Success Story: परिस्थिती कशीही असो; माणसाची कष्ट करण्याची जिद्द त्याला पुढे घेऊन जाते. भारतात असे अनेक क्षेत्रांतील दिग्गज आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात केली आहे. शेअर बाजार म्हटलं की, हर्षद मेहता, राकेश झुनझुनवाला व राधाकिशन दमानी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नावांचा उल्लेख केला जातो. त्याव्यतिरिक्त इतर अनेक दिग्गजही आहेत, ज्यांनी शेअर बाजारात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. त्या दिग्गजांमध्ये निलेश शाह यांच्या नावाचाही समावेश आहे. निलेश शाह ही भारतातल्या म्युच्युअल फंड व्यवसायातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. आपल्या ज्ञानाद्वारे त्यांनी या व्यवसायात केवळ प्रगतीच नाही, तर गुंतवणूकदारांना मोठा फायदाही करून दिला. कोटक म्युच्युअल फंडाचे एमडी व सीईओ निलेश शाह यांच्या यशाचा प्रवास शेअर बाजारात काम करणाऱ्या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. निलेश शाह हे एकोकाळी मुंबईच्या एका चाळीत राहायचे. त्यांना एकेकाळी ५० रुपये भत्ता मिळायचा; पण आज त्यांचा पगार १५ कोटी रुपये आहे. शिक्षणासाठी मुख्याध्यापकांकडून मदत (Success Story) निलेश शाह यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते; पण निलेश लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईने निलेश यांचा पूर्ण हिमतीने सांभाळ केला. अभ्यासात हुशार असलेल्या निलेश शहा यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांची क्षमता पाहून, त्यांच्या संपूर्ण शालेय शिक्षणाची फी स्वतः भरली. पार्ट टाइम नोकरी करीत शिक्षण घेतले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीलेश यांनी एमबीए करण्याऐवजी सीए होण्याचा निर्णय घेतला. शिक्षण घेताना स्वतःचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी एका फर्ममध्ये आर्टिकलशिप सुरू केली, ज्यासाठी त्यांना ५० रुपये मिळायचे. मात्र, नंतर त्यांचे गुरू प्रफुल्लभाई यांनी हा भत्ता वाढवून २५० रुपये केला. अशा प्रकारे निलेश शहा यांनी शिक्षणाबरोबर अर्धवेळ नोकरीही केली. तसेच मेहनत करून त्यांनी सीएच्या अखिल भारतीय परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. हेही वाचा: Success Story: जेव्हा स्वप्नं परिस्थितीवर मात करतात… एकेकाळी दिवसाला कमवायचे सात रुपये अन् आता सांभाळतात तीन कोटींचा व्यवसाय निलेश शहा यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ पैशांऐवजी गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचाही प्रयत्न केला. गुंतवणूकदारांनी त्यांच्यावर आणि कोटक ब्रॅण्डवर विश्वास का ठेवायला हवा, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. एकेकाळी मुंबईच्या काळबादेवी येथील चाळीत राहणारे निलेश आता चार लाख कोटी रुपयांचा म्युच्युअल फंड कंपनीचा व्यवसाय सांभाळत आहेत.