Success Story: परिस्थिती कशीही असो; माणसाची कष्ट करण्याची जिद्द त्याला पुढे घेऊन जाते. भारतात असे अनेक क्षेत्रांतील दिग्गज आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात केली आहे. आज आम्ही अशाच एका दिग्गज व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत. बालपणापासून आर्थिक समस्येचा सामना करणाऱ्या चंद्रशेखर घोष यांची यशोगाधा अनेकांसाठी खूर प्रेरणादायी आहे. चंद्रशेखर घोष यांनी बंधन बँकेची पायाभरणी केली. कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या बंधन बँकेचे बाजार भांडवल २९,७८७ कोटी रुपये इतके आहे. दरम्यान, घोष यांनी नुकताच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा राजीनामा दिला आहे. चंद्रशेखर घोष यांचे बालपण १९६० साली चंद्रशेखर घोष यांचा जन्म त्रिपुरामधील आगरतळा येथील एका गरीब कुटुंबात झाला. चंद्रशेखर घोष यांचे वडील मिठाईचे दुकान चालवायचे. अनेक अडचणी असूनही चंद्रशेखर घोष यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी ते बांगलादेशला गेले. १९७८ मध्ये त्यांनी ढाका विद्यापीठातून स्टॅटिस्टिक्स विषयातून पदवी मिळवली. त्यावेळी आश्रमात राहून घोष यांनी मुलांना शिकवून आपला उदरनिर्वाह केला. त्यानंतर १९८४ साली चंद्रशेखर यांची बांगलादेशी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन (BRAC) मध्ये नियुक्ती झाली आणि त्यांचे पूर्ण आयुष्य बदलले. तेथे त्यांनी पाहिले की, लहान आर्थिक मदतून ग्रामीण महिला लहान व्यवसाय सुरू करू शकतात. त्यानंतर घोष यांनी हे मॉडेल भारतात स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा: Success Story: स्वप्नाला जोड मेहनतीची! छोट्या शहरातल्या तरुणाने कष्टाच्या जोरावर उभी केली तब्बल ६०० कोटींची कंपनी १९९७ मध्ये कोलकात्यात परतल्यानंतर घोष यांनी व्हिलेज वेल्फेअर सोसायटीसाठी काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर स्वतःची कंपनी सुरू केली. २००१ मध्ये महिलांना कर्ज देण्याच्या उद्देशाने बंधन या मायक्रोलेंडिंग संस्थेची स्थापना केली. या कंपनीसाठी चंद्रशेखर यांनी मित्र आणि नातेवाइकांकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले. २००९ मध्ये 'बंधन'ची NBFC म्हणून नोंदणी झाली. तसेच २०१५ मध्ये या बँकेला बँकिंग परवाना मिळाला आणि या बँकेचे नाव त्यांनी 'बंधन बँक', असे ठेवले.