हे प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचे समजले जाते. तशी अनेक शिकवण्याची केंद्रे आम्ही काढली आहेत आणि ज्यांना एअर टॅक्सी ड्रायव्हर बनायचे त्यांच्यासाठी सर्व मोठ्या शहराजवळ प्रगत शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे.

माझ प्रकल्पाचे ऑस्ट्रेलियातील काम छान पूर्ण झाले. परत आल्यानंतर माधव, दत्ता व स्वातीबरोबर काश्मीरची ट्रिपही छान झाली. नोकरीत प्रमोशन मिळाले आणि या साऱ्या आनंदावर माधवच्या हट्टाने पाणी फिरवायला सुरुवात केली. माधव आणि स्वातीला पायलटचा फक्त पगार दिसत होता. पण वास्तव लक्षात येत नव्हते. एखाद्या बापाची कुवत आणि इज्जत बायको व मुलगा काढतो त्यापेक्षा दुसरा अपमान कोणताही नसतो. हे शहाणपण मला घरातील अनुभवाने यायचे होते. तोही अपमान गिळून माधवला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची पैशाची व्यवस्था मी केली. त्याला नोकरी लागेल व सारे सुरळीत होईल या भ्रमात मी होतो. तो भोपळा जेमतेम दोन वर्षात फुटला. बँकेच्या मॅनेजरने पाठवलेली नोटीस आल्यावर मी जेव्हा त्यांच्यासमोर भेटायला गेलो तेव्हा त्यांनीही माझी उरली सुरली इज्जत सोप्या शब्दात काढली. तुमचा मुलगा पायलट बनला, पण दीड वर्षे बेकार आहे. तुमच्या पगारातून हप्ता देऊन कर्जावरील व्याज जेमतेम सुटते. मुद्दल परत करण्याचे नावसुद्धा सुरू होत नाही. बँकेला हे परवडत नाही. घरासाठी कर्जाची मुदत वीस ते तीस वर्षे असते. अन्यथा कोणतही कर्ज सात वर्षात परत येणे बँकेला अपेक्षित असते. ते नाही आले तर माझी नोकरी जाऊ शकते. माझा पडलेला चेहरा पाहून त्यानेच सुचवले प्राध्यापक साहेब घर विकून टाका. बँकेने लिलाव करून विकण्यापेक्षा आणि त्यातून इज्जत जाण्यापेक्षा तुम्ही विकलेले चांगले नाही का? मग पुढच्या महिन्यातच आम्ही चौघेजण भाड्याच्या घरात, विद्यापीठाच्या आवारात राहायला गेलो. आता दोन्ही मुलांचे आपापल्या परीने चांगले चालू असले तरी मला एकूणच संसारात रस उरलेला नाही. सुदैवाने वाढत्या महागाई बरोबर माझ्या पेन्शनचा आकडाही वाढत गेल्यामुळे आम्हा दोघांना आर्थिक चणचण जाणवत नाही एवढेच समाधान. देवा पांडुरंगा आता तूच माझा सखा.

(क्रमश:)