Success Story: स्वतःवरील विश्वास आणि कठीण परिश्रम कधीही वाया जात नाहीत. भारतात असे अनेक दिग्गज उद्योजक आहेत, ज्यांनी हातात फारसे भांडवल नसतानादेखील आपली मोठमोठी स्वप्नं साकारण्यासाठी कठीण परिश्रम घेतले आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे स्वप्न साकारले. आज आम्ही तुम्हाला अशाच एक लोकप्रिय ब्रँडच्या संस्थापकाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत. केशव विष्णू पेंढारकर हे एकेकाळी त्यांच्या गावात किराणा दुकान चालवायचे. पण, त्यांची स्वप्ने आधीपासूनच खूप मोठी होती. किराणा दुकान चालवत असताना त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि विको कंपनी उभारली, जी आज हजारो कोटींची कंपनी बनली आहे. सध्या बाजारात विको खूप लोकप्रिय ब्रँड्सपैकी एक आहे. केशव विष्णू पेंढारकर यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यामुळे ते लहानपणापासूनच पैसे कमावू लागले. कालांतराने त्यांनी गावात किराणा दुकान सुरू केले. मात्र, ते दुकान काही दिवसातच बंद करून ते मुंबईला गेले. मुंबईत गेल्यावर त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांची पाहणी केली आणि मार्केटिंगसंबंधित काही गोष्टी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी स्वत: बनवलेल्या वस्तू विकून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. असा सुरू झाला व्यवयाय (Success Story) केशव यांनी मुंबईत येऊन अनेक छोटे व्यवसाय सुरू केले. या काळात त्यांना कधी यश तर कधी अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर ते परळला गेले. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, लोक ॲलोपॅथिक औषधे आणि परदेशी कॉस्मेटिक उत्पादने खूप वापरतात. त्यानंतर त्यांनी स्वतःचा ब्रँड लाँच करण्याचा निर्णय घेतला, जो कॉस्मेटिक ब्रँडला रसायनमुक्त पर्याय असेल. अशा परिस्थितीत पेंढारकरांनी नैसर्गिक आयुर्वेदिक उत्पादन बनवण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांना आयुर्वेदिक औषधांची माहिती हवी होती. यासाठी त्यांना त्यांच्या मेहुण्याने मदत केली. १९५२ मध्ये त्यांच्या छोट्या घरात आयुर्वेदिक उत्पादनाची पहिली टूथ पावडर बनवली. ते आपल्या मुलासोबत घरोघरी जाऊन ती विकू लागले. लोकांना त्यांची टूथ पावडर आवडू लागली. हेही वाचा: Success Story: UPSC परीक्षेच्या तयारीदरम्यान झाली वडिलांची हत्या; तरीही खचून न जाता वडिलांचे स्वप्न केले पूर्ण अन् परीक्षेत मिळवला ४५४ वा क्रमांक १९५५ पर्यंत कंपनीची वार्षिक उलाढाल १० लाख रुपये झाली. त्यानंतर त्यांनी कंपनीचे नाव विको ठेवले. विको वज्रदंती टूथ पावडर हे त्यांचे पहिले उत्पादन होते. कंपनीच्या स्थापनेनंतर अनेक वर्षांनी कंपनीने मधुमेहाच्या रुग्णांसाठी VICCO शुगर-फ्री पेस्ट बनवली. VICCO हळद फोम बेस मल्टिपर्पज क्रीमदेखील खूप लोकप्रिय उत्पादनांपैकी एक आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ५०० कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे.