Success Story: श्रीमंत व्हायचं स्वप्न सगळेच पाहतात आणि त्यासाठी कित्येक जण भरपूर कष्टही करतात. पण कधी कोणाचं नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या सामान्य गरजा भागवण्यासाठी आणि दोन वेळचे चांगले अन्न मिळावे यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात. अशातच जर एखाद्याचे कमावण्याचे साधन गेले, तर तो आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी काय करत नाही? राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील किशनगड रेणवाल येथील रहिवासी नरेंद्र कुमार गिरवा यांचीही अशीच एक कहाणी आहे. त्यांच्या गावातील बहुतेक लोक शेती करायचे; पण त्यांच्याकडे यासाठी पुरेशी जमीन नव्हती. म्हणून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांजवळ पुस्तके, झेरॉक्स,स्टेशनरी आदी वस्तू विकण्यासाठी एक दुकान उघडले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात असा काळ आला की, ते कर्जबाजारी झाले.

चार-पाच लाखांचे नुकसान

नरेंद्र कुमार यांनी सुमारे आठ वर्षे स्टेशनरीचे दुकान चालवले. दुकान चांगले चालले होते. हे पाहून दुकानमालकाने आपल्या मुलाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नरेंद्र यांच्याकडून दुकान रिकामे करून घेतले. नरेंद्र यांनी अर्धा किलोमीटर अंतरावर त्याच ठिकाणी पुन्हा त्यांचे दुकान उघडले; परंतु पुरेशा ग्राहकांअभावी काही महिन्यांतच त्यांचे चार-पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. मग घर चालविण्यासाठी त्यांच्या पत्नीने शिवणकामाद्वारे हातभार लावला.

यूट्यूबवरून शेतीविषयक ज्ञान मिळविण्यास सुरुवात

दरम्यान, नरेंद्र यांनी यूट्यूबवरून शेतीविषयक ज्ञान मिळविण्यास सुरुवात केली. यूट्यूबवर अशी माहिती मिळवीत असतानाच त्यांनी एकदा चुकीचे अक्षर टाईप केले आणि त्याला ‘पर्ल फार्मिंग’चा व्हिडीओ दिसला. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना वाटले की, आपण आपल्या गंतव्य स्थानाच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी मोतीची शेती सुरू केली. याआधी ते ओडिशामधील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर (CIFA) मध्ये गेले आणि तेथे त्यांनी पाच दिवसांचा अभ्यासक्रम केला. त्यासाठी त्यांनी मोठ्या कष्टाने ६,००० रुपये शुल्क भरले. त्यानंतर त्यांनी केरळला जाऊन, ५०० शिंपले खरेदी केले आणि घरी पाण्याची टाकी बनवून, मोतीची शेती सुरू केली.

राजस्थानमधील कोरडे हवामान आणि मोतीच्या शेतीची माहिती नसल्यामुळे त्यांचे शिंपले एकामागून एक मरू लागले. काही दिवसांंतच त्यांच्याकडे फक्त ३५ शिंपले शिल्लक राहिले होते. तोपर्यंत त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले होते; पण त्यांनी हार मानली नाही. सहा महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा केरळहून ५०० शंख आणले. यावेळी त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आणि शिंपल्यांचा जगण्याचा दर ७० टक्क्यांपर्यंत वाढला. त्यांच्याकडील शिंपल्यांच्या कवचांतून बटणाच्या आकाराचे मोती बाहेर पडले, जे खरेदीदारांनी सहज खरेदी केले. प्रत्येक शिंपल्यापासून दोन ते चार मोती मिळाले आणि प्रत्येक मोत्यासाठी २०० ते ४०० रुपये मिळाले.

हळूहळू व्यवसायात वाढ

दुसऱ्या बॅचमध्ये नरेंद्र यांनी पुन्हा ७०० शिंपले खरेदी केले. त्यांच्याकडील मिळालेल्या मोत्यांपासून त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर त्यांनी व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. मग त्यांनी पाण्याच्या नवीन टाक्या बांधल्या आणि एका वेळी ३,००० शिंपल्यांचे संगोपन सुरू केले. त्यानंतर त्यांना प्रत्येक चक्रात सुमारे ५,००० मोती मिळू लागले. मग त्यांना दर १८ महिन्यांनी १० ते १५ लाख रुपयांचा नफा मिळू लागला.

थेट ग्राहकांपर्यंत पोहोचले

पूर्वी ते ज्वेलर्स किंवा मध्यस्थांमार्फत मोती विकत असत. त्यामुळे त्यांना कमी नफा किंवा मार्जिन मिळे. त्यानंतर त्यांनी Amazon.com द्वारे स्वतःचे मोती विकायला सुरुवात केली. किरकोळ बाजारातही त्यांना त्यांची आपली उपस्थिती जाणवली. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले. नंतर त्यांनी मोती शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

मोतीची शेती कशी केली जाते?

मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे, जे शिंपल्यापासून मिळते. ऑयस्टर हा समुद्रात आढळणारा एक प्राणी आहे. ऑयस्टरचे बाह्य कवच कठीण असते आणि आत जीव असतात. जर चुकून वाळूचा कण त्याच्या पोटात गेला, तर त्याला तीव्र वेदना होतात. ही वेदना कमी करण्यासाठी, त्याचे शरीर वाळूच्या कणांभोवती जमा होणारा द्रव सोडते. त्याचे नंतर मोती बनतात. पूर्वी समुद्रातून शंख गोळा करून मोती काढले जात होते. त्यांना ‘खरे मोती’ म्हणतात. परंतु, वाढत्या मागणीमुळे आता टाक्यांमध्ये शिंपल्यांचे संगोपन करून मोती शेती केली जात आहे. त्याला ‘कृत्रिम मोती’ म्हणतात. त्याची किंमत खऱ्या मोत्यांच्या तुलनेत कमी आहे.