NEET success story: देशात प्रत्येकवर्षी अनेक जण स्पर्धा परीक्षा देतात. ज्यात काहींना यश तर काहींच्या हाती अपयश येते. बऱ्याचदा पहिल्या प्रयत्नात अनेकांच्या हाती निराशा येते, ज्यामुळे “आपण हे कधीच करू शकणार नाही”, असा विचार करून अनेक जण माघार घेतात. परंतु, प्रयत्नांबरोबरच जिद्द ही प्रत्येक यशापर्यंत पोहोचवणारी पायरी आहे, जी एक दिवस मेहनत घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवते.

एका ज्यूस विक्रेत्याच्या मुलाने NEET परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे. या तरुणाचे नाव दीक्षित गौतम असून त्याने ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याला शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले. एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर दीक्षित डॉक्टर म्हणून परतणार आहे.

दीक्षित गौतम हा सहारनपूरच्या गगलहेडी शहरातील रहिवासी असून त्याचे बालपण गरिबीत गेले. त्याचे वडील ज्यूस विक्रेते होते. श्री कृष्णा इंटर कॉलेजमधून दीक्षित गौतमने बारावी उत्तीर्ण झाला. बारावीत दीक्षितला केवळ ६३% मार्क्स मिळाले होते. त्यानंतर त्याने अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. मात्र, २०२० मध्ये लॉकडाऊनमध्ये घरी बसल्यामुळे दीक्षितने स्वतःला अभ्यासात गुंतवले. तेव्हा त्याच्या एका शिक्षकानेदेखील त्याला गांभीर्याने अभ्यास करण्याचा सल्ला दिला. दीक्षितने हे गांभीर्याने घेत ऑनलाइन अभ्यास सुरू केला आणि त्याने NEET परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या प्रयत्नात ७८, दुसऱ्या प्रयत्नात १२४ मार्क्सने तो अपयशी झाला. परंतु, तिसऱ्या प्रयत्नात दीक्षितने ५३६ गुण मिळवून NEET परीक्षा उत्तीर्ण केली आणि एमबीबीएससाठी त्याची जागा निश्चित केली.

हेही वाचा: Success Story: महिन्याला ८० रुपये कमावण्यापासून ते वर्षाला आठ कोटी कमावण्यापर्यंतचा प्रवास; देशी गायींच्या जोरावर केली प्रगती

दीक्षित डॉक्टर होणार हे त्याच्या आई-वडिलांसाठी एखाद्या स्वप्नासारखे आहे. एका मुलाखतीत दीक्षितचे वडील सेठपाल सिंग सांगतात की, त्यांच्या मुलाने NEET परीक्षा उत्तीर्ण केली आणि एमबीबीएसची जागा मिळवली. हे सर्व त्यांना एखाद्या स्वप्नासारखे वाटत आहे. त्यांच्या कुटुंबात कोणीही इतके शिकलेले नाही. ते स्वतः उसाचा रस विकतात आणि हंगाम संपल्यानंतर ते कारखान्यांमध्ये मजूर म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते, जे आता पूर्ण होताना दिसत आहे.”