Success Story: करोना महामारीच्या काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली, तसेच अनेकांना आर्थिक नुकसान झाल्याने व्यवसाय बंद करावे लागले. त्यामुळे अनेकांनी आपला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला; तर काही जण आपल्या गावी जाऊन शेती करू लागले. आज आम्ही अशाच एका उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत; ज्यांनी स्वतःची शेती सुरू करून आपले जीवनमान बदलले आहे. बिहारमधील उद्योजक शशी भूषण तिवारी यांचे मशरूमच्या शेतीमुळे पूर्ण जीवनच बदलले. शशी भूषण तिवारी पूर्वी दिल्लीमध्ये भाजीचा व्यवसाय करायचे; पण करोना महामारीच्या काळात अनेक अडचणींमुळे ते आपल्या कुटुंबासह पुन्हा मुझफ्फरपूर येथील त्यांच्या गावी परतले. दिल्लीतील व्यवसाय सोडून गावी परतल्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या शेतात बटन मशरूमची लागवड सुरू केली. तिथेच त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. आज ते या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. अशा प्रकारे केली शेती मशरूमची शेती करायचे ठरविल्यानंतर सुरुवातीला शशी भूषण यांनी PUF पॅनल्स आणि एअर कंडिशनर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एका छोट्या खोलीत मशरूम वाढविण्यास सुरुवात केली. हळूहळू यात यश मिळत असल्याचे दिसताच त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. आज त्यांच्याकडे मशरूम उत्पादनासाठी २० खोल्या आहेत; ज्यातून ते दररोज १.७ ते १.८ टन मशरूमचे उत्पादन करतात. त्यातून ते दररोज दोन लाख रुपये कमावतात. शेतीचा सर्व खर्च आणि कर्मचाऱ्यांचा पगार वजा केल्यानंतर त्यांना मासिक नफा सुमारे १० लाखांहून अधिक रुपये मिळतो. शशी भूषण यांच्या या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर होत आहेच; पण इतर १०० ग्रामीण महिला आणि अनेक पुरुषांना रोजगाराची संधीही मिळाली आहे. उत्पादन खर्च कमी व्हावा आणि मागणी कमी असतानाही आपले उत्पन्न टिकून राहावे यांसाठी तिवारी स्वतः मशरूम स्पॉन तयार करतात. त्यांनी मशरूम कॅनिंग प्लांटही स्थापन केला आहे. हेही वाचा: Success Story: गावात किराणा मालाच्या दुकानापासून ते कोट्यावधींची कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास महिलांना रोजगाराची संधी शशी भूषण यांच्या पुढाकारामुळे सामाजिक परिवर्तनही होत आहे. बिहारमधील अनेक खेड्यांतील महिलांना कुटुंबीयांकडून घराबाहेर पडून नोकरी करण्याची परवानगी दिली जात नाही. परंतु, शशी भूषण तिवारी यांच्या पुढाकारामुळे अनेक महिलांना नोकरी करण्याची संधी मिळाली आहे. या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शशी भूषण त्यांना पिक-अप आणि ड्रॉप-ऑफची सुविधा देतात. तसेच त्यांनी अनेक महिलांना मशरूम लागवडीचे प्रशिक्षणही दिले आहे. त्याचा फायदा घेत अनेक महिलांनी घरीच स्वतःची छोटी छोटी युनिट सुरू केली आहेत. मशरूम शेती हा कौटुंबिक उत्पन्न वाढविण्याचा एक चांगला मार्ग असल्याचे शशी तिवारी यांचे मत आहे. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थीदेथील येथे पार्ट टाइम काम करतात. शशी यांच्या मुलाने नुकताच कॅन केलेला मशरूम ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली आहे. तसेच आता शशी व त्यांच्या मुलाची नजर निर्यातीवर आहे आणि त्यानुसार ते भविष्यात मशरूम परदेशात पोहोचविण्याच्या दृष्टीने तयारी करीत आहेत.