Success Story: केरळमधील अलाप्पुझा येथील रहिवासी असलेले मानस मधू यांनी आपल्या कंपनी बियॉण्ड स्नॅक्सच्या माध्यमातून केळीच्या चिप्समध्ये सुधारणा करून करोडो रुपये कमावले आहेत. MBA पदवीधर असलेल्या मानस यांनी २०१८ मध्ये त्यांची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि Beyond Snacks कंपनी सुरू केली. आता त्यांची ही कंपनी फक्त केरळपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण देशात त्यांच्या कंपनीने बनविलेल्या स्नॅक उत्पादनाची लोकप्रियता वाढली आहे.

मानस मधू हे जेव्हा अभ्यास किंवा कामासाठी बाहेर जात तेव्हा त्यांची आई त्यांच्या बॅगेत केळीच्या चिप्स ठेवायची. त्यावरून केळ्यांच्या चिप्सची कंपनी सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. केळी चिप्स विकणारे ब्रॅण्ड फारच कमी आहेत, असे त्यांना नेहमी वाटायचे. मानस यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. पण, सुरुवात कशी करावी हे त्यांना समजत नव्हते. मात्र, आपला व्यवसाय खाद्य उद्योगाशी संबंधित असेल याची त्यांना खात्री होती. एके दिवशी त्यांनी एक लेख वाचला आणि त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली.

बियॉण्ड स्नॅक्स देसी मसाला, पेरी पेरी, मीठ व मिरपूड, हॉट अॅण्ड स्वीट चिली, सॉर क्रीम ओनियन व नमकीन अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये केळीच्या चिप्सची विक्री केली जाते. अशा प्रकारे Beyond Snacks ने पारंपरिक नाश्त्याला एक नवीन रूप दिले आहे. बियॉण्ड स्नॅक्स हंगामी उपलब्धतेवर आधारित दक्षिण भारतीय राज्यांमधील शेतकऱ्यांकडून नेंद्रन (केरळ केळी) खरेदी करते. ताजी कच्ची केळी स्वच्छ करून, त्यांचे तुकडे केले जातात. नंतर शुद्ध तेलात ते तळले जातात. तसेच त्यांचे पॅकेजिंगदेखील विशेष आहे.

हेही वाचा: Success Story : सलून व्यवसाय ते ४०० गाड्यांचा मालक होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; आमिर खान, अमिताभ बच्चन यांनाही दिली कार सेवा

हे चिप्स ॲमेझॉन, बिग बास्केट व इंडिया मार्ट यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह किरकोळ आणि सुपर मार्केटमध्येदेखील उपलब्ध आहेत. आज त्यांचे बेंगळुरू, मुंबई, पुणे, म्हैसूर व दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये ग्राहक आहेत. त्यांची उत्पादने मुंबई आणि पुण्यातील ३,५०० हून अधिक आउटलेटमध्ये उपलब्ध आहेत. त्याशिवाय कंपनीने अमेरिका, यूएई, कतार, नेपाळ व मॉरिशसमध्येही आपली उत्पादने संख्यात्मक प्रमाणात वाढवली आहेत. आता ही उत्पादने Jio Mart, The Good Stuff आणि इतर प्रमुख प्लॅटफॉर्मवरदेखील उपलब्ध आहेत. कंपनीची दरमहा एक कोटी रुपयांची विक्री होते.