Success Story Of IAS Vishal Kumar : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. परीक्षेचा अभ्यासक्रम, अनेक टप्प्यांत होणारी परीक्षा आणि इतर विद्यार्थ्यांबरोबर होणारी स्पर्धा या परीक्षेला वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. त्यामुळे ही परीक्षा देताना आवड आणि परिश्रमाबरोबर योग्य मार्गदर्शन मिळणेसुद्धा आवश्यक असते. त्यामुळे ही परीक्षा अगदी सहजगत्या यशस्वी होता येते. तर आज आपण अशाच एका बिहारच्या आयएएस विशाल कुमार यांचा प्रवास जाणून घेणार आहोत.

बिहारच्या विशाल कुमार यांनी २०२३ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत प्रभावी अशी ऑल इंडिया रँक ४८४ मिळवली आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर येथील रहिवासी असलेले विशाल कुमार हे एका गरीब कुटुंबातील आहेत. २००८ मध्ये त्यांचे वडील गेले. त्यानंतर आई रीना देवी आणि विशाल यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. मजुरी करून, अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेळ्या आणि म्हशी पाळून, ते घरखर्च भागवत होते.

एका मुलाखतीत पत्रकारांशी संवाद साधताना,आयएएस विशाल यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे शिक्षक गौरी शंकर प्रसाद यांना दिले. विशाल यांच्या मते, त्यांच्या शिक्षकांनीच त्यांना यूपीएससीची तयारी करण्यास प्रोत्साहित केले आणि आर्थिक संकटाच्या वेळी मदतही केली. गौरी यांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आणि अडचणीच्या वेळी त्यांना स्वतःच्या घरी राहण्यास सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कठोर परिश्रमाला फळ मिळाले (Success Story)

मेहनत, योग्य मार्गदर्शन आदी गोष्टींमुळे विशाल २०११ मध्ये मॅट्रिकमध्ये उत्तीर्ण झाले आणि नंतर भारतातील सर्वांत प्रसिद्ध अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी, कानपूरमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना रिलायन्समध्ये नोकरी मिळाली. पण, विशाल यांनी नंतर नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकरी सोडली. २०२३ मध्ये विशाल यांच्या कठोर परिश्रमाला फळ मिळाले आणि यूपीएससी सीएसईमध्ये त्यांनी ४८४ क्रमांक मिळवला आणि ते आयएएस अधिकारी झाले.