Success Story: भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी प्रिलिम्स, मग मेन आणि शेवटी मुलाखत. अनेकजण वर्षानुवर्षे कोचिंग घेतात, पण ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत. मात्र राजस्थानमधील विकास कुमार मीणा यांनी सर्व अडथळ्यांना सामोरे जात अखेर यूपीएससीत बाजी मारली आहे. एक हिंदी मिडीयमचा मुलगा काय करु शकतो असे प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना विकास कुमार मीणा यांनी चांगलंच उत्तर दिलंय.

विशेष म्हणजे, त्यांनी एक अनोखा दृष्टीकोन अवलंबला, प्रिलिम्स पूर्ण केल्यानंतरच त्यांनी मॉक इंटरव्ह्यूसाठी तयारी करायला सुरुवात केली. परिक्षेच्या नियोजनापासून ते अवघड मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत ते व्यवस्थित नियोजन करुन पोहचले.

आतापर्यंतचा प्रवास

विकास हे राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील हिंडौन तालुक्यातील बऱ्हेडा गावातला आहे. ते लहानपणापासूनच मेहनती विद्यार्थी होते. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावी आदर्श विद्या मंदिरात पूर्ण केले. त्यानंतर सीकर जिल्ह्यातील एका शाळेत त्यांनी १२वीच्या परीक्षेत ९० टक्के मिळवले. यानंतर, त्यांनी NIT दिल्ली येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले, मे २०२१ मध्ये पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना एका बहुराष्ट्रीय कंपनीकडून कोटींच्या नोकरीची ऑफर मिळाली. मात्र, ते स्वीकारण्याऐवजी, त्यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार नागरी सेवा करणे पसंत केले.

हेही वाचा >> UPSC Success Story: कष्टाचे फळ मिळालेच! परिस्थितीवर मात करत पठ्ठ्या कसा झाला आयएएस अधिकारी वाचा

यूपीएससीची तयारी

मे २०२१ मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागरी सेवेची तयारी सुरू केली. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये ते दिल्ली येथे कोचिंगमध्ये रुजू झाले. CSE-23 मध्ये प्रिलिम्स क्रॅक केल्यानंतर, त्यांनी त्यांच्या कोचिंगमध्ये नियोजन केले. मात्र २०२२ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांना अपयश आले. तर पुढच्याच वर्षी म्हणजे २०२३ मध्ये त्यांनी AIR 672 सह परीक्षा उत्तीर्ण केली. विकास कुमार मीणा सांगतात, “हा एक छोटासा प्रवास आहे, तरीही त्यात अनेक टप्पे आहेत.”

हिंदी माध्यमासाठी आव्हाने

हिंदी माध्यमामध्ये शिक्षण झालेल्या मुलांना या क्षेत्रात मोठं आव्हानं असतं असं बोललं जाते, यावर विकास कुमार मीणा सांगतात, त्यांनी नमूद केले की हिंदी माध्यमाच्या पार्श्वभूमीचे विद्यार्थी सहसा यूपीएससी परीक्षेच्या पलीकडे जीवनाचा विचार करत नाहीत, ते त्यांचे एकमेव लक्ष आहे. ही मानसिकता हानिकारक आहे आणि अनेकदा त्यांच्यावर भावनिकरित्या नकारात्मक परिणाम करते. त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे.