Success Story Of Varun Reddy : स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पहिला क्रमांक मिळविणे हा मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप खास क्षण ठरतो. भारतातील सर्वांत कठीण परीक्षांमध्ये एक नव्हे तर दोन म्हणजे जेईई व यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस या परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास, मेहनत, चिकाटी, संयम यांची आवश्यकता असते. कठीण वाटणारी ही गोष्ट (Success Story ) तेलंगणातील मिर्यालागुडा येथील रहिवासी वरुण रेड्डी यांनी साध्य करून दाखवली आहे. अनेक अपयशांचा सामना करून, त्यांनी मुलगा आयएएस अधिकारी व्हावा ही वडिलांची इच्छा आणि नंतर स्वत:च्याही उराशी बाळगलेल्या स्वप्नाला गवसणी घातली आहे.
वरुण रेड्डी यांनी संयुक्त प्रवेश परीक्षेत (JEE) २९ वा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित आयआयटी (IIT) बॉम्बेमधून संगणक विज्ञान विषयात बी.टेक. (B.Tech.) केलं. त्यांच्या बहुतेक साथीदारांनी उच्च आयआयएममधून एमबीए करण्याकडे लक्ष वळवले. पण, वरुण रेड्डी यांनी अनोखा मार्ग निवडला. आपल्या वडिलांच्या इच्छेने प्रेरित होऊन, त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी होण्याच्या दृष्टीने आपले लक्ष केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षांवर केंद्रित केले.
आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट (Success Story) :
मात्र, वरुण रेड्डी यांचा हा प्रवास (Success Story ) सोपा नव्हता. यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत (CSE) वरुण यांचा पहिलाच प्रयत्न अयशस्वी ठरला. तरीही त्यांनी निराश होण्याऐवजी स्वतःला दुसरी संधी दिली. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात १६६ व्या क्रमांकासह यश मिळवून भारतीय महसूल सेवा (IRS)मध्ये स्थान मिळवले. पण, वरुण रेड्डी यांना त्यांची महत्त्वाकांक्षा अजूनही खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी न थांबता, तिसऱ्या प्रयत्नात २२५ वी रँक आणि त्यानंतर अखेर चौथ्या प्रयत्नात खूप वरची म्हणजे सातवी रँक मिळवली. अशा रीतीने वरुण रेड्डी यांनी त्यांच्या वडिलांची दीर्घकाळापासूनची आकांक्षा पूर्ण केली आणि ते आयएएस अधिकारी बनले.
सध्या, वरुण तेलंगणा स्टेट नॉर्दर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (TSNPDCL)चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. त्यांनी यापूर्वी निर्मल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आयएएस अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ सार्वजनिक सेवेसाठी, विशेषत: विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये समर्पित आहे. वरुण यांची कथा (Success Story) कठोर परिश्रमाच्या सामर्थ्याचा आणि एखाद्याच्या उद्दिष्टांप्रति अथक वचनबद्धतेचा एक उत्तम नमुना आहे.