Success Story: जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगत असतो. जगात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला पोलिस व्हायचे असते, तर कोणाला व्यावसायिक व्हायचे असते. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जण थोड्या मिळालेल्या यशातही समाधानी होतात. पण, असेदेखील काही लोक असतात, संकटाला तोंड देऊन पुन्हा नवी सुरुवात करून आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत, जे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आता अब्जाधीश आहेत.

ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते ८०० कोटींची कंपनी

कर्नाटकातील बेल्लारे गाव हे शंकर यांचे मूळ गाव असून ते एका सामान्य शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झाले. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे बालपण अडचणी आणि संघर्षांनी भरलेले होते. परिस्थितीमुळे ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत, कमी शिक्षण झाल्यामुळे त्यांना नोकरी मिळणं कठीण होतं, त्यामुळे बँकेतून कर्ज काढून त्यांनी ऑटोरिक्षा घेतली आणि ती शहरात चालवायला सुरुवात केली. वर्षभर मेहनत करून त्यांनी वर्षभरात रिक्षाचे सर्व कर्ज फेडले. नंतर त्यांनी काही पैसे साठवून आपली ऑटो विकली आणि टॅक्सी विकत घेतली. पण दिवस-रात्र मेहनत करतानादेखील शंकर मनातून समाधानी नव्हते.

त्यामुळे त्यांनी १९८७ मध्ये ऑटोमोबाईल गॅरेज व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांनी टायर डीलरशिप आणि ऑटोमोबाईल फायनान्स कंपनीदेखील स्थापन केली. हळूहळू शंकर त्यांच्या व्यवसायात खूप चांगले बदल घडवू लागले. पण, तरीही त्यांचे मन समाधानी नव्हते.

आयुष्यात नवा बदल

शंकर जेव्हा २००० साली उत्तर भारतात गेले होते, त्यावेळी या प्रवासादरम्यान, त्यांच्या मनात एक पेय बनवण्याची आणखी एक व्यावसायिक कल्पना निर्माण झाली. शंकर यांनी बाजारातील पेयाची क्षमता ओळखली. वेगळ्या प्रकारचे कार्बोनेटेड पेय तयार करण्याच्या उद्देशाने शंकर यांनी २००२ मध्ये ‘बिंदू फिज जीरा मसाला’ लाँच केले. या स्थानिक पेयाच्या उत्तम चवीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि हे पेय लोकप्रिय झाले.

हेही वाचा: Success Story: एक वेळ जेवण करून काढले दिवस… एकाच घरातील सख्ख्या चुलत भावंडांनी उत्तीर्ण केली JEE Advanced परीक्षा; वडील करतात मजुरी

२००५-२००६ पर्यंत कंपनीने सहा कोटी रुपयांची उलाढाल गाठली होती. २०१० मध्ये, SG कॉर्पोरेट्सच्या उत्पादन ब्रँड Fizz Jeera Masala ने प्रचंड वाढ केली. त्यानंतर कंपनीच्या उलाढालीने १०० कोटींचा आकडा पार केला.

या यशामुळे भारतातील पेय उद्योगात ‘बिंदू फिज जीरा मसाला’ या ब्रँडची लोकप्रियता आणखी वाढली. २०१५ मध्ये यूएई, सिंगापूर आणि मलेशियासारख्या देशांमध्येदेखील या पेयाची निर्यात सुरू करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ मध्ये या कंपनीचे मूल्य ८०० कोटी रुपये होते.